Skip to main content

भोग आणि ईश्वर २०४

भोग आणि ईश्वर  २०४
 
काल योग या विषयावर आपण विस्तृत चर्चा केली. तरीही योगाचे अनेक पैलू बघायचे बाकी आहेत. योग म्हणजे अविनाशी आत्मा, चंचल मन, अस्थिर बुद्धी, आणि देह यांचं सुसूत्रीकरण. योग म्हणजे समत्व या शब्दावरून योग म्हणजे ध्यान, धारणा, देहाला सुस्थितीत आणि सदृढ ठेवून, मनाचं स्वास्थ्य साधून, मन शुद्ध व भेदरहीत करणं. त्यानंतर भेदरहीत मनाला, साक्षी ईश्वराच्या सगुण अथवा निर्गुण प्रतिमा, नाम, वा स्वरूपाशी एकरूप करण्याचा प्रयत्न करणं. 

सर्वात प्रथम ईश्वरी उपासना आणि भक्तीचा मार्ग चोखळण्यासाठी देहाची मनाची व आत्म्याची शुद्धता अत्यंत जरुरी आहे. म्हणजेच देह बुद्धी मन व आत्मा यांचा योग अर्थात समन्वय किंवा समत्व, म्हणजेच एकतानता, साधण्यासाठी, या सर्वांची शुद्धता जरुरी आहे. आपण व्यवहारात पाहतो की, अशुद्ध पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी त्याला विशेष शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे शुद्ध करून, मगच पिण्यासाठी वापरतात.

मग जर परम आत्म्याला भेटायला जायचं असेल तर, ज्या देहातून तो प्रवास करतोय, ज्या मनाने तो व्याप्त आहे, त्या दोन्हींना शुद्ध करून घेणं किती गरजेचं आहे. यामध्ये शुद्धता शरीरासाठी, ज्याद्वारे आतील टाकाऊ द्रव्य, साचलेली घाण काढून टाकण्यासाठी गरजेची आहे. यासाठी शरीराला आतून पूर्ण पणे शुद्ध करून, त्यातून सर्व प्रकारची अशुद्धता मुळापासून काढून टाकणे व त्या देहाला, अतींद्रिय व आंतरिक शक्तीसाठी पुरेसं सक्षम किंवा लायक बनवण्यासाठी काही विशिष्ट शुद्धीप्रक्रिया करणं गरजेचं आहे.या प्रकाराला योग म्हटलं जातं.

यातच पुढे देहावरून,  मन अंतरात्मा असा प्रवास करण्याच्या प्रिक्रिया आहेत. देह, त्यानंतर  मन असं दोन्ही शुद्ध करून, या देहातील शारीरिक, मानसिक व आत्मिक शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी,  इंद्रियांची विषयशक्ती अवरोधून म्हणजेच नियंत्रित करून, त्या विषयात वाया जाणाऱ्या ऊर्जेच्या, शक्तीच्या व चैतन्याच्या सामर्थ्याचा पूर्ण वापर करून, मनाला व इंद्रियांना आत वळवून, कुंडलिनी जागृती किंवा आंतरिक आत्मशक्ती जागृत करून, त्याचा वापर अतिंद्रिय, गूढ, गुह्य, अज्ञात, परा शक्तींच्या, संदेशांच्या, लहरींच्या समीप आत्म्याला नेऊन, त्याद्वारे गुह्यातील गुह्य ज्ञान जाणून, आत्मशक्तीची उन्नती आणि उद्धार साधणे, म्हणजे योगीयांचे कार्य आहे. 

योगी, संन्यासी, ब्रम्हाचारी, साधू, साधक इत्यादींच्यासाठी सांगितलेल्या या मार्गाने योग्य मार्गदर्शनाशिवाय जाणं ही आत्महत्या आहे, अन्यथा तशी व्यवस्था आधीच्या जन्मा तील कर्मांनी जागृत झालेली असलेला जीवच, यातून एका जन्मात पार पडू शकतो. परंतु याही प्रक्रियेत अज्ञात सद्गुरू आपल्या या जन्मजन्मांतरीच्या साधकाला सर्वप्रकारे, मार्गदर्शन करत असतातच. 

कारण सद्गुरू हे जन्मोजन्मी साधकाला पुढे नेण्यासाठी सतत सोबत करतात.  ते साधकाला भक्त म्हणून देह रूपात नाही तर आत्मरूपात शिष्य म्हणून स्वीकृत करतात, त्यामुळे साधकाच्या आत्म्याच्या प्रवासाची पूर्ण जबाबदारी, त्यांनी स्वीकृत केलेली असते. एकदा शिष्य स्वीकारल्या नंतर  साधकाचा आत्मा जसा व जिथे प्रवास करेल, तिथे सद्गुरू योग्य वेळी योग्य मार्गाने येऊन, साधकाला भ्रष्ट होण्यापासून व मार्ग चुकण्यापासून परावृत्त करतात. . 

प्रसंगी साधकाला अडीअडचणी उत्पन्न करून योग्य मार्गावर आणतात. साधकाला ते उमजत नाही आणि योग्य वेळ येईपर्यंत समजत सुद्धा नाही की, अडचणी येण्याचं प्रयोजन काय आहे. परंतु या सर्व गोष्टी, साधू संन्यासी योगी ब्रम्हाचारी व आध्यात्मिक मार्गातील उच्च साधकांसाठी योग्य आहेत. त्यांना सांसारिक बंधनं नसल्यामुळे, ते पूर्णवेळ साधक होऊन, शुद्धीप्रक्रियेचे सर्व नियम पाळून, योगायोग यातील  अष्टांग साधनं अभ्यासून, त्यांचा अवलंब करून, त्याद्वारे देहशुद्धी,  चित्तशुद्धी आत्मशुद्धी साधून देहाच्या सुखोपभोगाच्या कल्पनांपलीकडे जाऊन, आत्मतेजाचा साक्षात्कार करून घेऊन त्या मार्गाने उन्नती व उद्धार साधण्याचा प्रयत्न करतात. 

अर्थात अंती सफलता प्रामाणिक प्रयत्न व सद्गुरू कृपा यावरच अवलंबून आहे. पण हा मार्ग वाटतो तितका सहजसाध्य नाही. विषय वासना,मोह लोभ इत्यादींसह माया जिंकणं, जितकं सांसारिकाला कठीण आहे त्याहीपेक्षा या मार्गातील साधकांना जास्त कठीण आहे. कारण सांसारिक जीव पथभ्रष्ट झाला तरी पूर्ण शुद्धतेच्या जवळ नसल्यामुळे प्रवाहात वर खाली होणार हे गृहीत असतं. पण पारमार्थिक वाटेत पूर्णवेळ असणाऱ्यांची स्थिती शुभ्र वस्त्र परिधान केल्यासारखी असते. थोडासा डाग सुद्धा दिसून येतो आणि जन्मोजन्मीची मेहनत वाया घालवू शकतो.

विषय गहन आणि मोठा असल्या कारणाने,  यापुढील चर्चा उद्या सुरू ठेवू. पण नामाचा दीपक एकदा हाती घेतलाय तो ठेवू नका. कारण तोच आपला मार्गदर्शक व पथदर्शी आहे. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...