Skip to main content

भोग आणि ईश्वर १८६

भोग आणि ईश्वर  १८६

एक प्रश्न नेहमी मनात येतो आणि त्यावर तात्विक विवेचन वाचायला मिळतं. हे विवेचन तर्काला, सृष्टीच्या, विधात्याच्या नियमांना धरूनच आहे. त्या तर्कात काही गैर नाही. प्रश्न किंवा विषय असा आहे की, सर्व कर्मफलानुसार होणार आहे, त्यामुळे येणारे भोग हे भोगूनच संपवायचे आहेत. विधाता त्याबाबत काही सवलत किंवा त्या त्या आत्म्याच्या पापपुण्या नुसार भोग पुढे भोगण्याची सोय करून देऊ शकतो. पण ते भोग पूर्ण माफ अथवा कमी किंवा नष्ट करू शकत नाही. 

याचा परामर्ष आज घेऊया. सकृतदर्शनी विषय योग्य आणि कर्मसिद्धांताला धरूनच आहे यात वाद नाही. ज्यावेळी आपल्या भोगांची निपजण्याची वेळ येते, त्यावेळी सहसा सर्वसामान्य माणसाची मनोभूमिका नकाराची असते. त्यांना सहजासहजी स्वीकारणं जड जातं की, या सर्वांना मीच कारणीभूत आहे. परंतु कर्ममार्गाचा व गतीचा सिद्धांत हा सत्य आहे आणि शेवटपर्यंत सत्य राहणार. 

कर्ममार्ग माणसाला चांगलं कर्म व वाईट कर्म याची विभागणी व त्यावर विश्वास यासाठी अनेक प्रकारे अनेकवेळा अनेक रुपात येऊन स्वतः भगवंतानी कथन केलं. वेदांतून, पुराणातून ऋषीमुनी यांच्या माध्यमातून आणि श्रीमद भगवद्गीता व ज्ञानेश्वरी या मधून स्वतः भगवान श्रीविष्णू यांनी पृथ्वीवर अवताररूप उतरून भक्तीवेदांत सांगितला.  

आधी गलितगात्र व हतोत्सहित पार्थाला युद्धक्षेत्री आणि नंतर कलियुगी धर्मशास्त्राच्या पोकळ ज्ञानाने, पाखंडी झालेल्या समाजधुरीणांना धडा शिकवायला आणि भक्ती, प्रेम यांच्या ज्ञानापासून वंचित असलेल्या, सर्वसामान्य जनतेला, तेच अमृतज्ञान, स्वतः प्राकृतात, तीच गीता टिकेसाहित व दृष्टांत देऊन सोपी करून प्राशन करवली. उद्देश एकच की जीवन जगण्याचा सर्वात सोप्पा सिद्धांत कर्ममार्गी रहा, भोग स्वीकारा, ज्ञानी व्हा आणि भक्तीच्या माध्यमातून सर्व कर्म एका ईश्वराला अर्पण करून, भोक्ता आणि उपभोक्ता या श्रेणीतून निघून भक्त या श्रेणीत या. 

भोक्ता अर्थातच जो भोग व उपभोग यांच्या फेऱ्यातून जाऊन आनंद दुःख, अवहेलना, चिंता, क्रोध आदि भावभावना यांच्या चक्रव्यूहात अडकून, जन्मजन्मां तरीच्या यातनेत फसतो तो. परंतु या सर्व चिंता दुःख आनंद या भावनेतून वा या चक्रातून मुक्त आहे तो भक्त. भोक्ता या संज्ञेतील भो अर्थातच भोग ज्याला भय दाखवू शकत नाहीत आणि सर्व कर्म, जो नित्य नामस्मरणी राहून  एका केशवाला अर्पण करून, त्या कर्माच्या फलाचा अधिकार केशवाच्या हाती सुपूर्द करतो तो भक्त. 

जो भोगांपासून विभक्त आणि भगवंतापासून अभक्त असतो, तो भक्त म्हणवला जातो. याची कित्येक उदाहरणं संत महंतांनी आपल्या आयुष्यात घालून दिली. सर्व संतांना आयुष्यात अनेक यातना, भोग, त्रास दुःख भोगावं वा सहन करावं लागलं. तरीही या सर्वांचा त्यांच्या भक्त म्हणून वागण्यावर, नामस्मरणावर आणि साधनेवर तिळमात्र फरक पडला नाही. म्हणजेच जो भगवंतापासून विभक्त नाही, त्याला भोगांचं भय नाही. भोगातून भयमुक्त तो भक्त आणि भोगाचा ताप ज्याला पिडतो तो भोक्ता. 

भगवंताच्या सान्निध्यात माया ही क्षीण असते,कारण ती ईश्वराच्या आधीन आहे. तिचा खेळ हा ईश्वरापासून विभक्त भोक्ते आहेत, त्यांनाच त्रासवू आणि अडकवून फसवू शकतो. जो ईश्वराच्या समीप स्वतःला, आपल्या साधनेच्या मार्फत, पाहतो व जाणतो, त्याला मायेच्या खेळाचा जाच होणार नाही. म्हणजेच ज्याच्या मतीला मायेची बाधा ग्रासू शकत नाही, त्याला आपल्या कर्मातील भोगांचा दाह जाणवणार नाही. कारण शेवटी मनच या सर्वांच्या जाणिवा देहाला जाणवू देतं आणि मनच या खेळात आत्मा आणि देह यांचा बंध जुळू देत नाही. 

एकदा हा बांध जुळला की जाणिवा देहाचा उपयोग हा मात्र भक्तिमार्गी राहून, कर्माचे भोग प्रारब्धावर सोडायला मनाला आणि देहाला तयार करतात किंवा त्या जाणिवा आत्म्यातून मनात उतरत जातात आणि मन कोणताही रिता विचार वा विखार यांना बळी पडत नाही. हीच खऱ्या भक्ताची स्थिती असते. जिथे भोग आहेत, पण त्यांच्या जाणिवांनी मन गलितगात्र व मलिन न होता, मन ते भोग सहजी स्वीकारून फक्त मी आणि भगवंत यावरच देह मन आणि आत्मा स्थिर होतो, तिथे भोग हे भोग राहातच नाहीत. उलट ईश्वराकडे पोचण्याच्या मार्गातील सहाय्यक आहेत, अशीच स्थिती भक्ताची होते. या ठिकाणी भक्त आणि भगवंत एकरूप होऊन, भोग भोगणे हा भक्तीचाच एक भाग होऊन उरतात. 

भक्त तिथे भगवंताला सांगतो, हे भोग आहेत, म्हणूनच मी तुझ्या जवळ येऊ शकतो, तुला मिळवण्याची आस धरू शकतो, तुझं स्मरण करू शकतो. हे करण्यातच खरा भक्त आनंद मानतो आणि म्हणतो की, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हांसी. कारण आम्ही कोणत्याही जन्मात कोणत्याही स्थितीत व अवस्थेत, तुलाच भजणार, तुझीच भक्ती करणार. मग आम्हाला कसलं आलंय जन्ममरणाचं सोयरसुतक. 

विषय मोठा आहे,म्हणून पुढचा भाग उद्या बघूया. तोपर्यंत नामस्मरण करत रहा, साधना हाच सर्वात सोप्पा मार्ग आहे. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना  हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी . 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०४/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...