Skip to main content

सुभद्राहरण ३४

सुभद्राहरण ३४ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा 

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

सर्वजण उपस्थित होऊन स्थिरस्थावर झाले आणि पुरोहितांनी मंत्रोच्चाराला सुरवात केली आणि  विवाहविधीं प्रारंभ झाले. 
तत्कालीन प्रथेनुसार विधींना सुरवात झाली. अर्थातच सर्वांना प्रतीक्षा होती ती वधूच्या आगमनाची. केशरी रंगाची सुंदर पैठणी नेसलेली, नखशिखांत अलंकारांनी सजलेली, मुळात रूपवती असलेली सुभद्रा आज वधूच्या शृंगारात अलौकिक दिसत होती. 

जणू तिच्या प्रभेमुळे प्रत्यक्ष सूर्याची तप्त किरणं आपला ताप विसरून सुभद्रेला पाहायला आरक्त झाली आहेत. नील नभात सुरवर, देवादिकांना ज्यांच्यावर मत्सर उत्पन्न होतो ते गंधर्वसुद्धा,  तिला पाहायला उत्सुक आहेत, रती स्वतः सुभद्रेच्या सौन्दर्याकडे पाहून , खिन्न झाली आहे अशी रुपसंपन्न सुभद्रा आलेली पाहून अर्जुनाचे नेत्र पापण्या मिटायचेच विसरले की काय असाच भास होतोय. ते पाहून सुभद्रा लज्जित होऊन तिच्या सौंदर्यात वृद्धी होत आहे.

वधू वर दोन्ही स्थानापन्न झाले. होमात हवनाच्या आहुत्या पडायला सुरुवात झाली. पुरोहित मंत्रोच्चाराच्या गजरात एक एक विधी पूर्ण करत होते. उपस्थित जनसमुदाय विधींचा आनंद घेता घेता जलपान, रसपान यांचाही आस्वाद घेत आहे. साक्षात नारायणाच्या भगिनीच्या विवाहाला कसलीच कमतरता नव्हती. विवाहाला उपस्थित सर्व आमंत्रित निमंत्रित  
व जनसामान्य सर्वांच्या आदरातिथ्यासाठी यादववीर खासे राबत होते. 

कोणाला कसलीही उणीव भासून तक्रार येईल हे खपवून घेतले जाणार नाही अशी सक्त तंबीच दादांनी दिली असल्या मुळे कुणी काही मागायच्या आधीच पेय जल वा खाण्याचे जिन्नस बसल्याजागी दिले जात होते. मंडपात खास व्यवस्था ही विविध प्रकारच्या उंची सरबतांची होती. सर्व प्रकारच्या फळांच्या सरबतांचा वर्षाव होता.  मंडळी पिऊन थकतील पण बनवणारे आणि देणारे कर थकणार नाहीत अशीच व्यवस्था होती.

कृष्ण स्वतः वरासोबत राहून त्याला काय हवं नको ते पाहण्यात मग्न होता. मध्येच उठून कार्याची व्यवस्था पाहून दादांकडे संतोष व्यक्त करत होता.  जगतनियंता आपल्या लाडक्या सख्याचा, आपल्याच लाडक्या भगिनीसोबत, होत असलेला विवाह पाहून हरखून गेला होता. त्याच्या आनंदाला सीमाच नव्हती.  कृष्णदेखील आज कमी देखणा दिसत नव्हता. परंतु हे तेज कार्याच्या समाधनाचं होतं. 

बलरामदादा एका जागी स्थिर रहात नव्हते. कारण आल्या गेल्याचं आणि कार्याचं सर्व बघण्याची जबाबदारी घेतलेले दादा इथेही रणांगणातील वीराप्रमाणे आदेशाच्या गदा चालवून कार्यात कोणतीही कसूर राहणार नाही याचीच पाहणी करण्यात व काही न्यून आढळल्यास सदर व्यक्तीस रागे भरण्यास मागे पुढे पहात नव्हते. अंतरी निर्मळ असलेले दादा प्रत्येक कार्य हे युद्धासम तत्परतेने आणि यशस्वी करण्याच्या मनिषेने सज्ज होत असल्याने त्यांना गैरसोय वा कुचराई खपत नसे, इतकंच.

विवाहाचे विधी संपन्न होत असतानाच दोन्ही बंधू मान्यवर उपस्थितांची व्यवस्था पहात होते. एका अर्थी दोघेही कार्यव्यग्र होते. एक एक विधी होत होत कार्य विवाहाच्या मुख्य विधिकडे अर्थात विवाहाकडे पोहोचले. वराला विवाहवेदीवर उभा करून पुरोहितांनी वधुस घेऊन येण्याची आज्ञा केली आणि मंगलाष्टके सुरू झाली. 

क्रमशः

भाग ३४ समाप्त
२८/०४/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...