Skip to main content

सुभद्राहरण ३७

सुभद्राहरण ३७ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा 

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

विवाह सोहळा उत्तमरीत्या पार पडला. भोजनसमारंभ, उपस्थितांनी मनसोक्त जेवून तृप्तीच्या ढेकरा देत, गाजवून सोडला. समस्तांना असे तृप्त बघून, कृष्णाला आधीच समाधान प्राप्त झाले होते. तरीही विवाहोत्तर मान्यवरांसह राजकुळातील सर्वांनी उत्तम अश्या भोजनाचा लाभ घेतला. 

कृष्णाच्या भगिनीच्या लग्नाचा डामडौल , थाटमाट, सुसज्जता, खाद्यानांची रेलचेल, रेशमी वस्त्रांचा थाट, अलंकारांची विविधता हे पाहून स्वर्गीचे देव देखील थक्क झाले. प्रत्यक्ष देवेंद्र अचंबित होऊन सोहळा पाहात होते. परंतु ही सुबत्ता फक्त राजपरिवारातच नव्हती तर जनसामान्यां पर्यंत या सुबत्तेचा प्रवाह पोहोचला होता. राजा सुखेनैव वैभव मात्र स्वतःसाठी नव्हे तर समस्तांना त्यांचा त्यांचा अधिकार, भाग देऊन आणि याचक दीन यांना उत्तम दानधर्म करून ती सुबत्ता ते वैभव सढळहस्ते लुटून, मग बाकी भागाचा उपभोग स्वतःसाठी करत असे, असा तो काळ. त्यातही हे यादवनरेश श्रीकृष्णाचं राज्य. 

उत्तमरीत्या पार पडलेल्या कार्याचं समाधान सर्वांच्या मुख कमलावर विराजित होतं. कार्य आणि कार्योत्तर भोजन व इतर विधी संपन्न होता होता संध्यासमय येऊन ठेपला. जनसामान्य, कृष्ण बलराम व राजपरिवाराला शुभेच्छा व धन्यवाद देत, आपल्या आपल्या गृही प्रस्थान करते झाले. कृष्णाने सर्वांना धन्यवाद दिले व उंची भेटवस्तू, कार्याला उपस्थित सर्वांना मिळेल याची जातीने व्यवस्था केली. राजपरिवारदेखील राजप्रासादी पोहोचला. कृष्ण बलराम, बाकी सर्व सभामंडप रिता होऊन, सर्व सामानाची व्यवस्था लागून, सर्व मंडप पुनः स्वच्छ होईपर्यंत थांबले. रात्रीचा पहिला प्रहर संपत आला. बलराम, माता पिता, सुभद्रा जिथे बसले होते त्या कक्षात पोहोचले. 

आपल्या भगिनीला सौभाग्य अलंकारांकसह सजलेली पाहून आनंदाश्रूनी बलरामाचे नेत्र भरून आले. सुभद्रादेखील अश्रूंमय आहे. सर्व आयुष्याचा पट नजरेसमोर आला आहे दोघांच्या. बालपणीची सुभद्रा, कृष्णाच्या तक्रारी घेऊन येणारी सुभद्रा, कृष्णाला लटके रागे भरणारे दादा, तरीही कृष्णावर अत्याधिक स्नेह करणारी सुभद्रा. दादा भावविभोर झालेत. रणात अगणित वीरांना आपल्या मुसळ व हल यांनी परास्त करून यमसदनी धाडणारे दादा अश्रूंना मात्र अडवू शकत नाहीत. हरलेत तिथे. 

इकडे कृष्ण आधी अर्जुनाच्या महाली गेला. कृष्ण अर्जुनाचं हितगुज काही काळ चाललं. निघताना अर्जुनाला कृष्णाने सांगितलं की 

"उद्या पूजा आहे ततपश्चात तुझा पुष्करक्षेत्री कधी निघण्याचा मानस आहे, म्हणजे त्याप्रमाणे सर्व तयारी करून ठेवता येईल."

अर्जुन म्हणाला 

"माझा मानस त्वरित प्रस्थान करण्याचा आहे. परंतु एकदा सुभद्रेशी बोलून ठरवतो आणि सांगतो."

यावर कृष्ण म्हणाला

" ती संधी तुला आता उद्याच प्राप्त होईल आज आता निवांत आराम कर" 

अस म्हणून, हसत हसत, कृष्ण, सुभद्रेसह परिवार जिथे होता त्या कक्षात आला.  आपल्या लाडक्या भगिनीला एकदा भेटून त्याने आलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि म्हणाला

" आता माझी तक्रार दादांकडे कोण करणार आणि माझ्याकडे हट्ट तरी कोण करणार" 

यावर सुभद्रेला अश्रू  अजूनच अनावर झाले आणि दादा म्हणालेच 

" तिला अजून रडवू नकोस कान्हा." 

पण हे बोलताना स्वतः मात्र अश्रूमय झाले होते ते वेगळंच. ते पाहून , त्याही स्थितीत कृष्ण सुभद्रा दोघे खळखळून हसले. दादानी लटके रागे भरले. हा तिन्ही भावंडांचा खेळ बराच काळ सुरू होता आणि माता पितादेखील साश्रु नयनांनी याचा आनंद लुटत होते. परंतु अवकाशातून , जगतपतीला असे अश्रू ढाळताना पाहून , नारद देखील अचंबित झाले. विचार करत आहेत की मायापती देखील देही आल्यावर मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाहीत. मनात म्हणत आहेत

 " हे मायापती आपली लीला अपरंपार आहे" 

आणि वरूनच या स्वर्गीय दृश्याचा आनंद घेत आपलेही अश्रू पुसत आहेत, जगतपतीची लीला बघून आणि त्यातील त्यांचा सहभाग पाहून.

क्रमशः

भाग ३७ समाप्त 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...