Skip to main content

सुभद्राहरण ३१

सुभद्राहरण ३१

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

यावर सुभद्रा म्हणाली

तुम्ही जर अशीच चेष्टा करणार असाल तर ................" 

तिचं वाक्य अर्धवट कापत एक सखी म्हणाली.

"तर मी सरळ त्यांना जाऊन सांगेन शर मारायला. अचूक शरसंधान करतात तिचे अर्जुन. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहेत." 

सुभद्रेने लाजून आपला चेहरा झाकून घेतला. कितीतरी वेळ ही थट्टा चालू राहिली असती, परंतु माता देवकीने येऊन सर्वांना रागावून पिटाळलं की, उद्या प्रातः लवकर उठून चार दिवस सोहळा जागवायचा आहे. तेंव्हा सर्वांनी जाऊन निजा आणि सुभद्रेलासुद्धा निजूद्या. तरी तेवढ्यात जाता जाता एक सखी म्हणालीच

"काकू आता कसली निद्रा तिला. आता चार दिवस निद्रानाश आणि स्वप्न." 

" बघ ग माते"  अशी लटकी तक्रार सुभद्रेने केली. यावर मातेने त्या सखीला एक चापट मारली. सर्व निघून गेल्या. मातेने सेविकांना सर्व दिवे कमी करून मंद करण्यास सांगितलं आणि जाता जाता सुभद्रेला म्हणाली

" आता नीज नाहीतर बघत बसशील स्वप्न." 

" माते तूसुद्धा." अस म्हणून सुभद्रा लाजली. मातेने तिच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवला, सुभद्रेने मातेचा हात हातात घेतला आणि दोघींच्या नेत्रातून अश्रू सुरू झाले. मातेच्या विरहाच्या कल्पनेने सुभद्रा भावूक झाली. माता तिला म्हणाली

" प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण, विवाहपूर्वीची ही रात्र, हा विरह व सुखाच्या उंबरठ्यावर बसून पुढच्या आनंदी प्रवासासाठी मनाला तयार करण्याचा सर्वात कठीण काळ येतोच. आजपर्यंत ज्यांचं बोट धरून आपण मोठे झालो, ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो, वाढलो, बागडलो, ज्या भावांकडे हट्ट केला, ज्यांनी तो हट्ट पुरवला, ज्या अंगणात आपण पडलो, धडपडलो, जिथे आपले लाडकोड पुरवले गेले, ज्या पिताश्रींनी आपल्या सर्व बाललीला भागवंताच्या लीला समजून कौतुकाने त्यांचं रसग्रहण केलं, 

ज्या पित्याने प्रसंगी कृष्ण व बलराम यांना देखील शिस्तीसाठी दंडीत केलं परंतु आपल्याला कधी रागे भरले नाही, ज्या बंधूंनी वेळप्रसंगी दोन हात करून आपलं बाहेरच्या शक्तींपासून वा त्रासापासून रक्षण केलं, ज्या सेवकांनी स्वतःची पुत्री समजून तुझे लाड केले, ज्या मातेने आपल्याला कधी कधी लाडात व गोडीत तर कधी फटके देऊन आपल्याला घडवलं,  

ज्या भूमीला आपण आपली माता मानून तिच्या अंगा खांद्यावर खेळलो, बागडलो, ज्या भूमातेला आपण वंदन करून मस्तकी लावतो, ज्या सख्यांना आपण बालपणी आपलं सर्वस्व मानत होतो, ज्यांनी आपली बालपणीची, त्यावेळी महत्तम वाटणारी अनेक गुपितं जपली , ज्यांनी आपल्याला सर्व काळी बालपणी  आणि युवा वयात सतत साथ दिली

त्या सर्वांना सोडून जायचं हे एक अत्यंत कठीण कार्य प्रत्येक मुलीला आपल्या आयुष्यात करावंच लागतं. यात जे सोडून चाललोय ते आयुष्य आता पूर्णपणे आपल्याला पारखं व परकं होणार हे नक्कीच. परंतु त्या पेक्षा जे पुढे आपल्याला स्त्री म्हणून घडवायचं आहे , त्याची ओढ आपला उत्साह आणि  आनंद वाढवणारा नक्कीच असतो. त्या विचारांचा माग धर. 

स्त्रीच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवणारा हा काळ,हा दिवस आणि ही रात्र. या वेळी हातातून सुटणाऱ्या गोष्टी न पाहता, जे हातात येणार आहे त्याचाच विचार मनात धरावा. तोच आपला मार्ग आणि मार्गदर्शक असेल हे एक माता व स्त्री म्हणून तुला सांगते, ते ध्यानात ठेव. तू तर सर्वात भाग्यवान. अर्जुनासारखा वीर धनुर्धर , श्रेष्ठ पुरुष तुला पती म्हणून लाभला हे महद आनंदी आहे आमच्या साठी आणि ज्यात आमचा आनंद सामावला आहे ते नक्कीच तुलाही प्रेरणादायी असेल. म्हणून इतर कोणत्याही भावाचा विचार न करता फक्त उज्वल भविष्याचा, भविष्यातील साथीचा आणि तुझ्या संसाराचा विचार कर आणि त्याच विचारात शांत निद्रा घे.

सुभद्रेला अनेक गोष्टी सांगून तिला भावी उत्साहवर्धक काळाचा विचार करण्यास सांगून माता देवकी आपल्या महाली प्रस्थान करती झाली. 

क्रमशः

भाग ३१ समाप्त
२५/०४/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...