राम अनुज भरत भाग ३८
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
लक्ष्मण सुद्धा,एखादा वृक्ष उन्मळून पडावा त्या प्रमाणे, भ्राता श्रीराम यांच्या समीप खाली कोसळला. त्याला तसा पडलेला पाहून,भरत सुद्धा विव्हालावस्थेत,अतीव दुःखाने ग्रस्त होऊन, आपल्या बंधूंच्या शेजारी, पडला.
त्या तीनही बंधूना असे, दुःखसागरात बुडून, रडताना पाहून, आजूबाजूचे मंत्री, सचिव व आर्य सुमंत यानाही अश्रू अनावर झाले. पण भानावर असलेल्या आर्य सुमंत यांनी,त्वरित शत्रुघ्नला घेऊन येण्याची आज्ञा केली. शत्रुघ्न त्वरेने त्या स्थळी पातला व तीनही भावांना, पिताश्रीच्या मृत्यू वार्तेच्या शोकात बुडालेले पाहून, तीनही भ्राताच्या शेजारी जाऊन शोकमग्न रडायला लागला. त्या दुःखद अवस्थेत सुद्धा, प्रभूंनी, सर्वात लहान अनुज, शत्रुघ्न याचा स्वर ओळखून, त्याला उठून दीर्घ आलिंगन दिले.
त्याला पाठीवर थोपटून, ज्येष्ठ भावाच्या स्नेहाने, सांत्वन करण्याच्या उद्देशाने त्याला आपल्या छातीशी धरले. मोठे विदारक दृश्य होते. स्वर्गातून, देव, कैलासावरून उमा व महेश्वर, ब्रम्हलोकातून ब्रम्हदेव व देवी सरस्वती आणि इंद्रादी लोकपाल, अवकाशातून हे हृद्य दृश्य पाहण्यासाठी साक्षी झाले होते.त्या दुःखाच्या आवेगात,स्वतःला सावरत अनुज भरत, आपले अश्रू पुसत पुसत,ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांना म्हणाला.
" हे रघुकुल शिरोमणी, इक्ष्वाकु भूषण श्रीराम, मी आणि शत्रुघ्न यांनी अयोध्येत, पिताश्रींच्या आत्म्याला मृत्यू उपरांत जलदान केले आहे. आपण दोघांनी ते करून घ्यावे. जेणेकरून, पिताश्रींना देवलोकात, सद्गती आणि शांती प्राप्त होऊन,त्यांच्या आत्म्याचा पुढील प्रवास सुखकर आणि शांतीपूर्ण होऊन, त्यांना त्यांच्या पुण्यकारक संचीताची योग्य फलप्राप्ती होईल."
भरताच्या या शब्दांनी, अतीव दुःखातून, स्वतःला सावरत, भरताचे दोन्ही हात हातात घेत, प्रभूंनी, कुलगुरू, महर्षी वसिष्ठ यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकला. महर्षी अर्थातच, आधी पासून जलदानाच्या तयारीत होते. त्यांनी सोबत आलेल्या ब्रम्हवृंदांना पळी पंचपात्री काढून येण्यास सांगितले. ब्रम्हवृंद आपल्या कार्यासाठी गेले आणि तिथूनच, मंदाकिनीच्या तटावर सुशोभित घाटाकडे निघाले.
मुनिवर महर्षी वसिष्ठ यांनी श्रीराम, लक्ष्मण याना घाटाकडे चालण्याची सूचना केली. प्रभू श्रीराम, बंधू लक्ष्मण यांसह चारही बंधू, गुरुदेव वसिष्ठ यांच्या मागे, शोकाकुल स्थितीत, अतिसंथ गतीने, निघाले. तोपर्यंत ब्रम्ह वृंदांनी, जलदानाची तयारी करून ठेवलेली होती. घाटावरून पायऱ्या उतरून, मुनिवर ब्रह्मस्वरूप वसिष्ठ, त्यामागे, विश्वपती श्रीराम व बंधू लक्ष्मण, पाण्यात उतरले. वसिष्ठ ऋषींनी, मंत्रोच्चार सुरू केले. प्रभूंना दक्षिणेकडे मुख करून, उभ राहायला सांगितलं. अर्थातच श्रीरामांनी त्याप्रमाणे केले. गुरूवर वसिष्ठ यांनी श्रीरामांना, उजव्या हातात जल घ्यायला सांगून, ते हाताच्या अंगठ्या कडून खाली सोडण्यास सांगितले.
तत्पश्चात लक्ष्मणाने सुद्धा जलदान केले. गुरूवर दोंघाना घेऊन, घाटावर परत आले. तिथे दर्भाच्या काड्यांपासून तयार केलेली आसनावर, प्रभू आणि महर्षी विराजमान झाले. सीतेने, इंदुगी अर्थात हिंगण या फळांचा काढलेला गर आणून ठेवला.प्रभूंनी स्वतः त्यामध्ये बोराच्या फळांचा गर मिश्रित करून, त्यापासून, तीन पिंड तयार करून, कर्दळीच्या पानांवर ते मांडले आणि हात जोडून गुरुदेवांना म्हणाले.
" हे महर्षी, ब्रह्मस्वरूप वसिष्ठजी, सहसा आपण जे भोजन करतो किंवा जे अन्न ग्रहण करतो, तेच देव लोकातील देवांना व पितरांना पोचते, असे शास्त्र सांगते. म्हणून आम्ही या वनात नित्य भोजनात घेत असलेल्या या फळांचा गर काढून, त्यापासून हे पिंड तयार केलेले आहेत. आपंन तेच पिंडदाना साठी घ्यावेत, अशी मी नम्र प्रार्थना करतो."
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१६/०७/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment