राम अनुज भरत भाग ५१
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..
भरताच्या खांद्याना धरून, प्रभू म्हणाले
" हे ज्ञानी, गुणवंत भरत, मी चौदा वर्षांनी परत येईन, त्यावेळी ही राज्याची धुरा मी माझ्या हाती घेईन. तोपर्यंत तू या राज्याचा सांभाळ कर. आर्य सुमंत यांसह सर्व मंत्री, सचिव व अधिकारी, यांचं सहाय्य घे आणि मात्र प्रजाजन हित यास्तवच हे राज्य चालव."
यावर भरत म्हणाला
"हे त्रिलोक पती, जगतपालक, आपणच माझे स्वामी आहात. मी सुद्धा आपल्या प्रमाणेच, जटा धारण करून व वल्कलं नेसून, अयोध्येबाहेर राहून, केवळ आपला एक प्रतिनिधी म्हणून, हे राज्य सुरळीत चालवून, चौदा वर्षानी हे राज्य,निष्कंटक आपल्या स्वाधीन करीन व आपल्या पावन चरणाची सेवा करण्यात धन्यता मानीन. हे प्रभू आपल्याला, या दासाला, एक वचन द्यावं लागेल, तरच हे चरण मी सोडीन. "
अजाणता भाव दर्शवून, जाणते प्रभू, प्रश्न कर्ते झाले की,
" कोणतं वचन प्राण प्रिय भरता"
" हे दयानिधी, चौदा वर्षे पूर्ण झाली की त्या दिवशी आपण कोणत्याही परिस्थितीत मला येऊन भेटाल. जर तसं घडलं नाही, तर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मी हा देह अग्नी अर्पण करीन. "
प्रभूंनी भरताच्या दोन्ही करांना आपल्या हातात घेऊन, एकाग्र चित्त आणि त्याच्या नेत्रात पाहून, आश्वस्त, गंभीर आणि विश्वासपूर्ण आवाजात म्हणाले.
"भरता माझा तुला शब्द आहे की,मी कोणत्याही स्थितीत, चौदा वर्षे पूर्ण होताच, तुझ्या समोर असेन. तू पूर्ण निश्चिंत रहा."
भरताच्या या प्रेमपूर्वक आग्रहाला, स्वीकारून प्रभूंनी भरताला निरोप दिला. भरत हर्शोल्हासाने, सुवर्ण रत्न जडित पादुका आपल्या माथ्यावर धरून, आपल्या रथाच्या दिशेने निघाला. प्रभूंनी बाजूला उभा असलेल्या, शत्रुघ्नला आलिंगन देऊन, हृदयाशी धरले. दोघांचेही नेत्र अश्रुमय झाले होते. आपले अश्रू पुसत, त्याचे खांदे धरून प्रभू म्हणाले
" हे सुमित्रा नंदन, तू माता कैकयी वर रोष धरू नकोस, या सर्वात तिची काहीही चूक नाही. वर देण्याचे वचन आणि ते कधीही प्राप्त करून घेण्याचा शब्द, तात महाराज दशरथ यांनीच दिला होता. मातेने त्याप्रमाणे, तिच्या इच्छित समयी ते वर मागितले आणि पिताश्री राजा दशरथ यांनी, आपल्या वचनासुसार त्यांचं पालन करण्याची आज्ञा मला दिली.
ती आज्ञा मला शिरोधार्य आहे आणि मी त्याचं प्राणपणाने पालन करीन. परंतु तूच एकटा आता तीनही मातांच्या समीप असल्यामुळे, तू माता कैकयी हिला कधीही अंतर देऊ नकोस. इतर मातांप्रमाणे तिचीसुद्धा पूर्ण काळजी घे. मी स्वतःसह सीता,दोघांची शपथ घेऊन,तुला आश्र्वस्त करतो की, माता कैकयी ही संपूर्ण निर्दोष आणि निष्पाप आहे."
इतके बोलून प्रभूंनी शत्रुघ्नचा निरोप घेतला. आपल्या सर्व मातांना चरण स्पर्श करून वंदन करत, साश्रू नयनांनी त्यांचा निरोप घेत ,प्रभू गुरुदेव वसिष्ठ, याच्या चरणी लागले. गुरुदेवांनी उत्तम आशिष देऊन, प्रभूंना अश्र्वस्त केले. त्यानंतर आर्य सुमंत, यांच्याशी प्रभूंनी योग्य तो विचार विनिमय केला आणि काही उपयुक्त व अती महत्वाच्या सूचना केल्या. इतर सर्व मंत्री, सचिव व मुख्य अधिकारी यांचा निरोप घेऊन, उपस्थित प्रजेला अभि वादन करून, प्रभू आपल्या पर्णकुटीत गेले. देवी सीता आणि भ्राता लक्ष्मण यांनी देखील प्रभुंचं अनुकरण करून, पर्णकुटीत प्रस्थान केलं.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२९/०७/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment