राम अनुज भरत भाग ५०
(श्रीराम पादुका प्राप्ती)
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..
भरताने हताशपणे, श्रीरामांना पाहिलं. दिग्मुढ भरत, सद्गदित स्थितीत आपले सर्व अंग प्रभूंच्या पायाशी टाकून, त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून म्हणाला.
" हे त्रिलोकाधिपती, जगतोध्दारक, जनप्रिय श्रीराम, मी आपल्या चरणांशी आर्जवे मांडतो की, मी कोणत्याही स्थितीत हे राज्य स्वीकारणार नाही. कारण रघुकुलाची रीत आहे की, ज्येष्ठ पुत्रच राज्यपदी विराजमान होतो आणि सिंहासनी विराजित होतो. ज्याप्रमाणे वचनांच्या पुर्ततेची परंपरा आहे, त्याचप्रमाणे ही देखील एक जाज्वल्य, निष्ठावान परंपरा आहे, जी भंग करण्याचा अधिकार मलासुद्धा नाही आणि मी ते देह असेपर्यंत करणार नाही."
काळाला सुद्धा, दोन बंधूंच्या या वाग् कौशल्य आणि चातुर्याचे, हे स्नेह आणि कर्तव्य यांच्या शब्दांच्या संवादाचे कौतुक वाटतं होते. जमलेल्या सर्वांनाच, या तिढ्यापेक्षा या दृढ निश्चयी श्रीराम आणि बंधुप्रेमी भरत, यांचा हा संवाद असाच युगापर्यंत सुरू रहावा असेच वाटत होते. परंतु गुरुदेव वसिष्ठ याना, कुलगुरू आणि विप्र म्हणून, यातून मार्ग काढणे, क्रमप्राप्त वाटले.
त्याच क्षणी भरत उठून, आपल्या रथाकडे गेला आणि एका पवित्र पितकेशरी रेशमी पवित्र वस्त्रात गुंडाळलेल्या, सुवर्ण रत्नजडित पादुका,घेऊन लगबगीने आला. त्याने त्वरित श्रीराम याना विनंती करून, त्या पादुकांमधे, आपले दोन्ही चरण कमल ठेवण्यास सांगितले. श्रीरामांनी त्या पादूकांमधे आपली चरणे चढवली आणि मोठ्या प्रसन्न मुद्रेने, त्यांनी भरताकडे पाहिले. भरताने, आपल्या अश्रुयुक्त नयनांनी, ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्याकडे पाहिले.
ते पाहून मोठ्या प्रफुल्लित आणि स्मितपूर्ण चेहऱ्याने, प्रसन्न झालेले गुरुदेव म्हणाले.
हे त्रिभुवन स्वामी राम, जर काहीच मार्ग शक्य नसेल तर, आपल्या या पादुका, आपण भ्राता भरत याच्या सुपूर्द कराव्यात."
ते ऐकून, अती हर्षाने, आपल्या ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या चरणाशी बसून म्हणाला
" हे पतितपावन त्रिलोक विजयी, श्रीराम, आपण या पवित्र पादुका, माझ्या स्वाधीन कराव्यात. त्यांची, आपले प्रतिनिधी स्वरूपाने, राज्य सिंहासनी मी स्थापना करून, आपला सेवक व दास म्हणून, चाकरी करत, चौदा वर्षे, हे सार्वभौम राज्य आपल्या पादुकांच्या नावाने पुढे नेईन. "
भरताच्या या वचनांना अत्यंत प्रसन्नता पूर्वक, उदार अंतःकरणाने, करुणा सागर श्रीराम यांनी आपली मान्यता दिली. त्याक्षणी, भ्राता भरत याने आपले दोन्ही कर, त्या पादुका प्राप्तीसाठी श्रीरामांच्या चरणाजवळ नेले. प्रभूंनी आपल्या पादुका, भरताच्या करात सोपविल्या.
मोठ्या हर्षानें आणि उल्हासाने, त्या पादुका आपल्या मस्तकी धरल्या. प्रभूंनी, भरताला अती हर्षाने आपल्या हृदयाशी धरले. चारही नेत्रातून सहस्त्र धारा सुरू झाल्या. ते पाहून, उपस्थित सहस्रावधी नेत्रातून अगणित अश्रुधारा सुरू झाल्या. जणू की, या भूवर अवकाशातून, सुरवरांनी, वरुणाने सृष्टीवर आनंद वर्षाव केला असावा, असाच भास, बघणाऱ्या त्रयस्थ व्यक्तीला या विहंगम दृश्याने झाला. सर्व समुदायाला या अलौकिक दृश्याने, रोमांचित केले.
(कदाचित या जगतातील सर्वात प्रथम श्रीराम पादुका असतील)
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२८/०७/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment