मला सुचलेली, एक काल्पनिक लघुकथा, कृष्ण सुदामा यांची.-
ll दोन अश्रू ll
ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे कृपया याचा पुराणात संदर्भ शोधू नये.
श्रीकृष्ण सुदामा बालपणीचे मित्र. सांदीपनीऋषींच्या आश्रमातून अध्ययन पूर्ण करून बाहेर पडले आणि आपापल्या गृही परत आले. कृष्ण अर्थातच मथुरेत आणि सुदामा आपल्या गावी परत गेला. कृष्ण कालांतराने खूप मोठा राजा झाला, ज्याची कीर्ती अर्थातच चारही दिशेला पसरली. पुढे रुक्मिणी सह इतर राण्यांशी त्याचा विवाह झाला. काळ पुढे निघून गेला होता. सुदामा एका गरीब ब्राम्हण कुटुंबातील होता. त्याचाही तश्याच सामान्य परिस्थितीतील गरीब कुटुंबातील मुलीशी विवाह झाला.
सामान्य गरीब माणसाचा जसा संसार असतो, तसाच त्याचाही संसार होता. पूजाअर्चा करून, कीर्तन प्रवचनं करून आपल्या कुटुंबाचं पोट भरताना, त्याचा जीव मेटाकुटीला येत असे. कित्येक वेळा अर्ध पोटी, तर कधी उपाशी पोटी नवरा बायकोला झोपावं लागे. कारण पाच सात कच्ची बच्ची होती. त्यांचं पोट भरून उरलेल्यामध्ये नवरा बायकोची गुजराण होत असे.
सुदामा प्रतिरात्री झोपतेवेळी हात जोडून प्रार्थना करून झोपत असे. ते करताना या मेटाकुटीस आणणाऱ्या आयुष्याची खंत, बायकोची बोलणी, मुलांच्या मागण्या, त्या पूर्ण न करू शकण्याची विवषता, यांनी नकळत प्रार्थना करताना, प्रत्येकी एक अश्रू, त्याच्या दोन्ही डोळ्यातून, ओघळत असे. हा प्रतिरात्रीचा क्रम नित्य चालू होता वर्षानुवर्षे.
सुदामा घरच्यांना, आपल्या बालपणीच्या मित्राच्या अर्थात कान्हाच्या आठवणी सांगायचा. खरतर इतका मोठा राजा आपल्या पतीचा मित्र असेल, यावर बायकोचा आणि त्या अनुषंगाने मुलांचादेखील विश्वास बसत नसे. एके दिवशी वैतागून रागामध्ये पत्नीने सुदाम्याला म्हटलं,
"जर एवढा मित्र म्हणवता आणि तोही इतका मोठा राजा आहे, तर त्याच्याकडे जाऊन या की."
संकोचाने नकार देणाऱ्या सुदाम्याला त्या दिवशी मात्र पत्नी म्हणाली
"अहो फारतर ओळखणार नाही, परत या. आहे तीच परिस्थिती राहील. पण ओळखलं तर काही तरी देईलच मित्र म्हणून."
सुदामा म्हणाला की
"मी मागणार नाही."
पत्नी म्हणाली
"हरकत नाही पण जाऊन तर या. तुमच्या त्या मित्राला काय प्रिय आहे."
सुदामा म्हणाला
"त्याला दही पोहे खूप प्रिय, अतिप्रिय आहेत."
पत्नीने एका पुरचुंडीत दही पोहे भिजवून दिले. सुदामा मजलदरमजल करत कृष्णाच्या राजप्रसादाबाहेर पोहोचला. अर्थातच पहारेकऱ्यांनी खरतर, आधी थट्टा केली. हा असा फाटका, गरीब माणूस, महाराजांचा मित्र. तरीही त्यांनी सुदामाच्या आग्रहाखातर महाराजांना संदेश धाडला की, एक गरीब ब्राम्हण आला आहे, जो आपला बालमित्र असल्याचं सांगतोय आणि त्याचं नाव सुदामा आहे.
अर्थातच कृष्ण, फक्त सुदामा हे नाव ऐकून सिंहासनावरून उतरून धावतच सुदाम्याला न्यायला येतो. हे पाहून सर्व राण्या, सेवक अचंबित होतात. कृष्ण मात्र, या कशाचीही पर्वा न करता, सुदाम्याचे चरण धुण्यासाठी, सुदाम्याला चौरंगावर बसवून, मोठी परात आणि दोन चांदीच्या पात्रात जल आणि क्षीर मागवतो. संकोचलेल्या सुदाम्याला बळेबळे बसवून, त्याचे चरण आपल्या हातानी शुद्धजल, क्षीर आणि उष्णोदकाने धुतो.
कृष्णाच्या हातांचा स्पर्श होताच, मार्गात लागलेल्या काट्यानी झालेल्या जखमा, आयुष्याचे टक्के टोणपे खाताना, अनवाणी पायांना झालेल्या जखमा व त्यांचे व्रण कुठच्या कुठे निघून गेले. सुदाम्याचे दोन्ही चरण एखाद्या राजाच्या चरणां प्रमाणे सुंदर झाले. त्वचा तेजस्वी, कांती तजेलदार झाली आणि मुखावर एक वेगळी प्रभा आली. सर्व आदरातिथ्य झाल्यावर कृष्ण, सुदाम्याला त्याचा परिवार, मुलं, पत्नी याबद्दल विचारतो. सर्व विचारपूस झाल्यावर आग्रहाने त्याला, त्याच्या वहिनीने अर्थात सुदाम्याच्या पत्नीने काय दिलं ते मागतो.
संकोचलेला सुदामा, आधी आढेवेढे घेतो. परंतु नन्तर जेंव्हा कृष्ण मैत्रीची शपथ घालतो, तेंव्हा नाईलाजास्तव पुरचुंडीत गुंडाळलेले पोहे कृष्णाला देतो. कृष्ण अत्यानंदाने पुरचुंडी उघडून मटामट पोहे फस्त करतो. सर्व अतिथ्य झाल्यावर चार दिवस पाहुणचार घेऊन व रुक्मिणीदेवींनी दिलेल्या भेटवस्तू व शिधा घेऊन पुनः संकोचलेल्या अवस्थेत परत माघारी येतो. अर्थात घरापाशी आल्यावर त्याला, कृष्णाने प्रत्यक्षात युगानु युगाची भेट देऊन, आपल्याला कायमस्वरूपी गर्भश्रीमंत केलंय, हे समजत.
इकडे कृष्ण सुदाम्याच्या भेटीनंतर आपल्याला देण्यात येणाऱ्या अन्नात, लवण न विसरता आवर्जून घालण्यास सांगतो. सर्वांना आश्चर्य वाटतं की इतके दिवस लवण न घेता, आळणी जेवणारा कृष्ण, अचानक लवण घाला असं का म्हणाला. याबद्दल रात्री शयनगृहात धाडस करून रुक्मिणी कृष्णाला विचारते की,
"इतके दिवस आपण लवण नाममात्र देखील न घेता जेवत होतात आणि आज अचानक आपण लवण घालून अन्न शिजवायला सांगितलंत. यामागे काय गुह्य आहे सांगाल का."
कृष्ण हसून म्हणाला
"रुक्मिणी त्यामागचं गुह्य ऐक. इतकी वर्षे सुदामा, रोज रात्री, सर्व कामधाम झाल्यावर, नित्य, नारायणाचा जप करून, आपल्या दिवसभरातील कष्टांना आठवून , जमाखर्चाचा ताळमेळ लावता लावता मेटाकुटीला येऊनही, न चुकता उपासना करत असे. परंतु एकदाही त्याने देवा यातून सोडवं, अशी विनवणी केली नाही. पण या प्रतिरात्रीच्या ध्यानात तो दोनच अश्रू ढाळत असे.
ते अश्रू, ही त्याची मला घातलेली साद असे. मी देखील त्याला मदत करण्यास उत्सुक असे. परंतु सर्व बंधनं, मोह सोडून तो माझ्याकडे येईल, त्याच क्षणी मी त्याला सहाय्य करणे शक्य होतं. या माझ्या अगतिकतेमुळे मला देखील रडायला येत असे, पण दोनच अश्रू प्रतिरात्री. या चारही अश्रूंचं मोल म्हणून मी लवण न घालता, अन्न शिजवण्यास सांगितलं, इतकी वर्षे. त्याचं मोल त्या पुरचुंडीतील मूठभर पोह्यांनी फेडलं आणि माझी आळणी जेवण जेवण्यातून सुटका झाली. त्या सुटकेच्या परतफेडी साठी त्याला अक्षय दान दिलं, त्याने न मागता. कारण मला माहित होतं की, सुदामा मागणार नाही. खरा मित्र आहे. परंतु त्याच्या रोजच्या दोन अश्रूंची जाण ठेवणं, हे माझं पण कर्तव्य होतं."
रुक्मिणी कितीतरी वेळ देवाच्या भक्ताप्रति असलेल्या प्रेमाने आनंदित झाली.
©® कथाकल्पना, विस्तार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०४/२०२०
१४:४८
९०४९३५३८०९
८४२२९९००९२
Comments
Post a Comment