भोग आणि ईश्वर १४४
कित्येकांना व्यवसायचं स्वरूप बदलावं लागलं. कित्येक व्यवसाय हे सद्यस्थितीत होऊ शकत नाहीत म्हणून बंद झाले वा करावे लागले. कित्येकांचे दैनंदिन कमाईचं साधन नष्ट झालं किंवा सध्यासाठी स्थगित झालं. अशी कित्येक प्रकारची स्थित्यंतरं फार कमी काळात म्हणजे वर्षांपेक्षाही कमी वेळेत घडून आली. इतक्या मोठया प्रमाणावर वैश्विक पातळीवर परिणाम करणाऱ्या घटना वा वादळं येणं हे, असुरी वा दैत्य प्रवृत्तीचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावर वाढणं, याचं विशेष लक्षण आहे हे आधीच्या भागात पाहिलं.
सद्यस्थितीत त्यावर श्रीगणेश उपासनेचा पर्याय वा मार्ग आपण तातडीने सुरू केला. पण तरीही एक विचार मनात येतो की, कर्म हाच जर सर्व जन्माचा पाया आहे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माचेच भोग भोगावे लागतात, तर अशी कोणती सामूहिक कर्म आहेत, ज्यायोगे हा सामूहिक भोग सर्वांच्या नशिबी वा प्रारब्धात आला. यावर आज चिंतन करूया.
गेले कित्येक दिवस वा महिने यावर सतत चिंतन करताना काही गोष्टी समजल्या वा जाणवल्या, त्याच मांडण्याचा प्रयत्न करतो. थोडं विस्ताराने मांडतो म्हणजे समजून येईल. या जगतात प्रत्येकाचं कर्म लहरींच्या रुपात नोंदलं जाऊन त्याची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत फलस्वरूपात योग्य वेळी प्राप्त होते, हे आपण जाणतो आणि नित्य अनुभवतो. यातून कोणताही जीव सुटत नाही. किंबहुना या ब्रह्मांडात असलेली सजीव वा निर्जीव कोणतीही वस्तू या नियमातून सुटत नाही.
आता आपण म्हणू की सजीव ठीक आहे. पण निर्जीव गोष्टीचं काय. तर त्याचं उत्तर भगवद्गीतेत भगवंतानीच दिलेलं आहे. आपले वेद पुराण शास्त्र हेच सांगतात की, प्रत्येक निर्माण झालेली गोष्ट वा वस्तू वा जीव हा नष्ट होईल. म्हणजे भगवंताच्या संकल्पनेतून सृष्टी निर्माण होतानाच प्रत्येकाचं आयुष्य कर्माधिष्टीत बांधण्यात आलं. म्हणजेच प्रत्येक कणाचं सुद्धा आयुष्य निहित आहे म्हणजे ठरलेलं आहे.
एक उदाहरण देतो म्हणजे मुद्दा लक्षात येईल. एखादं झाड वा मोठा वृक्ष आपण काही कारणास्तव कापतो किंवा पूर्ण उखडून टाकतो. हे त्या झाडाचं वा वृक्षाचं आयुष्य आहे. रस्त्याने जाता जाता एखादा दगड वा एखादी वस्तू सहज म्हणून आपण उचलून जवळच्या नदीत वा जलाशयात किंवा रस्त्यावर भिरकावून देतो, अगदी काही गरज वा कारण नसताना. हे त्या दगडाचं कर्म झालं की त्या क्षणी त्याची जागा व अवस्था बदलणार आहे.
अशी कित्येक उदाहरणं आपल्याला आठवतील वा लक्षात येतील. यातून मुद्दा सिद्ध होतो की त्यांचंही काही कर्म असणार वा आहेच, ज्यातून या घटना घडतात. अगदी शूल्लक वाटतात, पण खोलात गेल्यास त्यामागे काही कारण मीमांसा आहेच हे लक्षात येतं. पण लगेच मनात येईल की, यावरून वैश्विक घटना, त्यांच्या घडण्याची वेळ व त्यांचा कालावधी हे कसं काय जाणायचं. पुन्हा आपण त्या झाडाच्या उदाहरणाकडे जाऊ. विनाकारण वा कारणास्तव आपण ते एक झाड तोडलं असेल हे गृहीत धरलं तरी, त्या कर्माचं फल प्राप्त करण्याची क्रिया तिथे सुरू झाली, हे तर नक्कीच.
आता अश्या अनेक झाडांच्या नष्ट होण्याचं, कारण सर्वज्ञात आहे ते म्हणजे वाढती शहरं, नगरं आणि त्यामागे कारण बदललेली जीवनशैली, राहणीमान. पण आपण ज्ञात वा अज्ञातपणे करत असलेल्या कर्माचं फल ज्ञात वा अज्ञातपणे प्राप्त होणारच. आता या शहरीकरणासाठी कापण्यात आलेली झाडं, नष्ट झालेले जीव आणि कदाचित उध्वस्त झालेले संसार हे प्रत्यक्ष ज्यांनी केलं, त्यांच्या या कर्मात आपण त्या त्या इमारतीत वा संकुलात जागा घेऊन एकप्रकारे साथच दिली. यात गैर वा योग्य हा मुद्दाच नाही. पण हे एक उदाहरण आहे. कर्म दोन प्रकारची असतात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष. अशी म्हणजेच या उदाहरणात मांडलेली कर्म ही अप्रत्यक्ष या प्रकारात येतात.
शिवाय अश्या कर्माच्या संचयात अनेकांचा सहभाग, साथ असल्यामुळे त्याना सामूहिक कर्म म्हणतात. अश्या कित्येक वर्षे साठलेल्या सामूहिक कर्मातून निर्माण होणाऱ्या वा झालेल्या सामूहिक लहरी, आपल्या लक्षापर्यंत जाऊन, त्याचा संदेश व परिणाम तितकाच प्रभावीपणे, तितक्याच ताकदीने परत घेऊन येणार हे तर नक्कीच. कारण तो तर विधात्याचा नियम आहे आणि आपण त्या नियमाने बद्ध आहोत.
हेच चिंतन उद्या पुढे नेऊ. तोपर्यंत नाम घ्या आणि साधनेत रहा, त्यातूनच नक्की मार्ग मिळतील.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment