Skip to main content

भोग आणि ईश्वर १५१

भोग आणि ईश्वर  १५१
 
 खरतर नाम घेण्यात अडचणी, आपण अर्थात आपलं मनच निर्माण करत असतं आणि मनाला यासाठी भरीला पाडते माया आणि षड्रिपु. वास्तविक हे बाहेर नसतातच, तर आतच ठाण मांडून बसलेले असतात. ज्या ज्यावेळी त्यांना आपलं अस्तित्व धोक्यात आलेलं दिसतं, त्या त्यावेळी ते बंड करून उठतात. पण बंड करतात म्हणजे नक्की काय करतात, तर अश्या अश्या युक्त्या वापरून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की आपण हतबल होऊन म्हणतोच , हे काही माझं काम नाही, असं म्हणून सोडून देतो.

वास्तविक अशक्य आणि हतबलता हे शब्द मानवी कर्मांना लागू होत नाहीत, इतकी अचाट आणि अफाट इच्छाशक्ती आणि मनोनिग्रह मानवाला वरदान स्वरूपात प्राप्त झाले आहेत, इतके की, नराचा नारायण होऊ शकतो. इतकी मोठी झेप साधा मानव घेऊ शकतो, तो फक्त मनोनिग्रह आणि इच्छाशक्ती या पाठबळावर. ही दोन कर्मरथाची दोन अंग आहेत. 

या जोडीच्या आधारावरच अनेक विक्रम मानवाने संपूर्ण विश्वात प्रस्थापित केलेत. बऱ्याच हिंदी चित्रपटात घासून पुसून गुळगुळीत झालेलं  एक वाक्य अजूनही असतं. ते म्हणजे तुम अगर चाहो तो क्या कुछ नही कर सकते. हे खऱ्या अर्थाने प्रोत्साहित करणारं वाक्य आहे. याचा सरळ सरळ संबंध हा,  मनातील इच्छाशक्तीशी आहे. 

चाहो म्हणजे इच्छिलेस तर.  म्हणजे आधी इच्छा, मग त्या इच्छेमागे दृढतारुप शक्ती, निग्रहरुप ऊर्जा,  निष्ठारुप आत्मशक्ती आणि श्रद्धारुप कवच जर कामाला लावली तर कर्म हे गतिमान होऊन नकार, विलंब व गतिरोधकता निर्माण व्हायचा प्रश्नच निर्माण होणार नाही. इतक्या सर्व विवेचना मागचा मतितार्थ आपणच आपल्याला मागे ओढतो वा पुढे नेतो. 

आपल्या कोणत्याही इच्छेमागे हे चारही अश्व दृढता, मनोनिग्रह, निष्ठा आणि श्रद्धा असतील तर मग, आपल्या कर्माच्या मार्गात कोणत्याही विघ्नाला दूर करायला प्रत्यक्ष ईश्वरालासुद्धा सहाय्यभूत व्हावं लागतं. मनाच्या अश्याच अवस्थेला साधना म्हणतात.  म्हणजे ही खरी साधना. मग ते क्षेत्र कोणतंही असो आणि इच्छा सरळमार्गी वा वाममार्गी का असेनात. याचं उदाहरण म्हणजे अनेक असुरांनी आपल्या असुरी इच्छेच्या आणि महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी निग्रहपूर्वक केलेल्या तपामुळे प्रत्यक्ष देवाधिदेव सुद्धा प्रसन्न होऊन वर देते झाले. 

त्यापुढील कथा ही त्या असुरीशक्तींच्या कुकर्माचं फलित आहे , तो भाग वेगळा. पण इतक्या वाईट व जगाच्या विनाशाची इच्छा बाळगून केलेल्या तपसाधनेलासुद्धा परम शक्तीला वा ईश्वराला यश द्यावं लागतं. म्हणूनच अश्या प्रकारे मिळवलेल्या  यशालाच, यश खेचून आणणं म्हणतात. 

एवढ्या सगळ्या विवेचनामागे एक सूत्र सापडतं, ते म्हणजे कोणत्याही प्रकारच्या इच्छामागे हे चार अश्व,  त्यांना जोडणारा कर्मरूप लगाम आणि त्यांना चालवणारी आत्मशक्ती जर असेल तर ईश्वराला सहाय्य करावंच लागतं. ईश्वर हा दोन प्रकारच्या व्यक्तींना वा कर्माला वश होतो. एक  म्हणजे दृढता, निग्रह, निष्ठा आणि श्रद्धा यांसह केलेल्या कर्माने आणि प्रेमपूर्वक शरणागत होऊन केलेल्या भक्ती वा साधना केल्यामुळे. 

म्हणजे आपणच आपल्या साधनेची मर्यादा आखू शकतो किंवा तिला अमर्यादीत्व प्राप्त करून देऊ शकतो. निग्रहाने ठरवा, दृढपणे पुढे चला, निष्ठेने मार्गक्रमण करा आणि श्रद्धापूर्वक साधना करा, मनाच्या कोणत्याही विकृती वा विकार वा अवस्था आपल्या साधनेच्या मार्गात येणार नाहीत. 

विचार करा, साधनेत दृढता आणा सद्गुरुरुप ईश्वर साहाय्य करेलच आणि अडचणीतसुद्धा साधनेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेईल आणि अडचणी आल्यातरी तारून नेईल.

 बघूया  उद्या यावरच पुढील चिंतन. 

अजूनही ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प
क्रमांकावर संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३०/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...