Skip to main content

भोग आणि ईश्वर १४५

भोग आणि ईश्वर  १४५
 
गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे व मांडलेल्या उदाहरणा प्रमाणे अश्या अनेक प्रकारच्या सामूहिक कर्माच्या शृंखलेतून सामूहिक फलगती तयार होते. ज्याच्या पक्व होण्याने सामूहिक भोग भोगण्याची वेळ सर्वांवर येते. यामध्ये पुन्हा प्रत्यक्ष परिणाम झालेले आणि त्यामुळे क्षतिग्रस्त हे एक, प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षपणे भरडले गेलेले दोन आणि या चक्रातसुद्धा काहीही क्षती वा परिणाम न झालेले तीन. असे तीन प्रकारचे लोक या काळात असू शकतात किंबहुना असतील असा माझा कयास आहे.

तिसऱ्या प्रकारात ती लोक ज्यांना शारीरिक, मानसिक,  आर्थिक वा वैद्यकीय अश्या कोणत्याही प्रकारची काहीही क्षती वा परिणाम भोगावा लागला नाही. कदाचित असे लोकं फार थोडेच असतील, पण असतील नक्की आणि या मध्ये गर्भश्रीमंतच असतील असा गैरसमज बाळगू नका. कदाचित मध्यम वा साधारण परिस्थितीत असलेले लोकसुद्धा, यात असू शकतात. अश्या प्रकारच्या काळात, त्यांच्या कर्मानुसार त्यांची यातून वाचण्याची सोय, त्यांच्या प्रारब्धाने होते आणि ते सुखरूप राहतात. त्यांच्या गाठीशी असलेले पुण्य आणि त्यायोगे विधात्याची कृपा हादेखील समसमा संयोग असू शकेल.  विश्वास ठेवा पण असे लोक नक्कीच असतील. 

दुसऱ्या प्रकारचे म्हणजे प्रत्यक्ष परिणाम न भोगलेले पण अप्रत्यक्षपणे यातून जावं लागलेले असे लोक.  तुलनेने कमी पुण्यवान वा कर्मगतीच्या फेऱ्यात असलेले, पण पूर्वार्धात  कमी वाईट कर्म केलेले असे लोक यात येतात. यांना त्यांच्या पूर्वकर्मातील गतीनुसार प्राप्त परिणाम भोगावे लागतात. पण त्यातूनही सुखरूप सुटून, कमी क्षतीने पण जास्त कष्ट करून हे बाहेर येतात.

पहिल्या प्रकारात मात्र ते लोक येतात, ज्यांच्या गतीनुसार त्यांना या चक्रातील सर्वात उग्र परिणाम भोगावे लागतात. यांच्याबरोबरच यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनासुद्धा या अग्नितून जावं लागतं. दुर्भाग्याच्या या फेऱ्यात यांच्या कर्माच्या बऱ्याच फलांचा हिशोब चुकता होतो. खुपजण दुर्भाग्याचे दशावतार पाहतात. यांच्या मागील कर्माचे अनेक घडे या काळात रिते होतात. याशिवाय कुटुंबाला सुद्धा याचे परिणाम काही काळ भोगावे लागतात. यातून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग भोगूनच यातून यांची सुटका वा मुक्ती होते. मुक्ती म्हणजे या देहातून  मृत्यूने सुटका. 

या व्यतिरिक्त एक प्रकार जो माझ्या चिंतनात आला आहे. तो म्हणजे एरवी अर्थात असा फेरा यायच्या आधी, सर्व सामान्य परिस्थितीत,  ज्यांनी आधीच अश्या दुष्टचक्रातून जाण्याची अग्निपरीक्षा, व्यक्तिगत पातळीवर दिलेली आहे, अश्या काही जणांचे भोग आश्चर्य कारकरित्या सदर चक्रात सुटतात वा संपतात. अश्या लोकांना सदर काळात दिलासादायक बातम्या, परिणाम समोर येतात आणि दुःखाच्या आगीत अधिक झुरत असलेल्या या लोकांना, त्यांच्या तपसाधनेचे लाभ या काळात प्राप्त होतात, हे सत्य आहे.

यात एक प्रश्न जो माझ्या कडे आला, त्याचं सर्वांसाठी उत्तर दिलं तर सर्वांना लाभ होईल. प्रश्न असा की, एखाद्या अप्रत्यक्षपणे घडलेल्या पाप कर्मात आपला हिस्सा आपण नाकारू शकतो का, जसा तो वाल्याकोळ्याच्या कुटुंबाने नाकारला. यात माझं उत्तर असं आहे. 

मुळात कर्म हे काया वाचा आणि मन या तिन्हीतून घडतं. कोणत्याही कर्माचे अप्रत्यक्ष लाभार्थीसुद्धा त्या कर्माच्या घडण्याने दोषी असतात. आपण एखाद्या बरोबर जन्माने, विवाहसंबंधाने वा अन्य कारणाने बांधले जाणं, हेच मुळात आपल्या पूर्वसुकृताचं फलित आहे. म्हणजे त्यातच आपल्या पुढील भोगांची सुरवात लिहिली गेली आहे. आपण या व्यक्ती, संस्था वा त्या घटनेशी जोडले जाणं, हाच आपला दुर्भाग्ययोग, आपण आधीच्या कोणत्यातरी कर्माने लिहिला आहे. ज्याच्या परिणामस्वरूप आपण त्या ठिकाणी आलो आहोत. 

प्रस्तुत वाल्मिकी महर्षींच्या पूर्वकाळातील कुटुंबाबाबत माझ्या वाचण्यात फार काही आलं नाही. पण म्हणजे त्या पापकर्मा तील त्यांच्या अप्रत्यक्ष सहभागाचे काहीच परिणाम त्यांना भोगावे लागले नसतील हे ठामपणे सांगता येणार नाही. पण एक परिणाम जो ठामपणे सांगता येईल तो म्हणजे सदर कुटुंबाला सोडून तप केल्यानंतरच, वाल्याकोळी यांचे वाल्मिकी महर्षींमध्ये परिवर्तन झाले. म्हणजेच या पुण्य योगात त्या कुटुंबाचा त्याग हा त्या कुटुंबियांच्या नशिबातील दुर्भाग्ययोगच म्हणावा लागेल. असं माझं मत आहे. कारण युगानुयुगे ज्यांचं नाव गाजतंय, त्यांना ते नाव, आपल्याला त्यागूनच मिळाले हे नक्कीच त्या कुटुंबाचे पूर्वकर्मफलीत आणि पापातील सहभाग नाकारण्याचा परिणाम असेल. असं मला वाटतं. 

आज इथेच थांबू आणि उद्या नवीन चिंतन घेऊन येईन. तोपर्यंत नाम घ्या आणि साधनेत रहा, त्यातूनच नक्की मार्ग मिळतील. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२४/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...