राम अनुज भरत भाग २७ श्रीराम जयराम जय जयराम!! श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. प्रभू आपल्या कोमल वाणीने, सुकोमल जनक नंदिनी राजदुलारी, विदेहकन्या देवी मैथिली, हिला सर्व काही समजावून सांगत होते. याचवेळी लक्ष्मण तीर कमठा सज्ज ठेवून, नागफण्यासम चारही बाजूला नजर ठेवून, भ्राता व देवी सीता, यांच्या रक्षणार्थ सज्ज होऊन, फिरत होता. अर्थातच लक्ष्मणाच्या या सर्व हालचालींवर, ज्येष्ठ भ्राता श्रीराम याचं लक्ष होतंच. त्या नयनरम्य निसर्गाचं वर्णन करताना प्रभू पुढे म्हणाले. "हे भार्यें सीते, हा एका बाजूला वनाचा विस्तीर्ण, घनदाट झाडीचा प्रदेश आहे. ज्यामधे मधुर मधुर फळं आणि विस्तीर्ण प्रदेशावर सावली देणारे मोठमोठे वृक्ष आणि विविध रंगी, मनमोहक सुगंध देणारी, नाजूक, सुकोमल फुलझाडं आहेत. तर दुसऱ्या बाजूला उंच पर्वतरांगा असलेला, हा चित्रकूट पर्वत आहे." "या पर्वतामधे, अनेक प्रकारचे अनेक रंगांचे धातू, असलेले कातळ आणि त्या कातळाने सुशोभित कडे आहेत. काही पर्वताचे कडे ताम्रवर्णी, काही कडे पित वर्णी, काही गडद काळ्याशार रंगाचे तर काही रौप्य धातू प्रमाणे च...