Skip to main content

भोग आणि ईश्वर भाग ६५६

भोग आणि ईश्वर भाग ६५६

©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 

सूक्ष्म देह हा, स्थूल देहात प्रवेश केल्यावर, गर्भात असताना, कोणत्याही बाह्य गोष्टींचा परिणाम किंवा कोणत्याही बाह्य विषयाशी संबंध आलेला नसतो. त्यावेळी तो शुद्ध स्वरूपात असतो आणि आपल्या आधीच्या कर्मांची माहिती असल्यामुळे, ईश्वराची क्षमायाचना करून, केलेल्या चुकांचं आणि अपराधांचं परिमार्जन करण्याच्या आणाभाका घेत असतं. कारण मृत्यू पश्चात आत्म्यासह गेलेल्या सूक्ष्म देहाला गत जन्मातील गोष्टींचं स्मरण असतं. 

हे स्मरण स्थूल देहात असताना, देहाच्या मर्यादेमुळे विस्मृतीत गेलेलं असतं. म्हणजेच गर्भात तेच स्मरण शिल्लक असतं. पण गर्भरुपातून, बाह्य जगतात येताच, पुन्हा विस्मृतीचा पडदा पडतो. अर्थातच याला देहाच्या, ज्ञानेंद्रियांच्या, कर्मेंद्रियांच्या मर्यादा कारणीभूत आहेत. एकदा बाहेर आलेला बालक या जगताचा होईपर्यंत त्या स्मृती शिल्लक असतात. पण जसजसा देह वाढत जातो. सूक्ष्म देहाला या जगाच्या मर्यादांचा, मायेचा, अतृप्त इच्छा वासना, इत्यादी सहा शत्रूंचा पाश वेधून टाकतो.

त्या क्षणापासून तो जीव गत जन्मातील कर्मांचा हिशोब विसरून, प्राप्त देहाच्या माध्यमातून, नवीन कर्मांचा हिशोब मांडायला सुरुवात करतो. मग आधीच्या कर्माचे हिशोब कोणी चुकते करायचे. या दोन्ही देहांच्या व्यापात आणि व्यवहारात, आधी केलेल्या कर्मांचा शिल्लक ताळेबंद शून्य व्हायचा बाकी असतो. असं काही क्षण समजूया की, प्रत्येक जन्मात त्या त्या जन्मातील हिशोब संपून मगच स्थूल देह नष्ट झाला. तर मग एकतर आयुष्य तितक्या शे वर्षांचं असावं लागेल.

त्याचप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीच्या कर्माच्या चुकांची आणि योग्य कर्मांची पडताळणी आणि निपटारा करण्यासाठी स्थूल देहाची आयुष्य मर्यादा वाढवावी लागेल. जर असं केलं तर. तर पृथ्वीवर प्रथम आलेल्या माणसापासून ते आजपर्यंत जन्मलेल्या माणसापर्यंत अनंत कोटी लोकं या जगतात जगत असतील. त्यासाठी अन्नाचा, शेतीचा, पाण्याचा, निवाऱ्याचा असे अनेक प्रचंड प्रश्न निर्माण होतील. शिवाय तितक्या वर्षात प्रत्येकाची प्रजनन क्षमता पाहता, काही हजार कोटी माणसं आजच्या घडीला शिल्लक असती. 

अनेक प्रश्नांना जन्म देणारा हा मोठा प्रश्न निर्माण झाला असता. म्हणूनच प्राप्त व्यवस्था हीच एक सर्वंकष पद्धत आणि व्यवस्था आहे, हे नक्की. आता हीच विश्वनियंत्याची व्यवस्था, हीच एकमेव योग्य व्यवस्था असं गृहीत धरलं तर, एखाद्या जन्मातील प्रत्येक कर्माला निश्चित कालावधी घालून द्यावा लागला असता. परंतु नियती, निसर्ग, यांना काळाचं बंधन असत नाही. कारण त्या व्यवस्था वैश्विक पातळीवरील आहेत. म्हणून त्यांच्या संकल्पना जरी प्रत्येक ग्रहावर वेगवेगळ्या असल्या तरीही आपण ज्या ब्रम्हांडात आहोत आणि ज्या पृथ्वी नामक ग्रहावर आहोत, तेथील घालून देण्यात आलेली काळाची आवश्यकता, मर्यादा, बंधनं हे फक्त देहाला लागू पडतं. 

परंतु ईश्वरी व्यवस्था ही, आत्मा आणि त्यासोबत असलेल्या सूक्ष्म देहाला जाणत असल्यामुळे, तोच सर्व संकल्पना व सर्व ईश्वरी संकल्प यांचा पाया आहे. म्हणून कर्म या सिद्धांताचा पाया सुद्धा आत्मा व सूक्ष्म देह आहेत. शरीर हे सूक्ष्म देहाने, स्वतःच्या इच्छा, वासना व आकांक्षा यांच्या पूर्तीसाठी धारण केलेलं आवरण किंवा istrument आहे. म्हणूनच मानवी दृष्टीला आणि शारीरिक, देहिक मर्यादांच्या दृष्टीने आपल्याला मानव म्हणून काही गोष्टी अकल्पनीय वाटल्या, किंवा समजायला जड असल्या तरी, एकूण ईश्वरी व्यवस्थेत ते योग्य आणि नियती किंवा ईश्वरी नियम व संकल्प यांना धरूनच आहे.

कित्येक गोष्टी आपल्याला देह सरल्यावर आत्मरुपात गेल्यावर समजतात. त्यावेळी आपल्याला, आपण नुकत्याच सोडलेल्या देहात केलेल्या ढोबळ ते सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टी, चुका, योग्य अयोग्य, या गोष्टी दिसतात, जाणवतात, समजतात. त्यांच्या परिमार्जनासाठी आत्मा नित्य हळहळ व्यक्त करून, नवीन देहाच्या माध्यमातून, त्या चुका, प्रमाद, अपराध यांना सुधारण्याची नित्य विनवणी ईश्वराकडे करतो. त्याच्या योग्य त्या परिणामाने पुन्हा नवीन देह प्राप्त होतो. 

प्राप्त देहात गर्भात असे पर्यंत आत्म्याला त्या गोष्टीची जाणीव असते, की आपण हा देह का मागितला. पण जगात प्रवेश झाल्यावर, सूक्ष्म देह आणि स्थूल देह पुन्हा सांसारिक कार्यासाठी संस्कारित होतात किंवा घडत जातात. दोन्ही देहांच्या व्यापात आत्म्याच्या मूळ स्वरूपाची आणि संकल्पाची जाणीव पूर्ण विरून जाते. हेच चक्र नित्य सुरू राहतं. कर्मांच्या बेरजा आणि वजाबाक्या करण्यात क्षण, पळे, घटिका, आयुष्य आणि जन्म जातो. 

मग या सर्व चक्राला भेदण्याचा विचार किंवा या ज्ञानाची जाणीव सुद्धा सर्वसामान्य माणसाला संसारात राहत नाही. पण मग यावर काय मार्ग ईश्वराने निर्माण केला आहे. किंवा ईश्वराच्या संकल्पनेत, आत्मा असाच जन्मोजन्मी पिचला जावा हेच आहे का. यावर पुढच्या भागात विचार करूया. तोपर्यंत नामाच्या धाग्याने, आत्म्याच्या ऊर्जेने आणि देहाच्या यंत्रावर मन बुद्धी चित्त यांच्या सहाय्याने, नामाचं तलम वस्त्र विणण्याचा प्रयत्न सुरू ठेवूया. एक दिवस एखाद्या जन्मात हे वस्त्र नक्कीच विणून तयार होईल. 

तोपर्यंत जय श्रीराम!! 

©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/१०/२०२५
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...