Skip to main content

Posts

अध्यात्म विराम ५९

अध्यात्म विराम ५९ मन हे कसं आहे याबद्दल काल चिंतन केल्यानंतर, आज बघुया की तेच मन स्मरण, अर्चन आणि वंदन या शुभ सात्विक कार्यात एकाग्र होऊन, लीन व शरणागत का होत नाही. मन हे कायम, ज्याच्या पाठी आपण त्याला नेण्याचा प्रयत्न करतो,त्या पासून नेहमी, दूर दूर जाण्याचा प्रयत्न करतं. याचं महत्वाचं कारण मनात दडलेलं आहे. मन हे ओढून नेण्याचा प्रयत्न केल्यास, अवखळ खोंडा प्रमाणे किंवा खट्याळ वासरा प्रमाणे, दावणी सोडवून घेण्याचा प्रयत्न करतं. दावणी पासून सोडल्यास, उधळल जातं.  सहजच आठवून पहा, शाळेत असताना, सलग दोन तीन तास गणित, शास्त्र, विज्ञान या विषयांचा अभ्यास करावा लागला की,मन कंटाळून जातं व त्या नंतरच्या तासाला आपलं लक्ष अजिबात लागत नाही. याला कारण एकतर ते वय,त्या विषयांचा असलेला कंटाळा आणि इतर विषयांची मनाला असलेली ओढ. पण त्याच वेळी, पुढचा तास, खेळाचा असेल, तर मनातील उत्साह द्विगुणित होतो आणि मनाला तीच ऊर्जा पुन्हा प्राप्त होते. म्हणजे आवड नसलेल्या गोष्टींमधे मन रमत नाही आणि तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करते.  उलट आवडत्या विषयात मन उत्साहाने सहभागी होतं आणि दुप्पट ऊर्जेने विषयात रममाण होतं. ...

अध्यात्म विराम ५८

अध्यात्म विराम ५८    मन ही गोष्ट मोठी विचित्र आणि अद्भुत गोष्ट आहे. ती शून्यात नेण्यासाठी मोठा प्रयास करावा लागतो. योग याग, ध्यान धारणा इत्यादी राजमार्ग अवलंबावे लागतात, अनेक वर्षांची साधना आणि खडतर परिश्रम करावे लागतात. तरीसुद्धा हजार वर्ष तप करूनदेखील एखाद्या मोहाच्या मेनकेमुळे तपोभंग होऊ शकतो तो वेगळाच. मनोनिश्चय वगैरे गोष्टी मनाला समजत नाहीत. पण विवेक, विचार आणि संयम या त्रयीने साधना करत गेल्यास, काही यश नक्की मिळू शकेल. ती सवय मनाला जडवायला तेवढे प्रयास घ्यावे लागतात. पण शास्त्रात, वेदात, यावर अभ्यासपूर्ण चिंतनशील विचार करून, विविध मंत्र, स्तोत्र इत्यादी साधन, मानवाला उपचार व आचार या स्वरूपात मांडण्यात आले. यातील सर्व आचार उपचार यांचा अर्थ, भावार्थ व उद्देश, हा ईश्वर भक्तीत मन रममाण करून,नित्य त्या आराधनेत, प्रार्थनेत, मनाला रमवावे.   त्या नादात मनाला गुंग होण्याची सवय लागून, काही क्षण मनाला शांत व्हावे. या सर्व उपचार आचार यांचा मतितार्थ एकच आणि इतकाच आहे की, मनाला अशी काही क्षण साधनेची सवय जडवून घेतली की, मनाची उच्छृंखलता कमी कमी करत, त्याला विशिष्ट नादाची, नाम...

अध्यात्म विराम ५७

अध्यात्म विराम ५७   या अपूर्णता भावावर आजच्या भागात पुढे चिंतन करूया. कालचा विषय सुरू करताना, एक उदाहरण घेऊ म्हणजे विषय स्पष्ट होईल. आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील, तर त्यांची विभागणी दोन भागात करता येईल. एक खास किंवा आपल्या मनात ज्यांच्या बद्दल आपुलकी आहे असे आणि दुसरे ज्यांच्यावर आपली खास मर्जी नाही, किंवा जे फारसे आवडते नाहीत असे. बघा आठवून बघा. आता दुसऱ्या प्रकारचे पाहुणे येतात त्यावेळी, आपण जे जे आगतस्वागत, मानसन्मान, आदर आतिथ्य, खान पान करतो, ते उपचार म्हणून किंवा तोंददेखलं करतो. त्यामागे कारणंही तशीच असू शकतात. एकतर आपले व त्यांचे विचार फार जुळत नसतील, त्यांची वागणूक आपल्या मनाजोगती नसावी, त्यांच्याकडून आपण केलेल्या काही अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतील. त्यामुळे कदाचित, आपल्याला त्यांच्याबद्दल फारशी आपुलकी नसते, या व अश्या अनेक कारणांनी आपलं वागणं औपचारिक असू शकतं.  या उलट, पहिल्या प्रकारातील पाहुणे आले की, आपण त्यांचं आदर आतिथ्य, मान सन्मान, खान पान विशेष आदराने, अगत्याने आणि विशेष स्नेहाने करतो. याची सुद्धा अनेक कारणं असू शकतात. त्यांचे आपले विचार मिळते जुळते असू शकत...

अध्यात्म विराम ५६

अध्यात्म विराम ५६ वंदन हे आहेत मात्र तीन शब्द. पण त्यामागे कृती, देह, बुद्धी, मन, प्राण आणि आत्मस्वरूप यां पाचांना आपल्या आराध्यासमोर अर्थात त्या सत् चित् आनंद स्वरूप परम इश्वरासमोर नत होऊन, त्या शक्तीची आराधना, वंदना, अर्चना व प्रार्थना रूप भक्ती करतात,हा भाव व ही स्थिती अपेक्षित आहे. म्हणजे जे श्रवणा तून हृदयात पोचलं, ते स्मरण रुपात हृदयी दृढ धरलं. त्या हृदयस्थ ईश्वराचे पाद सेवन करून,त्या ईश्वराची अर्चना करण्याचा भाव, म्हणजे भक्ती.  आपण ईश्वराची अर्चना, प्रार्थना करतो, तेंव्हा कळत नकळत आपण, त्या शुद्ध सात्विक स्वरूपाला वंदन करून, आपल्या मनातील सकारात्मक लहरी, त्या शक्ती पर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. मुळात अर्चन आणि वंदन ह्या कृती किंवा भक्तीचे हे दोन मार्ग परस्पर पूरक आहेत. दोन्ही हातात हात घालून येतात. कारण आपण एखाद्याची अर्चना, प्रार्थना, करताना मनात तेच भाव उधृत होतात आणि देह आपोआप नतमस्तक होऊन, नकळत वंदन केले जाते. जरा आठवून बघा, आपण जेंव्हा जेंव्हा एखाद्या मंदिराच्या समोरून जातो किंवा प्रत्यक्ष मंदिरात जातो, त्यावेळी नकळत आपले दोन्ही हात जोडले जाऊन, मनात किंवा व...

अध्यात्म विराम ५५

अध्यात्म विराम ५५     आतापर्यंतच्या नवविधा भक्तिच्या सहा भक्तिमार्ग प्रकारांचा चिंतनशील विचार केला तर लक्षात येईल की, आपण एका विशिष्ट साखळीचाच विचार करतो आहोत. किंवा हे एका साखळीचाच भाग आहेत. आपण त्या सर्व शक्तिमान, पूर्णरुप इश्वराबद्दल श्रवण केलं. त्याच नाम रूप स्वरूप, विराटता, विश्वव्यापकता, विविधता आणि तरीही एकात्म असलेली त्याची योग्यता, याबद्दल श्रवण केलं. त्याची ओळख त्याच्या वर्णनावरून, सगुण रुपा तील संकल्पनेवरून, त्याच्या निर्गुण अस्तित्वाची गाथा श्रवण केली. त्याचे गुणवर्णन, कीर्ती, अत्युच्चता, शुद्धता, सात्विकता, ब्रीद, याबद्दल कीर्तन, प्रवचन स्वरूपात ऐकून, भारावून जातो. भक्ती मार्गी होण्यातील ही दुसरी पायरी वा टप्पा आपण पार करतो.त्याचं मनोहारी अस्तित्व,आपल्या अनेकानेक जन्मात, त्याचं आपल्या सोबत असणं, अंशात्मक रुपात हृदयस्थ चेतना, हे सर्व या कीर्तनातून समजतं. त्याबरोबर कुठे जायचं आहे, हे देखील, या भक्ती मार्गातील टप्प्यावर समजतं. कारण सांगणारा ईश्वरीय प्रतिनिधी स्वरूप असतो.कीर्तन हे त्याच्या किर्तीचं वर्णन आहे.  त्याची झालेली ओळख, पटलेल्या खुणा, देहात आल्या वर आण...

अध्यात्म विराम ५४

अध्यात्म विराम ५४    अर्चन करताना अर्थात प्रार्थना, पूजा, करताना एक साहजिक नैसर्गिक कृती,जी सर्व माणसाकडून आपसूक पणे होते,ती म्हणजे हात जोडणे किंवा वंदन करणे. अर्चन भक्ती पश्चात सहावा भक्ती मार्ग जो ईश्वराने, शास्त्राच्या माध्यमातून,जगताला ज्ञात करवून दिलेला आहे तो म्हणजे, वंदन भक्ती. वंदन करणे म्हणजे एखाद्या समोर नतमस्तक होणे.  अर्थात देहाने मान, (यात देहापेक्षा मन खाली झुकवणे जास्त इष्ट आणि अपेक्षित आहे), खाली झुकवून अर्थात आपल्या चरणांकडे नजर करून,दोन्ही कर जोडून, ज्यावेळी आपण लीन भावात, एखाद्या दैवता समोर, सद्गुरू समोर नुसते उभे राहिलो अथवा जमिनीवर नुसते लीन भावात बसून, त्या ईश्वर वा सद्गुरू यांना आपले सर्व भाव एकात्म करून, शून्य अवस्थेत समर्पित झालो की, वंदन भक्ती साध्य झाली.  म्हणजे एका अर्थाने अर्चन भक्ती किंवा प्रार्थना, अर्थात अर्चना आणि वंदना या दोन्ही भक्ती, सखी आहेत म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण एखाद्याची अर्चना करणं आणि त्याला वंदन करणं, दोन्ही वास्तविक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हटलं तरी हरकत नाही.  अर्चना भक्तीत उपासक, आपल्या ईश्वर...

अध्यात्म विराम ५३

अध्यात्म विराम ५३   अर्चना हा शब्द अर्च अर्थात पूजा आणि ना म्हणजे क्रिया करणे, अश्या दोन धातूंपासून तयार झाला आहे. असेच अनेक शब्द आहेत. उदाहरणार्थ प्रार्थना, कामना, चेतना, वासना इत्यादी अनेक. एखाद्या स्वरूपाला, रूपाला, प्रतिमेला, नामाला, चैतन्याला जेंव्हा आपण मनापासून श्रेष्ठ मानतो आणि त्याचे नित्य स्मरण, भजन, कीर्तन, मनन करतो, त्याला आपलं मन, हृदय, प्राण अर्थात श्वास आणि आत्मा यांमध्ये विशेष स्थान देतो आणि त्यांना स्मरूनच आपण नित्य जीवन जगतो, ते खऱ्या अर्थाने अर्चन करणे असं म्हणता येऊ शकेल. जे पूजनीय आहे, पूज्य आहे, पूजा योग्य आहे त्याला वंदन करणे, अर्चन करणे, भजणे, ही अर्चन भक्ती आहे. आता पूज्य म्हणजे काय, याचा अर्थ जाणून घेऊ. पुज् या धातूपासून पूज्य आणि त्यापासून पूजनीय, पूजा योग्य इत्यादी शब्द तयार झाले आहेत. यात मतितार्थ हा आहे की, ज्याची पूजा करावी असं काही. पूजा करणे, पुजणे अर्थात ज्याला मनात अत्यंत विशेष असं स्थान देऊन, त्याला आपला हितकारक, आदर्श, उच्चतम व्यक्तित्व मानणे.  मुळात पूजा हा एक उपचार नसून, ती मनाची एक स्थिती आहे, एक भावावस्था आहे. अर्थात मनाची अशी स्थिती, ज...