Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग ११

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग ११

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥१३॥

वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्‌ ॥१४॥

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर: ।
तथा लिखितवान्‌ प्रात: प्रबुद्धो बुधकौशिक: ॥१५॥

आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम्‌ ।
अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान्‌ स न: प्रभु: ॥१६॥

जगज्जेता हे विशेषण खास करून प्रभू श्रीराम यांच्या बाबत वापरलं जातं. याचं कारण की, श्रीराम त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कोणत्याही असुर वा अन्य शक्तीकडून कधीही पराभूत न झालेले योद्धे म्हणून संबोधले जातात. असे हे जगज्जेते श्रीराम यांचं नाम, त्यांच्या नामांचं हे स्तोत्रमंत्र जे रामनामाने रक्षित आहे. अश्या या रामनाम अभिरक्षित स्तोत्राचं पठण करून त्याला कंठस्त करेल म्हणजेच मुखोद्गत करेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. करस्था: सर्वसिद्धया म्हणजे त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात. शास्त्रीय अर्थ असा आहे की, त्याने स्वहस्ते केलेली सर्व कार्य सिद्ध होतात वा यशस्वी होतात. इतकं महत्व रामरक्षा स्तोत्र पठणाचं आहे.

इथे एक सुंदर शब्द रामनामासाठी श्रीबुधकौशिक ऋषींनी योजला आहे. वज्रपंजर. ज्याचा अर्थ पालखीवरील अभेद्य छत वा आच्छादन. हे  रामनाम छत वा आच्छादन या समान आहे. अश्या श्रीरामरक्षा स्तोत्राचे नित्य पठण करणाऱ्याला या रामनामरुपी कवचाचा लाभ होऊन, त्या व्यक्तीची  कोणत्याही प्रकारची आज्ञा उल्लंघली जात नाही  आणि त्यांच्या आयुष्यात सर्व मंगल होऊन, त्यांना सर्व कार्यात विजय प्राप्त होतो. या रामरक्षेच्या उगमाचा उल्लेख पंधराव्या श्लोकात आढळतो. याचा पूर्ण अर्थ असा, कि ज्याप्रकारे भगवान शंकर अर्थात हर यांनी श्रीबुधकौशिक ऋषींना स्वप्नांत येऊन आदेशित केले किंवा निर्देशित केले, त्याप्रकारे श्रीबुधकौशिक ऋषींनी प्रातः जागृत झाल्यानंतर या रामरक्षेचं लेखन करून ते जगतासाठी उपलब्ध करून दिलं . 

यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे हि रामरक्षा प्रत्यक्ष श्रीशंकरांनी श्रीबुधकौशिक ऋषींना स्वप्नात येऊन दृष्टांत स्वरूपात कथित केली. म्हणजे त्याचे उद्गाता श्रीशंकर आहेत आणि श्रीबुधकौशिक ऋषींनी तो स्वप्नदृष्टान्त साक्ष मानून, श्रीसदाशिवांच्या  आज्ञेचे पालन करत ती लिखित स्वरूपात  त्वरित उतरवून आपल्याला दिली. त्याचप्रमाणे या गोष्टीचा उल्लेख त्याच स्तोत्रात करून निरपेक्षपणे नोंद केली आहे. आदिष्टवान या शब्दाचा अर्थ आदेशीत केलेला. म्हणजेच श्रीरामरक्षा ही एकप्रकारे भगवान शंकराचा आदेशवजा मंत्र आहे. त्यामुळे त्यातील गोष्टींची पूर्तता केल्यास फलप्राप्ती करून देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकृत केली आहे,हे नक्की.

कल्पवृक्ष खरतर सर्व इच्छा पूर्ण करतो. अर्थातच त्याच्या प्राप्तीनंतर अन्य काही प्राप्त करायचं शेश रहात नाही. म्हणजे खरा कल्पवृक्ष सर्व इच्छा आकांक्षा, कामना यांना पूर्णविराम देतो वा देत असावा, देत असला पाहिजे. कारण कल्पनेतील सर्व देणारा वृक्ष तो कल्पवृक्ष. ज्याच्या सर्व इच्छा फलद्रुप झाल्या आहेत तो काहीही करण्याची मनीषा बाळगणार नाही. म्हणजेच त्याच्या चित्तवृत्तींना आराम मिळेल. अश्या  आराम मिळालेल्या वृत्ती फक्त ईश्वराकडेच आकृष्ट होतील. कारण ईश्वर स्मरण हे खऱ्या अर्थाने साधतं ज्यावेळी चित्त स्थिर होतं, आशा व निराशा दोन्ही समाप्त होतात आणि लक्ष फक्त एकाच मार्गाला लागतं.

असा कल्पवृक्षासम आराम देणारा ईश्वर म्हणजे श्रीराम. कल्पवृक्षाने सर्व आशा आकांक्षा याना आराम देणारे रामनाम सकल आपदांना पूर्ण विराम देतं. म्हणजेच या पवित्र नामाच्या सान्निध्यात सकल आपदा निवारण होतात. पण यात थोडं गुह्य आहे. मुळात इच्छा तृप्ती झाल्यावर वा इच्छा शिल्लक न राहिल्यानंतर असे दोन्ही अर्थ कल्पवृक्ष या संज्ञेत आहे. जर इच्छाच नाहीत तर काही मानसिक ताण तणाव नाहीत. म्हणजेसुद्धा चित्तवृत्तींना आराम. तीच गत आपदांची 
आपदांचं भय, परिणामांची भीती असणाऱ्याला. ज्याला माहीत आहे की आपदा या बाह्य प्रेरणेने येतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल भय बाळगण्याची गरज नाही. 

अश्या स्थितीत असलेल्या जीवाच्या बाबत आपदांना विराम आहे. परंतु ही स्थिती ज्ञानी माणसाची. सर्वसामान्य जीवाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी म्हणजेच इच्छा तृप्ती आणि आपदा निवारण करण्यास्तव श्रीरामनाम हे अद्भुत औषध आहे. अश्या सर्व जडजीवांसाठी, त्रैलोक्याला आपल्या मोहकपणाने, सुंदरतेने, प्रसन्न मुद्रेने संतुष्ट करणाऱ्या श्रीराम यांचे नाम पुरेसे आहे. त्यांच्यासाठी ते आरामदायी आणि आपदानिवारक आहे. 

 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग ११.....    
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
२०/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...