Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग २१ व अंतिम

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग २१ व अंतिम

 राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥३८॥

या शेवटच्या श्लोकाची कथा मोठी गूढ आहे. मुळात हे स्तोत्र भगवान शंकर यांनी स्वप्नात दृष्टांत देऊन श्रीबुधकौशिक ऋषींना कथन केलं. श्रीराम नामचं महत्व विशद करणारं हे स्तोत्र आपल्याला पूर्वपुण्याईने पठण करण्याची प्रेरणा व बुद्धी  ईश्वर, सद्गुरू आणि आपलं संचित देतं, इतकं याचं महत्व अलौकिक आहे. म्हणूनच ज्याला तशी बुद्धी झाली त्याने हे नित्य पठण जरूर जरूर करावं. 

शेवटच्या श्लोकाची कथा अशी आहे. एकदा कैलासावर भगवान सदाशिव भोजनासाठी देवी पार्वतीची प्रतीक्षा करत होते. त्यांनी तसं पार्वतीला सूचित केलं की, भोजन उन्ह उन्ह अर्थात गरम आहे तोपर्यंतच करून घेऊ. त्यावर माता पार्वतीने उत्तर दिलं की, मी विष्णूसहस्रनामांचं पठण करते आहे, ते झालं की बसूया. असं बराच वेळ झाल्याउपरांत माता भोजनास आली.

त्यावेळी उपदेशपर कथन करताना भगवान शिवशंकर म्हणाले ," हे सुमुखी (वरानने), पार्वती, मी नित्य राम, राम इति राम इति नामाचा जाप करतो, मी त्या नामात नित्य रमलेला असतो (रमे) , त्या रामनामातच माझं मन रमतं (मनोरमे). हे द्विअक्षरी राम नाम हे विष्णूसहस्रनामाच्या तुल्य आहे ( सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम). इतकं अनन्यसाधारण महत्व या दोन अक्षरी मंत्रात आहे. म्हणूनच या द्विअक्षरी मंत्राचा जाप तू   जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये कर. या द्वारे तुझी सर्व मनोरथं पूर्ण होतील. 

असा सुंदर आणि अद्भुत अर्थ या शेवटच्या श्लोकात दडलेला आहे. अर्थात या गुह्य अर्थाने रामनामाचं महत्व अनुपम झालं.  अश्या या नित्य आनंददायी,  परामसुखदायी, आत्मोद्धरी, श्रीरामरक्षा स्तोत्राचं नित्य पठण करून रामनामाने भौतिक आणि आत्मिक सुखाचा अनुभव करूया. 

लेखकाचं मनोगत : 

प्रथम दोन भाग हे फक्त श्रीरामरक्षेच्या एका श्लोकावर विवेचन स्वरूपात लिहिण्याची सुबुद्धी माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पूर्ण कृपेने झाली. त्या दोन भागात माझ्या गुरूंनी वाचकरुपात मला उद्युक्त आणि  प्रोत्साहित  केलं की, संपूर्ण श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्राचं मी विवेचन करावं. ही गुरुकृपा आणि प्रेरणा मानून मी ते २ भाग पुढे सुरू ठेवून हे कथन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.  यामध्ये माझा सहभाग हा फक्त लिहिता आहे. यामागची पूर्ण प्रेरणा, बुद्धी, चैतन्य, सातत्य, सुसंगती, स्फूर्ती, सुचलेले सर्व विचार हे माझ्या सद्गुरूंचे आहेत. कारण लिहिण्यासाठी कोणतीही बैठक, अवस्था याचा विचार न करता मी  त्या त्या दिवसाचे भाग लिहीत गेलो. हे लवकरच पुस्तिकारूपात प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. गुरुकृपेने तो योगदेखील येईल हा विश्वास आहे.

 पण या दरम्यान मी स्वतःमध्ये अत्यंत आमूलाग्र बदल पहात गेलो. कदाचित हा एखादा आत्म्यायज्ञ होता असे अनुभव या २० दिवसात, व्यक्तिगत पातळीवर मला आले. श्रीरामांची अवस्था वनवास गमनात कशी असेल आणि त्यांनी कसं मनावर नियंत्रण केलं असेल याची जाणीव व अनुभव या वीस दिवसात, मला व्यक्तिगत पातळीवर आला. आजचा मी आणि वीस दिवसांपूर्वीच मी यात जमीन अस्मानाचा बदल झालाय. अर्थात हा बदल मला अध्यात्मिक पातळीवर विशेष जाणवला आणि लक्षात आलं की जसं रामनाम घेण्याची प्रेरणा व बुद्धी होणं हे  सहज नाही तितकंच ते पेलणं सुद्धा सहज नाही. अर्थात यात त्या नामामागची ऊर्जा व चैतन्य याचा प्रत्यय आला. म्हणूनच सद्गुरू स्मरण करून हे नाम घेण्यास सुरुवात करा. जर नाम जप करत असाल तर नित्य पठणाआधी गुरुस्मरण करा. कारण अंती यश ते देतात हा अनुभव या दिवसात मी घेतला.

श्रीहनुमान हे रामरक्षेचं किलक अर्थात किल्ली वा पिन वा कोड आहे हे आपण पाहिलं. असं म्हणतात की म्हणूनच रामरक्षेनन्तर मारुतीस्तोत्र वा त्याचे नाम अवश्य घ्यावे. ज्यायोगे रामरक्षेचं फल आपल्याला देण्यास श्रीरामाकडे आर्जव श्रीहनुमंत करतात आणि आपल्याला त्यांचा कृपाप्रसाद सुपूर्द करतात.  याच कारणाने पुढील विवेचन मारुतीस्तोत्राचं हाती घेणार आहे. माझे सद्गुरू या कार्यात देखील मला ध्येयप्राप्ती करून देतील याबद्दल मी निश्चीन्त आहे. 

 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏
जय श्रीहनुमान !! 🌷🙏🙏
भाग २१ व अंतिम .....    

© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
३१/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...