Skip to main content

श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग १२

श्रीरामरक्षा स्तोत्र  आणि त्याचा भावार्थ भाग १२

 तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥

फलमूलशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥

शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ ।
रक्ष:कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमौ ॥१९॥

आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्‌ग सङि‌गनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम्‌ ॥२०॥

वनवासातील प्रभू श्रीराम यांचं वर्णन करताना ऋषींवर सांगतात की,जे तरुण आहेत, जे रुपसंपन्न आहेत, जे सुकुमार असूनही महाबली अर्थात महाशक्तीशाली व महापराक्रमी आहेत,  पूर्ण उगवलेल्या कमलासम (पुंडरीक म्हणजे तेजस्वी कमलपुष्प)  विशाल नयन आहेत आणि ज्यांनी कृष्ण अर्थात काळ्या हरिणाचं कातडं वस्त्र म्हणून परिधान केलं आहे.  

तरुण आणि रुपसंपन्न अशी दोन विशेषणं ऋषींनी वापरली आहेत. मिथिलनगरीवरून जानकीशी विवाह झाल्यानंतर काही काळातच वनवासयोग नशिबी आलेला. त्यामुळे दोघेही तरुणपणीच राज्यवैभव सोडून आलेले आणि सोबत माता जानकी.  अत्यंत रूपवान. असे हे श्रीराम व लक्ष्मण. वनात रहात असल्यामुळे फळं त्याचप्रमाणे कंद मूळ असं खाणारे. दांतौ म्हणजे तीक्ष्ण दात असलेले. पण इथे त्याचा अर्थ आहे दाताने कच्चं खाणारे, म्हणजे शिजवलेलं अन्न न ग्रहण करता फळं आणि कंद मूळ इतकंच भक्षण करणारे. 

तापसी याचा अर्थ फक्त तापसी वेष परिधान केलेले नाही, तर वृत्तीने, काया, वाचा, बुद्धी व मनाने तपस्वी आयुष्य जगणारे. श्रीराम व सीता दोघे एकत्र वनवासात असूनही चौदा वर्ष तपस्वी आयुष्य जगलेत, हे विशेष आहे. म्हणून श्रीरामांना मर्यादापुरुषोत्तम म्हटलं जातं ते अनेक अर्थांपैकी या अर्थाने सुद्धा.  तर असे हे तरुण,रुपसंपन्न,  सुकुमार महाबली, हे फळं व कंदमूळ खाऊन तपस्वी आयुष्य जगणारे राजा दशरथ यांचे हे पुत्र श्रीराम व लक्ष्मण माझं रक्षण करोत. 

असे हे वीरश्रेष्ठ जे शरण्यौ सर्वसत्वानां आहेत. सत्व हा समस्त जगतात तिन्ही गुणात श्रेष्ठ गुण आहे. हा गुणधर्म प्राण्याला इहलोकी कीर्ती आणि परलोकी मोक्षप्राप्ती करून देतो. सत्वगुणी मनुष्य सात्विक तेज व वृत्ती धारण केलेला, शांतचित्त असतो. प्रत्येक प्रसंगाला शांतपणे व धीरगंभीरपणे तो सामोरा जातो. अश्या जगातील सर्व सत्वांना जे शरण देतात. इथे सत्वांनां याचा अजून एक अर्थ निघतो तो म्हणजे सर्व सत्वयुक्त अर्थात ज्या गोष्टी जगात सत्वयुक्त म्हणजेच श्रेष्ठ आहेत, ज्यामध्ये मनुष्याचे गुणधर्म व वस्तूंचे गुणधर्म असा अर्थ घेतला तर जगात जे जे सत्वयुक्त, जे श्रेष्ठ आहे आणि जे टिकणं गरजेचं आहे, त्या सर्वांना शरण देणारे.  

जे सर्व धनुर्धाऱ्यांमधे श्रेष्ठ आहेत. याचा उल्लेख महाभारतात आढळतो. ज्यावेळी अर्जुनाला गर्व होतो त्यावेळी श्रीकृष्ण जाणीव करून देतात की, तू श्रीशंकर व श्रीराम यांच्यानंतरचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस. जे राक्षसांचं समूळ, कुळासह निर्दालन करतात. कुळ याचा अर्थ जो शास्त्राला अभिप्रेत आहे तो म्हणजे जे युद्धास व शस्त्र घेऊन वा जगताला, सामान्यजनांना त्रास देतील असे खल असुर, दानव यांचा वध करून जगताला पापमुक्ती देणारे. 

म्हणूनच विभीषण असुर योनीतील असूनही त्याला त्याच्या सत्वगुणांनी तारलं आणि शरणागत रक्षक या ब्रीदानुसार अभय देऊन लंकेचं राज्यपद दिलं. असे हे सत्वगुणी शरणागताना अभय देणारे, सर्वश्रेष्ठ धनुर्धर व राक्षसाकुळाचा नाश करणारे राघूकुलश्रेष्ठ, रघुकुल शिरोमणी माझे त्राता होवोत, माझं रक्षण करोत.

असे हे सर्वश्रेष्ठ धनुर्धर जे सदोदित कायम धनुष्य सज्ज ठेवून त्यावर बाण लावून त्या बाणाची प्रत्यंचा खेचून सुसज्जीत आहेत. 

इथे विषुस्पृशा असा एक शब्द आहे. मी अनेक रामरक्षा विवेचनं वाचली.  परंतु याचा अर्थ त्यांनी  बाणाला स्पर्श करून सज्ज असलेले असा काढलाय. मी या दोन शब्दांचे अर्थ वेगळे शोधले ( कारण हे दोन वेगळे शब्द आहेत) विषु म्हणजे एक म्हणजे प्रकाराने किंवा समान हा एक अर्थ आहे किंवा विषयुक्त आणि स्पृषा म्हणजे सर्पिणी किंवा नागीण जी कायम फणा काढून अष्टदिशाना तो फणा फिरवत चाहूल घेत असते.  इथे पुन्हा नागीण म्हणजे स्पृषा का तर ती स्रीरुप अर्थात शक्तीस्वरूप असल्यामुळे ऋषींनी हा शब्द मुद्दाम स्त्रीलिंगी वापरला असावा. 

त्यामुळे इथे याचा अर्थ जो मला अभिप्रेत आहे तो असा : 
 "जे श्रेष्ठ धनुर्धर धनुष्याला बाण लावून आणि पाठीशी अक्षय भाता असलेलं तुणीर लावून, एखाद्या विषारी फुत्कार करणाऱ्या नागिणीप्रमाणे सदैव सर्वत्र लक्ष ठेवून आहेत, अर्थात जे राक्षसाची दानवाची नकारात्मक शक्तीची चाहूल घेत सज्ज आहेत असे श्रीराम माझ्या रक्षणार्थ माझ्या जीवनपथावर सदैव अग्रेसर राहोत". 

 श्रीराम जयराम जय जयराम !!! 🌷🙏🙏

भाग १२.....    
© ® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
२२/१०/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...