Skip to main content

विश्वास आणि श्रद्धा म्हणजे नक्की काय.

विश्वास आणि श्रद्धा म्हणजे नक्की काय. 

© संकल्पना, मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले

विश्वास म्हणजे मनाला एखाद्या गोष्टीची वाटणारी.शाश्वती किंवा खात्री, जी मनाला पुढे जाण्यास गती देते. विश्वास हा सहसा दिसणाऱ्या वा अस्तित्वात असणाऱ्या गोष्टीं बद्दल असतो.

पण श्रद्धा ही फक्त शुद्ध सात्विक आणि या जगतापार असलेल्या आणि तरीही जगताचा आधार असणाऱ्या, ईश्वर व सद्गुरूरूप चैतन्यशक्तीबद्दल असते.

म्हणून जगतात दिसणाऱ्या ईश्वरी अस्तित्वाबद्दल विश्वास असावा आणि त्याच्या न दिसणाऱ्या, पण निरंतर प्रत्ययाला येणाऱ्या, अनुभूतीबद्दल श्रद्धा असावी.

विश्वास म्हणजे पुरुष आणि श्रद्धा म्हणजे प्रकृती अर्थात विश्वास हा शिव आणि श्रद्धा ही शक्ती आहे. दोघेही एकमेकांच्या आधाराने असतात. दोघेही एकत्र असावेत अन्यथा दोघेही अपूर्ण आहेत.

विश्वास हा आपल्या मनाचा अध्यात्मिक सहभाग आणि श्रद्धा ही ईश्वरीय सहभागाची खात्री समजावी.

म्हणजेच आपल्या मनात विश्वास असेल तर, आत्म्याच्या माध्यमातून, ईश्वर तुम्हाला श्रद्धेचा त्याचा सहभाग प्रकट करतो. त्यामुळे विश्वास नसेल तर श्रद्धा दोलायमान असते. पण विश्वास असेल तर, श्रद्धा दृढ असते.

अध्यात्म यज्ञातील हवनात, विश्वास हा मानवाचा स्वाहाकार असतो, तर श्रद्धा ही ईश्वराच्या वरदानाची पावती वा प्रचिती आहे. 

म्हणून आधी विश्वास ठेवला की, त्यापाठोपाठ श्रद्धा आपला प्रत्यय व प्रचिती देते.

© संकल्पना, मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०८/२०२३

Comments