Skip to main content

राम अनुज भरत भाग ६७

राम अनुज भरत भाग ६७

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

प्रभू एकाग्रचित्त ऐकणाऱ्या लक्ष्मणाला, तितक्याच तन्मयतेने पुढे म्हणाले. 

परंतु मनाच्या समाधानाने, खरा माणूस ओळखला गेला पाहिजे. किंवा तो तसा ओळखला जावा, हेच विधात्याला अपेक्षित आहे.त्यातही मनात स्वप्राप्तीच्या आनंदाने प्राप्त समाधान, हे मर्यादित काळापर्यंत टिकतं. पण चिरकाल समाधान, हे आपण दुसऱ्याला दिलेल्या आणि आपल्या मुळे दुसऱ्याला प्राप्त झालेल्या आनंदामुळे प्राप्त होतं. समाधानाच्या प्राप्तीचा हा आनंद, मिळाल्याने प्राप्त न होता, दिल्यामुळे प्राप्त झाला पाहिजे. 

समस्त विश्वाच्या अंतिम आनंदाचे समाधान हे दुसऱ्याला काही दिल्यामुळे, त्या सदर प्राण्याला प्राप्त झालेल्या आनंदाने, आपल्याला मिळाले पाहिजे. कदाचित हाच विधात्याच्या विश्व निर्मितीचा उद्देश असणार, लक्ष्मणा. म्हणून या दुसऱ्याच्या मनाला मिळालेल्या आनंदाने, आपण संतोष पावणं हे जीवना तील सर्वात मोठ सुख आहे आणि भरताला आनंद देऊन, मी ते सुख प्राप्त करू शकलो, याचा मला आनंद आहे. 

अशी सूक्ष्मातील सूक्ष्म सुखांची माला प्राप्त करत जाणं, म्हणजे अंतिम सुखाच्या प्राप्ती कडे मार्गस्थ होणं. अर्थात देण्यात जे सुख आणि समाधान आहे, ते मिळवण्यातील सुख आणि समाधान यापेक्षा निश्चित अधिक व्यापक आणि अधिक फलदायी असतं. त्यामुळे अश्याच सुखाला प्राप्त करणारा जीव, हा कोणत्याही कर्म व धर्म बंधनात अडकत नाही. कारण त्याचा प्रत्येक क्षण हा दुसऱ्याच्या आनंदासाठी वाहिलेला असतो.अन्यथा त्याने,त्या क्षणांचा उपयोग फक्त स्वतःच्या वैयक्तिक आनंद आणि समाधान यांसाठी व्यतीत केला असता. 

असा स्वतःच्या आनंदासाठी जगलेला प्रत्येक क्षण, बंधनांना कारण ठरतो. पण नीज सुखापेक्षा, दुसऱ्याच्या सुखात आपल्या समाधानाला शोधणारा जीव, एकप्रकारे ईश्वर सेवाच करत असतो. म्हणून असा जीव, आपोआप आत्मसुख, आत्मशुद्धी आणि आत्मानंद प्राप्त करत करत, पुढे जातो. हे लक्ष्मणा, म्हणून नेहमी, माझ्यामुळे, इतरांना काय सुख वा समाधान प्राप्ती होईल, यातच मग्न असावं. याच आत्मचिंतनात सतत मग्न रहावं. " 

लक्ष्मण, आपल्या ज्येष्ठ भ्राता आणि आता पित्यासमांन असलेल्या, श्रीराम यांचं कथन शांतचित्ताने ऐकून, त्यांना सादर वंदन केलं. त्यानंतर प्रभूंना म्हणाला की, 

" आपण अलौकिक ज्ञान प्रकाश माझ्या पर्यंत पोचवत आहात. त्याच्या तेजाने मी उजळून निघतो आहे. किंबहुना माझं परम भाग्य आहे की, इतकं सखोल वैश्विक ज्ञान असलेल्या पुण्यात्मा रघुकुल भूषण श्रीराम, यांच्या अत्यंत निकट, पुढील चौदा वर्षे, राहण्याचा योग, मला प्राप्त झाला आहे. आपल्या आत्म ज्ञानाच्या प्रकाशात, माझ्या आत्म्याला, काही गुह्य मोती प्राप्त करण्याचं सद्भाग्य नक्की मिळेल आणि त्यासाठी मी आपला आणि त्या विधात्याचा, आजन्म ऋणी असेन." 

यावर प्रभूंनी अत्यंत विनम्रतेने लक्ष्मणाला प्रणाम केला आणि म्हणाले.

" हे लक्ष्मणा, काळाच्या पटलावर, आपली भूमिका काय आहे, हे लक्षात येण्यास, अत्यंत पुण्यसंचय लागतो. त्यानंतर, त्या भूमिके प्रमाणे वर्तन करता येणं, हे अजून परम भाग्याचं लक्षण आहे. आपलं भाग्य किंवा कर्मसंचय थोर असणार, जेणेकरून, आपल्याला, आपण, विधाता वा काळ पटलं याना आपल्या कडून काय अपेक्षित आहे, त्याप्रमाणे कर्म करून, काळाच्या उदरात दडलेल्या परिणामांना प्राप्त करून, काळाच्या समोर, मांडू शकतो. हे अत्यंत दुर्लभ आहे. यात मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा तू माझ्यापेक्षा कनिष्ठ असा काहीही प्रकार नाही. 

प्रत्येकाला प्राप्त झालेली भूमिका, तितकीच महत्वाची आणि श्रेष्ठच आहे. फक्त आपण ती किती अंतःकरण पूर्वक पार पाडतो, हे महत्वाचं आहे. त्यातच जगण्याचा आनंद शोधता आला पाहिजे. " 

प्रभू वचनांचा हा ज्ञान झरा, देवी सीता आणि लक्ष्मण यांच्यासह काळही, हात जोडून ऐकत होता. कारण येणारे शब्द हे परम पिता श्रीराम यांचे होते. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१५/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...