Skip to main content

भोग आणि ईश्वर ५२३

भोग आणि ईश्वर  ५२३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

कालचाच विषय पुढे नेऊया. 

मुळात आपण कर्मानेच बद्ध आहोत आणि फक्त आणि फक्त आपल्याच कर्माच्या फलाचा हिस्सा आपल्याला भोगायला लागतो वा उपभोगायला मिळतो, हे मनात कोरून ठेवा. पण हे सत्य उत्तम काळातही लक्षात येत नाही आणि पडत्या काळातही जाणवत नाही. किंबहुना दोन्ही काळात माणूस चुकीची धारणा बाळगून जगतो. उपभोगांच्या काळात माणूस हे समजतो की, आपल्या चांगल्या कर्माचा परिणाम म्हणून,  आपलं सुखात चाललं आहे. त्याविरुद्ध काळात आपण लगेच वेगळा विचार  करतो की, देवाच्या अवकृपेने माझ्यावर आज हे दिवस आले आहेत. 

वास्तविक देवनिर्मित व्यवस्था ही, एखाद्या बँकेसारखी आहे. ती व्यवस्था, तुमच्या खात्यात शिल्लक असलेलं पुण्याकर्माचं वा पापकर्माचं किंवा चुकीच्या कर्माचं  योग्य ते फल तुम्हाला मिळेल इतकंच करते. म्हणजे विधाता नावाची व्यवस्था, त्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. बँकेत खात्यात जर शिल्लकच नसेल तर, आपल्याला कोणती बँक पैसे देईल का?. त्यामुळे आपण भ्रमात राहून, विचारांच्या आणि कृतीच्या चुका करतो. त्याचा परिणाम पुन्हा नवीन कर्मांच्या चुका आणि त्या चुकांची फलं समोर येतात. पण ती आली की आपणच वैतागून देव दैव यांना दोष देतो. त्याने विचारांच्या व कृतीच्या अजूनच चुका घडत जातात. 

गुंतवणूक व शिल्लक काही नसताना, जसा पडता काळ असह्य होतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील कर्मखात्यात काहीच पुण्याई, उत्तम कर्मांची कमाई शिल्लक नसताना आलेल्या पडत्या काळात कर्मांची सर्व गणितं चुकत जातात. मुळातच काही शिल्लक नसेल तर, देव आणि दैव हेदेखील निरुत्तर होतात आणि त्यांचाही नाईलाज होतो. तशीच व्यवस्था आहे. 

विश्वनियंता जगताचा माय बाप दोन्ही आहे. माऊलीच्या हृदयातील प्रेमामुळे आपण भोगांच्या व दुःखांच्या काळात असताना, ईश्वर नक्कीच व्यथित होतो, हे नक्कीच लक्षात ठेवा. परंतु बापाच्या हृदयातील कर्तव्य कठोरता, आलेले कर्माचे भोग भोगण्याची सक्ती करवून घेतात. आता हा ईश्वरी पेच आहे,पण ईश्वर भावना, गुण यांच्याही पार असल्यामुळे सहृदय असूनही, विधात्याच्या व्यवस्थेत दखल देत नाही. पण ईश्वरी हृदयातील कारुण्य आणि दया ही, त्या ईश्वराला कार्यप्रवृत्त करतेच. पण कधी याचा नन्तर विचार करूया आणि ती उत्तरं नन्तर पडताळून पाहूया. 

हे मात्र ध्यानात असुद्या की आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार, या तत्वाला जागून, ईश्वर वा त्याची निर्मिती व्यवस्था, तेच दान आपल्या झोळीत टाकते, जे आपण आधी कर्मगतीने लिहून ठेवलंय. कोणत्याही लिखित वहीखात्याशिवाय असलेली ही अजब आणि गुह्य व्यवस्था, फक्त आणि फक्त कर्मांच्या लहरींच्या माध्यमातून, सर्व गोष्टी विधाता नामक व्यवस्था, नोंदवून ठेवतो,ते आत्म्याच्या नावावर.मृत्यूनंतर मनोमय कोषातून, हे सर्व संचित जमा होऊन, ते ओझं आत्मा, देह त्यागल्या नंतर, आपल्यासोबत घेऊन, पुढील देहप्राप्तीची वाट पहातो. 

निहित कर्मगतीनुसार, यथायोग्य काळात, त्या त्या आत्म्याला देहप्राप्तीची व्यवस्था, सचितानुसार होते. आता कोणाचा यावर विश्वास नसेल तर, एक उदाहरण घेऊ, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. पण ते आपण उद्याच्या भागात पाहूया. तोपर्यंत आजच्या भागाचं सखोल चिंतन पुन्हा एकदा करा. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...