Skip to main content

भोग आणि ईश्वर ५३४

भोग आणि ईश्वर  ५३४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
ईश्वर हा पूर्वीच्या काळातील त्या शिक्षक किंवा सद्गुरू प्रमाणे आहे, ज्यांना, असं प्रामाणिकपणे वाटतं की, आपला प्रत्येक विद्यार्थी वा शिष्य उत्तीर्ण व्हावा. पूर्वीच्या काळातील असं मुद्दाम म्हंटलं , कारण आता काही प्रमाणात व्यावसायिकता शिरल्या कारणाने ती प्रामाणिक वृत्ती लोप पावत चालली आहे. वास्तविक गुरू, शिक्षक ही ईश्वराची प्रतिरूपं आहेत, ज्यांचं काम, शिकवणं आणि चुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा मार्ग दाखवणं. 

म्हणूनच विद्यार्थी कसाही निघाला तरी सहसा उत्तम शिक्षक वा सद्गुरू, आपलं सांगणं, वागणं व सावरून आणि सांभाळून घेण्याची वृत्ती बदलत नाहीत. शिक्षकांचं आणि सद्गुरुंचं कार्य म्हणूनच खडतर आणि अविश्रांत आहे. त्यामध्येसुद्धा शिक्षकांचं कार्य देह असेपर्यंत असतं. पण सदुगुरूंचं कार्य देहापश्र्चातसुद्धा चैतन्य रूपात सुरूच असतं. हे कार्य सद्गुरू आणि शिष्य दोघांच्याही देहापश्र्चात अखंड सुरू राहतं. ही वृत्ती अंगी यायला सद्गुरू आणि शिक्षक यांना अनंत ताप आणि खडतर तप, साधना, कष्ट, यातना आणि चिंतन यांमधून जावं लागतं. 

याचं वृत्तीच्या लोकांच्या प्रतीक्षेत ईश्वर नेहमी असतो. म्हणजे ईश्वराचं कार्य हे जास्त खडतर आहे. त्याला शिक्षक, सद्गुरू यांसह विद्यार्थी, अज्ञानीजन यांचाही प्रतिपाळ करावा लागतो. म्हणूनच ईश्वराला जगताचा प्रतिपालक म्हणतात. प्रतिपालक म्हणजे विनातक्रार सांभाळ करणारा. जगताच्या या जंजाळात, अनंतकोटी योजनं विस्तार असलेल्या या ब्रम्हांडातील प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तूचा यथायोग्य सांभाळ करणारा हा ईश्वर, अगम्य, गूढ, गहनिय, जाणण्यास अत्यंत दुर्लभ, निर्गुण, निराकार, 

पण तरीही सगुण व साकार, निरपेक्ष भावाने जगतावर प्रेम करणारा, दया, क्षमा, शांती यांची मूर्ती, कोणत्याही जिवाचं उत्तम चिंतणारा, प्रत्येकाला त्याच्या कर्माने प्राप्त झालेले भोग व उपभोग मिळावेत व त्यातून प्रत्येक जीव या  जगतातून पुढे जावा, हीच सदिच्छा असणारा, कृपेचा महासागर, अधमातील अधमालासुध्दा सुधारण्याची, सावरण्याची आणि अधोगती कडून सद्गतिकडे जाण्याची संधी मिळावी, अशी आशा बाळगून, त्यासाठी जगावरील अत्याचार पराकोटीला जाण्यापर्यंत प्रतीक्षा करण्याइतका धीर असलेला, म्हणून धीरोदात्त असलेला, औदर्याचा महामेरू असणारा आणि जनकल्याणात निजसुख मानणारा आहे

खरंतर इतक्या शब्दात व्यक्त केलेला ईश्वर हा या शब्दा तूनही अव्यक्तच राहिलेला असा आहे. निजानंदात आणि समाधीत रत असणारा, तरीही या जगतावर आपल्या हृदयातील लहरींच्या माध्यमातून आपलं संपूर्ण ध्यान देणारा आहे. खूपवेळा आपल्याला प्रश्न पडतो की, माझ्याकडे ईश्वराचं लक्ष आहे का. याचं उत्तर नक्कीच हो आहेच असच देता येईल. त्यावर उद्याच्या भागात विस्तृत चिंतन करूया पण नामस्मरण रुपी चिंतन सुरू ठेवूनच.

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१८/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...