Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ४

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ४

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम उय जयराम ||

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

मरुत म्हणजे वारा, पवन वात, वायू इत्यादी विशेषणांनी युक्त देवेंद्राचे बंधू, पंचमहाभूतांमध्ये एक, बलशाली एका झोकात सर्व ध्वस्त करण्याची अचाट शक्ती असलेला एक. वास्तविक एका कथेनुसार रुद्राचा अंश मरुत म्हणजे पवन यांनी वानरराज केसरी यांची पत्नी  माता अंजनीच्या गर्भात स्थित केला.  मरुत हे मूळ सात गण आणि त्या सातापासून निर्माण झालेले प्रत्येकी सात असे एकूनपन्नास गण असा उल्लेख उपनिषदे आणि पुराणात आहे. कश्यप ऋषी आणि त्यांची द्वितीय भार्या दिती यांपासून या मरुतगणांची निर्मिती झाली. 

अश्या या मरुत म्हणजेच पवन यांचा पुत्र म्हणून नामाभिधान लाभलेला मारुती. वनारी हा शब्द काही जणांनी वानरी या शब्दाचा अपभ्रंशरूप आहे असं म्हटलंय. वृत्ताच्या सोयीसाठी असा अपभ्रंश केल्याचे मानलं गेलं. परंतु असा अपभ्रंश समर्थ करतील असं मला वाटत नाही. किंबहुना अपभ्रंश न मानता संधी विग्रहरूप असावं, असं माझं मत आहे. मूळ शब्द वन नारी त्याचा जोडशब्द करताना वनारी झालं वा केलं असावं. वनात राहणारी नारी.  कारण माता अंजनी वनात राहणारी स्त्री असल्याचा उल्लेख आढळतो. 

काही जणांनी याचा विग्रह वन आरी म्हणजेच वनातील झाडांची तोडफोड करून अर्थात त्यावर आरी म्हणजे लाकूड कापायचे दाते असलेले हत्यार चालवून,  त्यावर आपली गुजराण करणारे असाही केला आहे. माझ्या मते वन नारी हा विग्रह योग्य वाटतो. कारण हे विशेषण माता अंजनीच्या संदर्भात असल्यामुळे तिला नारी उल्लेखून वनात राहणारी माता अंजनी, हिचा पुत्र. कारण यालाच जोडून पुढे त्या वन नारी अर्थात वनारी अंजनी हिच्या सुता म्हणजे पुत्रा असे संबोधून समर्थ हनुमंताला साद घालतात.

हनुमंत कार्याची महती एका शब्दात सांगून हनुमंताला भावणारा त्याचा गुणविशेष समर्थ इथे सांगतात. हनुमंताच्या अस्तित्वाचं कारण व फलित म्हणजे रामाचा दूत. सहसा दूत म्हणून त्या व्यक्तीला पाठवलं जातं जी बुद्धी, चतुराई, कौशल्य, युक्ती, प्रसंगी बल यांचा वापर करून आपल्याला दिलेले कार्य सफल करेल.  शत्रूच्या हाती आपलं कोणतही गुपित लागू न देता, सोपवले गेलेले कार्य साध्य करून, वेळ आलीच तर प्राणत्यागून वा होता येईल तितके शत्रूला त्रस्त करून येणे. दूत हा फक्त निरोप्या नसतो. त्याला काही विशिष्ट कार्य देऊन त्या कार्याच्या पूर्ततेसाठी त्याची नेमणूक असते. त्याला स्वामीचं महत्व , म्हणणं शत्रूपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. 

अश्या प्रकारचा दूत म्हणून हनुमंताला अनेक कार्य देण्यात आली आणि त्याने ती लीलया पेलत आपली विश्वासार्हता सप्रमाण सिद्ध केली. मुळात अश्या कार्यासाठी लागणारे गुणधर्म , गुणविशेष, बुद्धी, सिद्धी, जाण, समयसूचकता, चलाखी, चतुराई, कौशल्य, शक्ती तरीही संयम, एकाग्रता, साधना असे अनेक गुण त्याच्या अंगी होतेच होते. ज्यामुळे आपल्या स्वामींनी दिलेलं कार्य, ते करताना ऐनवेळी आलेली संकटं आणि त्यासाठी आखावे लागणारे डावपेच, वेळप्रसंगी समोरच्याच्या पोटात शिरून व प्रसंगी पोट फाडून कार्य सिद्धीची पात्रता असलेला एकमेव वानर दूत म्हणून पाठवण्यायोग्य होता, तो म्हणजे हनुमंत.  आणखीन एक गोष्ट हनुमंताने आपल्या एकाच भेटीत रावणाला दाखवून दिली. ती म्हणजे नर वानर सेनेचे प्रमुख असलेले पराक्रमी श्रीराम यांच्या शक्तीची चुणूक दाखवून हनुमंताने रावणाला व त्याच्या अपराजित राज्याला आव्हान दिले होते. 

मुळात इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की, प्रत्यक्ष युद्धाआधी मानसिक युद्ध आधी खेळलं जातं. आपण तो प्रकार आताच्या काळात बघतो. अगदी खेळातदेखील हल्ली प्रत्यक्ष सामन्याआधी अश्या प्रकारचा मानसिक दबाव निर्माण करण्याचे सर्व हतकंडे वापरले जातात. परंतु तो प्रकार, कदाचित प्रथमतः, तेदेखील प्रत्यक्ष शत्रूच्या समोर उभं राहून, त्याला आव्हानीत करत, आपल्या शक्तीची झलक दाखवत, स्वतः सुरक्षित राहून, परंतु स्वामींची महती गाऊन शत्रूला अशी अद्दल घडवायची, ज्यामुळे होणाऱ्या नुकसानीतून त्याने पुढील धैर्य दाखवण्याआधी दोन वेळा विचार करावा. अश्या प्रकारचं कार्य करणारा श्रीरामांचा दूत म्हणजे हनुमान. अश्या हनुमंताला समर्थ प्रार्थनेतून आवाहन करत आहेत. 

क्रमशः भाग ४ ..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०५/११/२०२०

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...