राम अनुज - भरत भाग १
श्रीगणेशाय नमः !!
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
मनोगत, मांडणी आणि विषय परिचय !!
खरतर रामप्रिय भरत याची महती, कथा आणि श्रीराम व भरत यांचा एकमेकांशी स्नेहबंध हा, कालातीत आणि शब्दातीत विषय आहे. मुळात ज्या प्रभूंच्या किर्तीसाठी, वाणीची देवी शारदा आणि बुद्धीचा ईश्वर श्री गणेश यांच्या कडेदेखील शब्द नाहीत, तिथे मी पामर काय वर्णन करणार. पण असं म्हणतात की, ज्याच्या पाठीशी सद्गुरुरूप कृपा कवच आहे, तो कालातीत गोष्टी लीलया करू शकतो. हे आपण सर्वजण जाणता. अर्थातच तीदेखील सद्गुरू इच्छा आणि लीला. म्हणूनच श्री गजानन, आई देवी सरस्वती आणि परम कृपाळू असे, माझे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यां तिघाना, चरण वंदन करून, एका नवीन विषयाला सुरुवात करण्याचं धारिष्ट्य करत आहे.
श्रीराम अनुज - भरत ही लेखमाला.
श्रीरामांच्या पाठच्या बंधुंमध्ये, म्हणजेच अनुजांमध्ये सर्वात ज्येष्ठ अनुज अर्थात भरत, प्रभूंचा देहरुपात जन्म माता कौसल्येचाच्या उदरी, चैत्रशुद्ध नवमीला मध्यान्ही झाला. त्यानंतर नवमीच्या उत्तर रात्रीनंतर अर्थात दशमीच्या ब्राम्हमुहूर्ती, माता कैकयीचा उदरातून भरताचा जन्म झाला. म्हणून श्रीराम अनुजांमध्ये ज्येष्ठ, हा भरत आहे. त्यानंतर दशमीलाच मध्यान्ही माता सुमित्रेच्या उदरी, आधी लक्ष्मण आणि त्यानंतर शत्रुघ्न, अश्या या चार रुपात श्रीविष्णुंचे अंश अनुक्रमे जन्माला आले. यातील. भरत म्हणजे श्री विष्णूंच्या सुदर्शन चक्राचा अंशरुप अवतार, लक्ष्मण अर्थातच शेषाचा अवतार आणि शत्रुघ्न शंखाचा अंशरूप अवतार, मानला जातो.
यातील ज्येष्ठ अनुज भरत याच्या चरित्रावर लिहिण्याची सुबुद्धी आणि प्रेरणा मला, सद्गुरू कृपेने झाली आणि काही माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत करत, विषयाची मांडणी, संवादात्मक पद्धतीने करून, घडलेल्या घटना, प्रत्यक्षात घडत आहेत, असा प्रत्यय वाचकांना देण्याचा प्रयत्न करत, लिहिण्याचा मानस आहे. श्रीराम, श्री हनुमान, माझे सद्गुरू यांचे आशीर्वाद आणि वाचकांचं प्रेम, हे मला या कार्यात यश देईल, हा विश्वास नक्कीच सार्थ ठरेल.
विश्वनियंत्याचा सर्वात प्रिय अनुज भरत, याचं चरित्र मांडायच काम, खरतर जोखमीचं आहे. खेळ तारेवरचा आहे. कारण यात प्रभूंच्या हृदयात अगदी अंत:पुरात निवास करणाऱ्या, ज्येष्ठ अनुज भरत, याच्याबद्दल लिहिणं आणि त्या दोन बंधुंमधील भावनिक, मानसिक आणि आत्मिक नातं आणि त्यांचा मनाच्या अंतरंगातील निःशब्द संवाद, शब्दात मांडायचे आहेत. कारण त्या काळात नातेसंबंध आणि त्यातील नाजूक भाव, शब्दांपेक्षा दृष्टीतून आणि मनातूनच, मनात पोचवले जात असत. तेच माध्यम मर्यादेचं मानलं जायचं.
कारण त्याकाळी, मर्यादा हा खूप मोठा दागिना मानला जात असे. याच मर्यादांचा स्वामी असलेले प्रभू आणि त्यांचा सर्वात प्रिय अनुज भरत, यांच्या मनातील भाव, त्या भावांची एकमेकांना जाणवणारी भाव स्पंदनं, ही परस्पर पूरक असणार, यात शंकाच नाही. पण याला, एकमेकांच्या मनातील भाव लहरींनी दिला जाणारा भावप्रतिसाद, तितकाच भावोत्कट असणार. त्याची अनुभूती घेऊन, ते त्याच नाजूकपणे शब्दबद्ध करणं, हे खूप मोठं जिकिरीचं काम आहे. कुठेही तोल गेला तर मर्यादा भंग व रसभंग होऊ शकतो.
याची जाण व जाणीव मनात धरून लिहायचं आहे. पण महाराजांनी मला, संवेदनशील मनाचा एक स्वतंत्र गाभारा, याचं कार्यासाठी प्रदान केलेला असावा. त्यामुळे, हे सर्व शब्दात व्यक्त करण्याचं कौशल्य आणि त्या भावांना जाणण्याची, जाणिवेची अनुभूती व प्रचिती आणि अव्यक्ताला व्यक्त करण्याचं सामर्थ्य, तेच देतील, ही श्रद्धा दृढ धरून मी लिहिणार आहे. .
म्हणजेच अव्यक्त भाव,त्या काळातील प्रत्येक पात्राच्या मनात असलेले , त्याची अभिव्यक्ती करण्याची ऊर्जा आणि शक्ती ही सद्गुरूंची देण, पण देह, मन व बुद्धिरुप लेखणी माझी, असा हा त्रिवेणी संगम साधण्याचं अलौकिक कार्य, माझे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज सहज घडवतील. त्यांच्या आत्म शक्तीची प्रेरणा, ते माझ्यापर्यंत पोचती करतील. मी ती मांडण्याचा प्रयत्न करीन. आपण त्या सर्वांचे साक्षीदार होऊन, हा शब्दबद्ध होणारा लेखानुक्रम अनुभवूया. काही न्यून राहिल्यास, सद्गुरू आणि आपण सांभाळुन घ्याल, हा विश्वास आहेच.
मनोगताची इतकी विस्तृत मांडणी केल्यावर, आता पुढील भागापासून आपण, मूळ विषयाकडे जाणार आहोत. प्रत्येक भागाच्या शेवटी रामनाम उद्घोष करून, त्या त्या दिवशीच्या लेखाची समाप्ती, आपण करणार आहोत.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
क्रमशः
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०९/०६/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment