अध्यात्म विराम २०१
संत, महंत, साधू, सज्जन हे ईश्वराच्या समीप असतात, याचा नेमका अर्थ असा की, हृदयस्थ आत्म्याच्या गाभाऱ्यातील ईश्वराला सर्वसाक्षी मानून, प्रत्येक क्षणाचं त्यांचं कर्म ते करत असतात. त्यामुळे प्रत्येक कर्मामागे, त्यांचा भाव हा ईश्वरीय पूजन, अर्चन यासमान असतो. कारण जेंव्हा ते प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या साक्षीने करतात, त्यावेळी प्रत्येक कर्मात त्यांना ईश्वराचं अधिष्ठान असल्याची प्रचिती आणि अनुभूती त्यांना प्राप्त होते आणि त्या प्रत्येक कर्माला शुद्धता प्राप्त होते. याचा परिणाम प्रत्येक क्षण, त्यांना ईश्वराच्या सांनिध्याचा अनुभव येतो.
आपण अनेकवेळा अनुभव घेतला असेल की, आपल्या घरी पाहुणे आल्यावर, आपल सर्व कर्म, कार्य, उद्देश, सर्वकाही आपण त्यांना आराम पडावा, आनंद मिळावा आणि त्यांचं येणं सार्थकी व्हावं, यासाठी आणि याचं उद्देशाने करतो. त्याचप्रमाणे या देहाच्या, सर्वात शुद्ध सात्विक इंद्रिय असलेल्या हृदयात असलेल्या अतिशुद्ध आत्मतत्वात अखंड पाहुणा रूप निवास करणाऱ्या ईश्वराच्या अंशाला आपण कधीच न जाणल्यामुळे आपण, ज्याप्रमाणे पाहुणे आल्याचं लक्षात न येता त्यांच्यासमोर नको नको ती मस्ती, हट्ट करतो, तसच काहीस आपलं भगवांताबाबत होतं.
कारण तो विश्वरुप विश्वात्मक आपल्याच अंतरात स्थित आहे, सदासर्वकाळ, आपल्या आत्म्याच्या संनिध्यात असताना, आपण माया, वासना, कर्मफल यांच्या फेऱ्यात अडकून आतल्या ईश्वरी अंशाला जाणू शकत नाही. याच साठी संत महंत, शास्त्र पुराणं यांनी ईश्वराच्या नामाच्या स्मरणाचां नाद लावून घ्यायला सांगितलं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे, आत असलेल्या आणि चराचर व्यापून उरलेल्या ईश्वराला साद घालून, जो आत्मा अशुद्ध मनाच्या गडद पडद्यामुळे अशुद्ध आणि आपल ईश्वरी निकट स्वरूप विसरून गेलेला आहे, तो पुन्हा जागृत होऊन, त्या ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा, प्रत्यय, अनुभूती आपल्याला येते.
पण हा प्रवास वाटतो तितकं सहज सोप्पा नाही. कारण मार्गात आपल्या, या व मागील जन्माच्या कर्माची फळं आपल्याला भोगायची असतात. ती भोगत असताना आपण या स्मरणातून बाहेर फेकले जाऊन, प्रवाह पतीत होतो. याच प्रवाहात पुन्हा येण्यासाठी त्या ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव जागृत होण्यासाठी, त्याचं ईश्वराला स्मरण गरजेचं आहे. म्हणूनच सर्व संत, ईश्वराच्या स्मरणाला इतकं अनन्यसाधारण महत्त्व देतात.
याचं कारण ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्या विस्मरणात जाते, त्यावेळी ती लक्षात राहण्यासाठी किंवा तिचं अस्तित्व दिसण्यासाठी आपण सतत त्याचं गोष्टीचा विचार करतो. अर्थातच मनाच्या एकाग्रतेमुळे आणि अंतरिक्षात वास करणाऱ्या, शक्ती व ऊर्जेच्या परिणाम स्वरूप आपल्याला ध्यास असलेल्या कोणत्याही गोष्टी प्राप्त होतात, असा विज्ञान व मनोविज्ञान यांचा अनुभव आणि प्रचिती आहे.म्हणजेच एखादी गोष्ट, उद्देश साध्य करण्यासाठी, त्या गोष्टीचा ध्यास घेतला की, त्याच्या प्राप्तीचे मार्ग मिळण्या साठी , विश्वातील शक्ती स्वतः, आपल्याला सहाय्यभूत होते.
पण त्यासाठी लागणारा ध्यास हा आपला असावा, आपल्या मनातील असावा. एखाद्या गोष्टीचा असा ध्यास, तेंव्हाच लागू शकतो, जेंव्हा त्या गोष्टीला आपण जाणतो. कारण जाणण्याने जागृती येते, ज्ञानप्राप्ती होते आणि त्यादृष्टीने कर्मगती वळते. याच विषयाला आपण पुढील भागात सखोल जाणून पुढे जाऊ.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
हे कॉपी राईट नोंदणीकृत लेखन आहे. त्यामुळे हे नावासकट प्रसारित करावे.
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०६/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment