भोग आणि ईश्वर १०१
काल आपण मनातील भावांचं निर्गुण आणि सगुण रूप याबद्दल बोललो. हे निर्गुणातून सगुणात भावनांचं प्रकटीकरण हे एखाद्या घटनेच्या, प्रसंगाच्या, आठवणींच्या इत्यादींच्या स्पर्शाने होतं. पण आपण त्या त्या प्रत्येक गोष्टीशी एकरूप होतो वा तादात्म्य पावतो म्हणून तो भाव सगुण रूपात बाहेर येतो. पण बरेचदा आपण वेगळ्याच गडबडीत, कामात, विचारात असतो, त्यावेळी कळलेली, समजलेली वा ऐकलेली एखादी गोष्ट कोणताही परिणाम न करता निघून जाते.
आठवून बघा, तुम्ही खूप त्रस्त आहात वा कुठल्यातरी विचारांचं गारुड मनावर आहे आणि अशावेळी कुणी एखादा विनोद वा चुटकुला सांगितला, तर आपण न हसता त्या व्यक्तीला म्हणतो अरे इकडे मी टेन्शनमध्ये आहे आणि तूला विनोद सुचतोय. म्हणजेच त्या भावनेची किल्ली, त्या व्यक्तीने वापरूनसुद्धा, तो भाव प्रकट झाला नाही. पण तो नव्हता असं नाही. तरीही तो अप्रकट वा निर्गुणच राहिला.
म्हणजेच ज्यावेळी मनावर एखाद्या विचारांचं वा समस्येचं किंवा इतर कोणतंही गारुड वा भार वा आच्छादन असतं, तेंव्हा इतर कोणत्याही भावनांचं प्रकटीकरण होऊ शकत नाही. आता कल्पना करा की आपण सतत स्वतःला एखाद्या चांगल्या गोष्टींच्या नादी लावलं, किंवा चांगल्या गोष्टीचा, विचाराचा छंद जडवला अथवा चांगल्या नादाच्या आधीन मनाला केलं, तर इतर कोणतेही विचार असलेले भाव त्या मनातील निर्गुण भावांना स्पर्शू शकणार नाहीत. किंवा त्या विचारांची मात्रा त्या अव्यक्त भावनांना साद घालणार नाही.
पण असा नाद वा छंद वा सवय ही नित्य, सकारात्मक आणि लाभदायी असेल तर त्यात नुकसान नाही आणि झालाच तर लाभच होईल. असा नाद, छंद जो आयुष्य आणि त्या आयुष्यातील क्षण क्षण आनंदी व लाभदायक करेल, तो म्हणजे नामस्मरण. त्या छंदाची सवय नित्य असेल तर आपण ज्या ज्यावेळी अशी वेळ येईल, त्या त्यावेळी आपोआप त्या नामाच्या नादात, छंदात मनाला कार्यरत ठेवून नकारात्मक, तापदायक, अहितकारक, भाव प्रकटु देणार नाही. म्हणून नित्य, प्रत्येक क्षण नामात रहा आणि नित्य आनंदात रहा.
उदासीनता, निराशा, मोह, लोभ, मत्सर, द्वेष इत्यादी अप्रस्तुत व नको असलेल्या भावांचं सगुणात्मक प्रकटी करण मनात उमटणार नाही, त्यामुळे ते देहाच्या कॅनव्हास वर वा स्क्रीनवर येणार नाही. मन सतत प्रफुल्लित वा आनंदी ठेवण्याचा तो एक रामबाण इलाज आहे. मनात नकारात्मक भाव आले म्हणजेच सगुण झाले की त्यांचा त्रास मनाला व परिणाम मनाच्या ऊर्जेवर होतो व तितकी ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरली न जाता व्यर्थ जाते आणि पुन्हा मुळाकडे यायला तितकीच अतिरिक्त ऊर्जा मनाकडून वापरली जाते.
म्हणजे आधीच ऊर्जा नकारात्मक स्थितीला आहे आणि तिला सकारात्मक पातळीवर आणायला दुप्पट ऊर्जा मनाकडून वापरली जाते. या सर्व प्रक्रियेत देह मनाला व मन देहाला इंधन अथवा ऊर्जा पुरवतात. त्यामुळे अर्थातच मन व देह दोन्हींची क्षती होते. परिणामी मन दुर्बल वा अशक्त होतं आणि अर्थात शरीरातील शक्ती व ऊर्जा अकारण खर्च होते, तेही क्षतिग्रस्त होऊन अशक्त होतं व मुळपदावर यायला दुप्पट शक्तीची व ऊर्जेची गरज लागते.
काहीजण ती व्यसनातून मिळवण्याचा प्रयत्न करतात. ज्याला किक येणं मानतात, ती मुळात मनाला व देहाला अर्थात मेंदूला व मज्जासंस्था व त्याच्या वाहिन्यांना तात्पुरती गती मिळावी म्हणून केलेली तात्पुरती सोय आहे. परंतु त्यातून, भविष्यासाठी दूरगामी अनिष्ट परिणाम, आपणच ओढवून घेतो. या सर्व गोष्टी टाळण्याचा सर्वात सोप्पा मार्ग, साधन, माध्यम व सवय म्हणजे मनाला नामाचा छंद जडवून घेणं. किती सोप्पा आणि अखर्चीक उपाय आहे.
अनिष्ट व्यसनात, अहितकारक निराशेत, नको असलेल्या भावनांच्या प्रकटिकरणात मनाला सापडू द्यायचं नसेल आणि सापडलं असेल तर त्यातून बाहेर येण्यासाठी, आज आता नामस्मरण सुरू करा, नित्य करा, प्रत्येक क्षण करा, कार्यरत राहून, कर्म करून करा, पण करा. मन ही अशी गोष्ट आहे जीला एखादी सवय जडवली की ते मुकाट्याने आपल्यालाच त्या गोष्टीची जाणीव करून देतं आणि पुढे तेच आपली साधना सांभाळतं. म्हणून सुरवातीला तुम्ही नेट धरा, म्हणजे पुढे ते तुम्हाला नेटाने नामात ठेवेल.
उद्या अजून पुढे चर्चा करूया, परंतु तोपर्यंत, नामात रहा, मी सांगितलेल्या सहाही पायऱ्यांचा अभ्यास करा, गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment