Skip to main content

भोग आणि ईश्वर ११३

भोग आणि ईश्वर  ११३
 
सर्वसामान्य जीवांना ईश्वराकडे जाण्याचा किंवा पुण्याच्याही पलीकडे पोचण्याच,  एक अत्यंत सोप्पा मार्ग म्हणजे ईश्वर स्मरण अर्थात नामस्मरण. आपण बसल्या जागी, सुरवातीला देहाने अर्थात जिव्हेने सुरवात करून, नंतर त्यात मन व बुद्धी गुंतवून, नित्य निरंतर फक्त ईश्वर नामाचे स्मरण करत जायचं. जिव्हेने सुरवात करून वैखरी अर्थात वाणीने म्हणजेच कंठाने नाम घ्यायची सवय जडवायची. 

सुरवातीला हे उपचार म्हणून म्हणायला लागल्यावर, हळूहळू त्याची धार बुद्धी व मन इथपर्यंत पोचते. म्हणजे आधी जिव्हा, मग कंठ, त्याद्वारे श्वासातून, जिथे श्वास सर्वात प्रथम पोचतात त्या फुफ्फुसात, तिथून, सर्वात जास्त श्वास जिथे गरजेचा आहे त्या मेंदू आणि हृदय इथंपर्यंत, मेंदूद्वारे बुद्धीच्या पेशींना चेतवून त्याद्वारे मज्जा संस्था, मज्जासंस्थेमार्फत प्रत्येक नसेतून देहाच्या प्रत्येक स्नायूपर्यंत, हृदयातून धमन्या व रक्तवाहिन्याद्वारे प्रत्येक पेशीपर्यंत आणि मनाच्या चक्षु, नसा वा मनाच्या  सर्व जाणिवांद्वारे संपूर्ण देह व आत्मा असा हा नामाचा प्रवास व्हावा अशी शास्त्र, वेद, ऋषीमुनी, संतमहात्मे यांचा उद्देश व सांगावा आहे.

आता या प्रक्रियेच्या आड सर्वात प्रथम काय येत असेल तर, आपलंच मन, मनातील विचार, विखार, वासना, भावभावना, त्याद्वारे निर्माण होणाऱ्या नकारात्मक तरंगलहरी. देहाची कोणतीही सिद्धता नामासाठी लागत नाही आणि अपेक्षित नाही. परंतु देह हा माध्यम आहे त्या अनंत शक्तिमान विश्वात्म्याच्या स्मरणासाठी. कारण या जगात मुक्ती मोक्ष हे सर्व देहधारी जीवच साध्य करू शकतात. देहाविना काहीही साध्य नाही. म्हणून सुरवात जिव्हेने करत करत वर दिलेला प्रवास मनाने जाणून व कल्पून नामस्मरण करत गेल्यास, विचार, बुद्धी व बुद्धीचे आणि देहाचे जडत्व आड येणार नाही. 

मन जर नियंत्रित करून वा या मार्गावर कल्पून नाम सुरू करत गेल्यास निदान त्याची मानसिक जाणीव उत्पन्न होण्यास व त्या जाणिवेतून नाम सर्व देह व हृदयस्थ आत्मा , जे परमेश्वर वा परम आत्मा याचं निवासस्थान आहे, तिथपर्यंत पोचू शकेल. त्यासाठी निष्ठेने, चिकाटीने आणि सातत्याने नाम घेणे व घेत राहणे गरजेचे आहे. इथेच एक गोष्ट ध्यानात धरायची की,मार्ग तर दिसत नाही, वाट तर चालायची आहे, ध्येय कल्पनेत आहे, तरीही निष्ठा ढळू द्यायची नाही, मग करायचं काय. एक उदाहरण घेऊ. 

आपण लहान मुलाला प्रथम चालायला लागण्याच्या काळात पाहिलं असेल आणि ते निरीक्षण आठवत असेल तर, सुरवातीला आई बाबा किंवा घरातील कोणी ज्येष्ठ त्याला आधार देऊन साहाय्य करतात. कधी फक्त बोलून त्याला प्रोत्साहित करतात की, मी आहे तू चाल, तू ये पुढे, घाबरू नकोस, तू पडलास तर मी धरीन. कधी आपण प्रत्यक्ष धरून मदत करतो किंवा कधी पडू देतो का तर काही गोष्टी पडल्याशिवाय शिकता येत नाहीत. त्यामध्ये आयुष्यात सुरवातीला हे चालणं हे मुख्य उदाहरण घेता येईल.

म्हणजेच आधार आहेच, पण तो फक्त जाणिवेत आणि मनाच्या खात्रीसाठी असतो. प्रत्यक्ष मदत वा आधार हा फक्त अपवादात्मक परिस्थितीत आपण त्या लहान मुलाला देतो. मूलतः आपण त्याला मनाने खंबीर करण्याचा प्रयत्न करतो. आता इतक्या सर्व विवेचनाचा मतितार्थ सांगतो. नामस्मरणात  मार्ग दिसतच नाही, माहिती नाही, परिणाम दिसेल वा न दिसेल, प्रगती कळेल जाणवेल वा न जाणवेल. मग मार्गदर्शन आधार कोण देईल तर सद्गुरू. जे त्या मार्गातून पुढे जाऊन, सर्व खाचखळगे पाहून त्या अनुभवातून सिद्ध होऊन ज्ञानी व अनुभवी असतात.

ते मानसिक आधार देतात, वेळप्रसंगी सावरतात आणि मनाने खंबीर बनवून, या अध्यात्मिक जगात चालायला शिकवतात. आता वरील उदाहरणात, जर ते मूल सुदृढ सशक्त आहे आणि तरीही चालायला न शिकता फक्त आधारा घेऊन चालण्याचा प्रयत्न करून मनाने दुबळे झाले, तर पालक म्हणून आपल्याला ते रुचेल आणि पटेल का. तर नाही. मग परमार्थात जिथे आपण वाट चालायला शिकतो, दृढ निश्चयाने पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रयत्नात अगदी क्षुल्लक गोष्टींसाठी जर आपण सद्गुरूंवर अवलंबून राहिलो आणि त्यांना कायम संकटात ओढत राहिलो तर त्यांना तरी आवडेल का. 

विचार करा, यावर पुढील भागात अधिक चिंतन करूया. पण तोपर्यंत नाम घ्या, गुरुचरणी स्थिर रहा त्यातूनच पुढील गती मिळत जाईल. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२३/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...