भोग आणि ईश्वर १०९
खरतर नाम हे ह्या जन्मासह, पुढील अनेक जन्म साध्य व सिद्ध करण्याचं अलौकिक साधन आहे. नित्य नामस्मरण करत गेल्याने मनाची व बुद्धीची स्थिरता, विचारांचा समतोल, साधला जाऊन, माणूस कोणत्याही परिस्थितीला, खंबीरपणे तोंड देऊन, त्यातून स्वतःला बाहेर काढतो. म्हणजेच नाम हे ते माध्यम वा उपकरण आहे ज्याच्या उपयोगाने आत्मरूपा तील ही देहधारी गाडी, मनाच्या चार स्थिर चाकांवर, बुद्धीच्या सुकाणूच्या सहाय्याने, सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सुरळीतपणे चालू शकते.
म्हणजेच नाम रस्त्यांची सुलभता देत नाही, पण आयुष्य कोणत्याही प्रकारच्या काळातून, मार्गावरून आणि सुखदुःख अश्या कोणत्याही कसोटीतून जात असताना मन बुद्धी व त्यायोगे देहाला त्या सर्व कसोट्यांवर घासून सिद्ध करते. नाम मुळात आपल्याला भगवंताच्या समीप नेते. भगवंत आणि आपण यात माया वास करते तिला निष्प्रभ व शक्तीहीन करते.
या कलियुगात मायेचा प्रभाव वाढवणारी व्यवधानं, प्रलोभनं, साधनं व आव्हानं ही शतपटीने वाढली आहेत वा माणसाने प्रगतीच्या वळणाने वा अडवळणाने त्यात वाढ केली आहे आणि त्यात नित्य निरंतर वाढ होत आहे. म्हणूनच मनाला मोहवणारी, सुखावणारी व बुद्धीचा मेद वाढवणारी, अशी सर्व साधनं, फक्त आपल्या हितासाठी कशी वापरायची ह्याची जाण व मर्म मनाला तेंव्हाच समजेल व जमेल, ज्यावेळी मनाला आपण नित्य काही कार्यात वा नादात गुंतवून ठेवू शकू.
यासाठीचं सर्वात सोप्प, सहजी उपलब्ध, शून्य खर्चाचं वा गुंतवणुकीचं, सकारात्मक, आनंददायी, आल्हाददायक आणि उत्तम इच्छाशक्तीच्या तरंगलहरी निर्माण करणारं एकमेव साधन म्हणजे नामस्मरण. सतत अस्थिर, कोणत्याना कोणत्या विषयामागे धावणाऱ्या, कधीही शांतपणे न बसणाऱ्या आणि विचारांच्या शर्यतीत वाऱ्यालाही मागे टाकणाऱ्या मनाला, एका धाग्याने स्थिर करण्यासाठी नाम हा असा धागा आहे, जो सुरवातीला थोडा घट्ट व दृढपणे धरून ठेवावा लागतो, पण नंतर आपसूक मनाची त्यातील गती व गुंतवणूक वाढून, मायामोह व विषयातून मनाची निर्गुंतवणूक होते.
खरतर ही निर्गुंतवणूक हाच खरा उद्देश धरावा. कारण एकदा निरुपयोगी, नकारात्मक कार्य व विचार यातून मनाला बाहेर काढणं जमलं की, तेच मन आपोआप गुंतवणुकीसाठी अन्य साधन वा माध्यम शोधतं. त्यासाठी जर साधनेची वा नाम स्मरणाची सवय जडलेली असेल तर, मुळात कुठेतरी अस्थिर पणे गुंतत असलेल्या मनाला, एका स्थिर गुंतवणुकीची सवय जडेल व माध्यम प्राप्त होतं.
खरतर नाम सुरू करावं यासारखं जीवनात दुसरं सत्कार्य नाही. म्हणजे यात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होतं. तरीही यात एक शंका सतत मनात येत असते की, नामस्मरण कसं करावं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण एका विश्वात्मक परम आत्म्याची लेकरं आहोत. त्या माता पित्यासम ईश्वराच्या म्हणजेच आत्मरूपातील माझ्या आई व वडिलांना मला स्मरणात आणायचं आहे. म्हणजे तिथे पद्धत महत्वाची नसून, त्यात आपलं मन गुंतणं अत्यंत महत्वाचं आहे.
कारण आईचं मुलांवर प्रेम असतंच, पण मुलांचं आईवर प्रेम वा राग काही असला तरी आईच्या प्रेमात न्यूनता वा कमतरता येत नाही. त्यामुळे आपण एक पाऊल पुढे केल्यानंतर, विश्वाची जननी म्हणजेच ईश्वर नक्की दहा पाऊलं पुढे येईल. फक्त मधले, स्व व अहं हे दोन भाव मात्र त्यागणं गरजेचं आहे. तेच जमायला अवघड आहे. म्हणूनच त्यात आपली स्थिती व परिस्थिती दोन्ही आड येत नाही, तर अहंकार आड येतो. कारण आई आपल्या मुलाला कडेवर घेताना तो स्वच्छ आहे की मळलेला हे बघत नाही. उलट मळलेला असेल तर स्वतः त्याला धुवून पुसून साफ करेल.
म्हणजेच आपण कर्मगतीच्या फेऱ्यात अडकलेले असू किंवा विषय व माया यांच्या फेऱ्यात दिशाहीन झालेले असू, पण एकदा आपण ईश्वराचं स्मरण मनाने व मनापासून करायला लागलो की, ईश्वर नक्की त्यात आपल्याला पुढे पुढे नेईल आणि नामाची आवड, गोडी आपोआप वाटायला लागेल. म्हणूनच दृढ होऊन नाम घ्या, गुरुचरणी स्थिर रहा त्यातूनच पुढील गती मिळत जाईल.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment