भोग आणि ईश्वर १२०
आज सलग १२० दिवस एकच विचार धरून त्यावर रोज एक लेख लिहून हा उपक्रम चालू आहे. सलग १२० दिवस अर्थात चार महिने लिहिणं हा अद्भुत योग सद्गुरुंच्या कृपेने आणि सेवा म्हणून साध्य झाला. सद्गुरु कृपेने अखंड १२० दिवस हा योग जुळून आलाय. ही कृपा अशीच अखंड राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
काल म्हटल्याप्रमाणे, आज आपण मनाच्या अवकाशातील unwanted अर्थात अतिरिक्त व गरज नसलेल्या फाईल्स अर्थात अविचार, काळज्या, चिंता, अनिष्ट विचार आणि त्रासदायक, वेदनादायक अनुभव, आपल्यासह इतरांवरील असलेला राग, क्रोध,मत्सर व द्वेष कसा काढून टाकायचा यावर विचार करूया. पण त्याआधी एक उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा काय आणि निचरा कसा करायचा ते लक्षात येईल.
निचरा या शब्दाचा विग्रह दोन प्रकारे करता येईल. चरा म्हणजे खा अर्थात खाण्यास योग्य असे सर्व खा. त्यामुळे निचरा म्हणजे जे चरण्यास अयोग्य , जे त्याज्य ते खाऊ नका. दुसऱ्या अर्थाने चर म्हणजे आचरणास योग्य असे आत्मसात करा, वापरात आणा आणि मनात साठवून त्याचा योग्यवेळी वापर करा. त्यामुळे अर्थातच निचरा म्हणजे जे आचरणास अयोग्य, जे उपयोगाचे नाही, ज्याने अविचार होऊन, त्रास अथवा ऱ्हास होऊ शकतो असे सर्व त्याग करा, सोडून द्या.
आता हे सर्व अर्थपूर्ण वाटलं तरी त्याज्य करण्याची प्रक्रिया काय, कशी असावी आणि तिचा अवलंब कसा करावा, हासुद्धा प्रश्न आहेच. यासाठी अपण दोन उदाहरणं पाहू. एक संगणक तज्ञ, ज्यावेळी येतो तो सर्वात प्रथम temp अर्थात टेम्पररी फाइल्स काढून टाकतो. त्या फाईल्स कोणत्या हे संगणकातील आज्ञावली अर्थात प्रोग्रॅममध्ये ठरवून दिलेले असते, त्यानुसार ते होते. मानवी मेंदूत व मनात अशी काही सोय आहे का ते पण पुढे पाहू.
दुसरं उदाहरण सकाळी उठून,ज्यावेळी महिला काम सुरू करतात, रात्री स्वच्छ केलेल्या ओट्यावर आधी चहा, मग नाश्ता, नंतर दुपारचं जेवण या क्रमाने काम चालतं. हे सर्व करत असताना वा काम झाल्यावर, ज्यावेळी तोच ओटा स्वच्छ करायची वेळ येते त्यावेळी, तयार केलेला स्वयंपाक स्वच्छ भांड्यांमध्ये ठेवून वेगळा केला जातो. म्हणजे चर. त्यानंतर धुवायची भांडी सिंकमध्ये किंवा ठरवलेल्या ठिकाणी नेऊन ठेवली जातात, आचरणास अयोग्य. त्यानंतर सर्व ओट्यावरील पडलेलं आणि सालं, त्याज्य कण इत्यादी सर्व एका ठिकाणी गोळा करून त्याचा निचरा केला जातो.
याच तत्वानुसार आपण मार्गक्रमण करूया. यात दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील उदाहरणात पाहिल्या प्रमाणे काही काही कामानंतर लगेच ओटा साफ केला जातो आणि काही काही कामात सर्व झाल्यानंतर तो साफ केला जातो. त्याच प्रमाणे काही विचार,विखार व वासनयुक्त, मत्सर द्वेष इत्यादी त्याज्य विचारांची तणं त्या त्यावेळी लगेच काढून मनाचा ओटा साफ ठेवला पाहिजे. त्यासाठी मनाचा मनाशी संवाद उपयोगी येतो. स्वतःला प्रश्न करायचा की,या विचारांना जागा देऊन आणि मनात त्यांचं चिंतन करून आज वा भविष्यात मला काही कायमस्वरूपी लाभ आहे का?.
याच उत्तर नक्की नाही असच मनातून येईल. या संवादात्मक प्रक्रियेने मनाला आपोआप पुढे समजत जाईल की काय चिंतन करावं आणि काय करू नये. कारण ज्याप्रमाणे लेकरांची काळजी सतत मनात असते, त्यांच्याबद्दल प्रेमभाव आपुलकी मनात घर करून असते किंवा ईश्वर, सद्गुरू,नाम व साधना यांचे भाव मनात असतात, त्याप्रमाणे ही अविचारांची गरज आहे का, हे ज्ञात झालं आणि प्रत्येकवेळी त्याचं उत्तर मन स्वतः शोधत गेलं की आपण निश्चीन्त होतो. फक्त तोपर्यंत ही चिंतनप्रक्रिया जाणूनबुजून रुजवणं गरजेचं आहे. कारण आपण आणि मन हे सवयीचे गुलाम आहोत. ती सवय चांगल्या गोष्टींची लागली की, पुढील काम सोप्प झालं.
हे झालं नकारात्मक विचारांबद्दल. चिंता आणि काळज्या कशा जाव्यात. तर त्यासाठी नाम साधन आणि सद्गुरू चिंतन यासारखं दुसरं साधन नाही. ज्या ज्यावेळी असे चिंताजनक विचार येतील, त्या त्यावेळी मनात जप करून त्या नादाचा माग काढत, कल्पनानादाचा अभ्यास करा. मग बघा, दोन हेतू साध्य होतील. एक म्हणजे त्या साधनेचा अभ्यास होईल आणि ते विचार, चिंता, काळज्या कुठे गेले कळणारसुद्धा नाही. कारण रिकाम्या मनाला काही छंद, ध्यास वा व्यसन गरजेचं असतं. ते व्यसन वा तो छंद चांगला असेल तर भलं होईल आणि वाईट वा वाममार्गी असेल तर दुःख, काळजी, भोग वा आत्मघात नक्की.
यावर अजून पुढे चर्चा करूया, उद्याच्या भागात. तोपर्यंत सद्गुरूवंदन, नामस्मरण करा आणि जमल्यास कल्पना नादाचा अनुभव घेत रहा. श्रद्धा दृढ, मन सुदृढ आणि विचार सकारात्मक ठेवा, ईश्वर नक्की पाठीशी राहील आणि सद्विचारात प्रचंड शक्ती व ऊर्जा आहे हे ध्यानात ठेवा.
भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment