भोग आणि ईश्वर २८६ एक गोष्ट आपल्या लक्षात आली की, जाणिवांची जागृती, ही मनातील त्या त्या शक्तिकेंद्रांवर अवलंबून आहे आणि त्यावर येणारी क्रिया व प्रतिक्रिया सुद्धा. म्हणजे येणारे विचारसुद्धा शक्तिकेंद्रांवरच अवलंबून आहेत. आता या तयार झालेल्या साखळीचा भेद कसा करायचा,हाच महत्वाचा प्रश्न आहे. इथे काही गोष्टी इच्छाशक्तीच्या बलावर आणि मनातील सकारात्मक ऊर्जेवर अवलंबून आहेत. म्हणजे जर मनात थोडीशी जरी सकारात्मकता शिल्लक असेल, तर वरील चक्र भेदण्याचा विचार मनात येऊ शकतो आणि त्यादृष्टीने इच्छाशक्ती कार्यरत होऊन, मनाला सकारात्मक सुरवात करायला प्रोत्साहित करू शकते. इथेच माऊलींच्या अभंगातील एक चरण आपण विचारात घेऊया. या थोड्याशा सकारात्मकतेला कार्यप्रवृत्त करण्यासाठी माऊली सांगतात की, देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी, साधियेल्या. म्हणजेच जर अंशमात्र जरी सकारात्मक भाव मनात कुठेही शिल्लक असेल, तर क्षणमात्र जरी आपण मनाने वा मनापासून देवाच्या दारी उभे राहिलो, तरी चारी मुक्ती साध्य झाल्या असे म्हणायला हरकत नाही. इथे देवाचिये द्वारी म्हणजे हृदयातील भगवंत मंदिरात, क्षण...