Skip to main content

अध्यात्म विराम १५७

अध्यात्म विराम १५७
 
देहात येताना सोहम जाणणारा आत्मा देहात आल्या पश्चात कोहमच्या नादात जगात हरवून जातो. कधी या जन्मी केलेल्या कधी या जन्मात न केलेल्या कर्मांची फळं भोगता भोगता, संसाराच्या वाटेवर, आयुष्याच्या व वयाच्या तिसऱ्या आणि महत्वाच्या अंकात प्रवेश करतो आणि पुढचं चित्र दिसायला लागतं आणि प्रपंचातून निवृत्त झालो म्हणून ईश्वराच्या वाटेवर लागतो. म्हणजे इथे देहाच्या, मनाच्या वासना, कामना शमल्यामुळे, ईश्वराच्या स्मरणाकडे वळतो अश्यातला अजिबात भाग नाही. पण आता देहाची साथ नसल्यामुळे, मनातील काही वासना व कामना आता शमतील याची शाश्वती नसल्याने, सर्व सामान्यतः ईश्वराच्या स्मरण मार्गाकडे वळतो.

हे कटू वाटलं तरी निर्विवाद सत्य आहे. फार थोडे असतात, जे फार आधीपासून या मार्गाचा निदान विचार करतात आणि त्यात फार थोडे, प्रत्यक्ष ईश्वरी कर्म करतात. किंवा काही थोडेच असतात, जे खरच मनाने निवृत्त होऊन मग, या मार्गाकडे वळतात. यामध्ये ईश्वरी कृपेची प्रेरणा असतेच यात शंकाच नाही कारण जन्माला येताना ईश्वराने दिलेला टास्क लक्षात राहणं, हे असीम कृपेचं लक्षण आहे. अर्थात यासाठीची तयारी किंवा पार्श्वभूमी मागील काही जन्मात केलेली असावी लागते. तरच या जन्मात त्याची आठवण मनात दृढ राहते आणि त्याप्रमाणे योग्य कर्म घडते. पण... आणि हा पण खूपच महत्वाचा ठरतो. 

कारण ईश्वरी वासनांची बीजं, जी पहिल्या जन्मात पेरलेली असतात ती, आत्मा परम लोकांतून ब्रम्हलोका तून आणि तिथून भुलोकात येतो तेंव्हा विरतात. तेंव्हा मार्गात माया आणि तिचा खेळ, त्या जीवाला, उन्नत श्रेणी वरून नीचतम श्रेणीत आणून सोडतात. इथेच खरी चुकांची सुरुवात होते. या चुका साध्या चुका ते घोडचूका ते अक्षम्य अपराध इथपर्यंत जीवाची अधोगती करतात. वास्तविक आत्मा स्वतः मूळ रुपात शुद्धच असतो. पण त्यावर कर्माच्या, गर्वाच्या, लोभाच्या, मत्सराच्या, अज्ञानाच्या काजळीची पुटच्या पुट चढतात आणि तोच शुद्ध आत्मा, अशुद्ध होतो आणि या सर्व पसाऱ्यात स्वत्व हरवून बसतो. 

हे स्वत्व, शुद्धता प्राप्त करण्याचा मार्ग फक्त आणि फक्त, भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग, याग, दान धर्म या पुण्य कार्यातून जातो. म्हणून जोपर्यंत जीव, या मार्गाकडे जाण्याचा विचार करत नाही, तोपर्यंत ती काजळी निघण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.  आता या मार्गाचा विचार सुद्धा मनात येण्याचा जिथे प्रश्न निर्माण होत नाही, तिथे तो ईश्वरी वासनांचा मार्ग जोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा योग साधण्याची बुद्धी, समय, संधी आणि योग, या चारही गोष्टी जुळून येतात, जर आपल्या पूर्वायुष्यात किंवा पूर्व जन्मात कधीही आपण नवविधा भक्तिच्या कोणत्याही एका पायरीवर कधीतरी काही क्षण जरी उभे राहिलेले असू, तरच. 

म्हणूनच संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी म्हटलंय, देवाचीये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या.यावर सुद्धा उद्या चर्चा करूया.  कारण बुद्धी असेल तर समय नसतो, समय असेल तर बुद्धी होत नाही, हे दोन्ही असेल तर संधी मिळत नाही आणि हे तीनही असेल तर योग येत नाही. म्हणून या चारही गोष्टी जुळण्यासाठी आपण कधी तरी काहीतरी पुण्य जोडणं गरजेचं आहे. अगदी, ईश्वरी नामाच,कार्याचं,थोडतरी श्रवण घडलेलं असेल तर, पुढील पायरीवर स्वतः सद्गुरू वा ईश्वर नेण्यासाठी योजना घडवून आणतात. 

याचाच बोध देणारी एक लघुकथा आपण उद्याच्या भागात चिंतनात घेऊन, हाच विषय अजून पुढे नेऊया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...