Skip to main content

गीत विश्लेषण : स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हाभाग २

गीत विश्लेषण : स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा
भाग २

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

पाहिलं कडवं

रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या
कधी सोशिला उन्हाळा कधी लाभला विसावा
स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा
 
गीत : म पां भावे
संगीत : अनिल अरुण
स्वर : आशाताई

विषयाला सुरुवात करण्याआधी, कालचा पहिल्या भाग पोस्ट केल्यानंतर, एक वाचक श्री बालमुकुंद पतकी, यांनी त्वरित लिहिलं की, त्यांच्याकडे, कविवर्य, खुद्द म पां भावे यांच्या हस्ताक्षरातील हेच गीत आहे आणि माझ्या विनंती नुसार,त्यांनी ते त्वरित मला पाठवलं.तेच गीत या लेखाच्या कमेंट मधे मी पोस्ट केलं आहे. आता पहिल्या कडव्याच विश्लेषण. 

 मुळात अश्या कल्पनेच्या प्रेमातील सागरात आकंठ बुडालेली आणि कल्पनेतील स्वप्न आणि वास्तवातील विरही दाहकता, या अपूर्णतेच्या सीमेवर असणारी, एखादी अल्लड प्रेयसी, त्या प्रकट करता न आलेल्या किंवा प्रकट होऊन अपूर्ण राहिलेल्या वा प्रकट करण्यास पुरेसं अवसान न मिळालेल्या, प्रेमाच्या पतंगाच्या अत्यंत नाजूक दोरीवर बसलेली असते.अर्थातच तिचं मन, आपल्या प्रेमाची, प्रियकरासह घालवलेले किंवा घालवायचे क्षण कल्पनेत जगत असताना, त्या अविट आणि कल्पनातीत प्रणय सुखाच्या अनेक चित्रकथा, त्यातील कल्पना रम्य प्रपंचाची, सहवासाची, अपेक्षांची, इच्छांची रेखाचित्र रंगवत असते.

रेखाचित्र म्हणजे ज्यांना अजून वास्तवात येण्यास अवधी आहे, पण एखाद्या अल्लड क्षणी, मन हरवून बसलेली प्रेयसी, त्या कल्पनेत रममाण क्षणांची कल्पनेतीलच चित्र, मनात पहात असते. माणसाला प्रत्यक्षातील डोळे आणि कल्पनेतील चक्षु विधात्याने दिलेले असल्यामुळे, ते मन,पाहिलेलं आणि न पाहिलेलं अशी दोन्ही चित्र कल्पनेने पाहू शकत. म्हणूनच ती प्रेयसी, त्या कल्पनेतील प्रणय चित्रांच्या रेखाकृती आपल्या चित्तातील चक्षूने पाहते. 

पण मन हे माणसाला दोन्ही प्रकारची चित्र दाखवतं आणि सकारात्मक मनात कल्पनेतील राजस चित्रा बरोबर, कल्पनेतील साशंकता सुद्धा निर्माण करते. त्यामुळे या कल्पनेतील प्रणयी रेखाकृती, साशंक मनाच्या एका झोक्यात सहज विरून, विझून आणि विस्कटून जातात. या मनाला आणि त्याच्या सकार व नकार अश्या दोन्ही टोकांना, कसं काय नियंत्रित करता येईल. ती तर अशक्यप्राय गोष्ट आहे. आता या विरही व्यथेची दाहकता प्रत्यक्षातील ग्रिष्माच्या दाहकतेहून जाळणारी आहे. कारण ग्रीष्मात फक्त देह जळतो, पण विरहात मनाला सोसावी लागणारी दाहकता अकल्पनीय असते. 

तरीही प्रियकराच्या कल्पनेतील भेटीची आस, त्याची वाट पाहायला लावणारी वेडी हुरुहुर, त्या वेड्या हुरुहुरी मधील ओढ, त्याच्या सह घालवलेल्या, मोजक्या का होईना, पण मिळालेल्या क्षणांची आठवण यांचा आधार, त्या ग्रीष्मात सुद्धा मधेच कधी कधी विसाव्याच्या क्षणांसमान असतो. 

म्हणून सुद्धा इतक्या सर्व गोष्टीतून, त्या अपूर्णतेची अविट गोडी, त्या प्रेयसीला साद घालत आहे, सतत अशी हळू वार जाणीव निर्माण करत असते आणि त्या स्वप्ना तल्या त्या प्रेमाच्या कळ्यांना जणू सांगत असते , हे क्षण इतके अपूर्व आहेत की तुम्ही कधीच उमलण्याची काहीही आवश्यकता नाही. नव्हे तुम्ही कधीच उमलू नका. या विरह, प्रेम, स्वप्न, हुरहूर, अनामिक ओढ, आस यांचा आनंद अजून घेत राहूदे. किंवा हेच आता माझं जीवन झालेलं आहे. 

क्रमशः ....... उद्या दुसरं आणि अंतिम कडवं.

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०४/२०२३

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...