Skip to main content

एक पौराणिक कथा :

 प्रस्तुत काळासाठी एक  कथा :

पुराणकाळातील गोष्ट आहे. एकदा जगत्पालक भगवान महाविष्णू शेषशायी समाधी अवस्थेत होते. माता लक्ष्मी चरणांशी बसून भगवंतांचे पाय चुरत होत्या. बराच काळ याच स्थितीत गेला. अर्थातच देवर्षी नारद यांचं आगमन त्याठिकाणी झालं. 

नारद : " नारायण नारायण. माते मी अवेळी येऊन भगवंतांच्या आणि आपल्या समाधीत बाधा तर आणली नाही ना. 

देवी : अर्थात आता या प्रश्नाला काही अर्थ आहे असं वाटतं  का आपल्याला. 

नारद : नारायण नारायण. माते क्षमस्व.   सर्वकाळी सर्ववेळी विश्वसंचाराचं माझं  नित्य व्रत असल्यामुळे, माझाही नाईलाज असल्यामुळे मला कार्यहेतू प्रित्यर्थ आगमन व गमन करावंच लागत.  अर्थात मर्त्यलोकात विहार करताना काही शंका  मनात निर्माण झाल्यामुळे आगमन करावं लागलं. कारण 

देवी: कारण आपण मनात आलेली शंका विचारल्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही आणि मुनीवर हे आपले दुसरे व्रत आहे. 

नारद : माते आपण त्रिकालज्ञानी आहात. आता विनाविलंब माझे आराध्य कधी समाधीअवस्थेतून जागृतावस्थेत येतील हे कृपा करून आपण सांगितलंत तर बरं होईल. मला समजेल कि, मला किती काळ अजून प्रतिक्षा करावयाची आहे. 

देवी : आपण आलात हे चक्रपाणींनी  जाणलं असेल. शीघ्र समाधीअवस्थेतून नेत्रकवाडे उघडून आपल्याला पृच्छा करतीलच. आपण सावध असा. 

नारद : नारायण नारायण. स्वामींकडे आल्यावर मी कायम सावधच असतो. तरीही त्यांच्या लीलांचा पार लागत नाही. 

काही क्षण जातात. भगवान श्रीमहाविष्णू आपल्या कमलनयन लोचनांच्या पाकळ्या हळुवार उघडून आधी देवींकडे आणि नंतर नारदांकडे पाहतात. देवर्षी त्वरित प्रणाम करून म्हणतात. 

नारद : नारायण नारायण, प्रभू आपल्याला माझ्यामुळे समाधीअवस्था त्यागावी लागली. याबद्दल मी लज्जित आहे. परंतु, 

महाविष्णू : नारदा अरे तू येण्याआधी तुझ्या आगमनाची चाहूल लागते मला. 

नारद : अर्थात 

महाविष्णू : अर्थात आपल्या मनाच्या वायुवेगाने आपल्या मनातील शंका मजहृदयी आधी आगमन करतात आणि आपण तदनंतर. 

नारद : हि जगदीश्वरांची कृपाच माझ्यावर. 

महाविष्णू : किमर्थम आगमन केलेत. 

नारद : आपण जाणताच त्याप्रमाणे मर्त्यलोकात विहार करताना, जे पाहिलं, त्यामुळे व्यथित होऊन मी वायुवेगे इथं आगमन कर्ता झालो. 

महाविष्णू : बोला मुनीवर, आपल्याला अभय आहे. 

नारद : कृपा जगदीश्वर. शंका अशी आहे कि, असुरशक्ती, दुष्टी दानवीशक्ती पृथ्वीवर वेळोवेळी  मानवी रूपात कार्यरत असतात. भक्तांना आणि सामान्य जनांना कायम प्रश्न असतो कि, या शक्तींचा अंत जवळ आला आहे याची काय खूणगाठ धरावी . ज्यायोगे त्यांच्या श्रद्धा आणि दृढविश्वास यांची दोरी अतूट राहील. 

महाविष्णू : नारदा तुझ्या मुख्य शंकेकडे येण्याआधी एक लक्षात ठेव श्रद्धा हि दृढ असेल तरच तिला श्रद्धा म्हणता येईल. जर ती तशी नसेल तर त्याला आस किंवा इच्छा किंवा मनीषा म्हणता येईल. श्रद्धा हि सर्वकाळ सर्ववेळ दृढच धरावी . प्रस्तुत काळात प्रथ्वीवर कलियुग सुरु आहे. त्यामुळे असुरी शक्ती आणि कलीचा प्रभाव विशेष राहणार. परंतु तरीही सर्व युगात एक गोष्ट विशेषत्वाने ध्यानात ठेवायची ती म्हणजे माया हि अश्या असुरीशक्तींना पूर्णपणे व्यापून असते.  अश्या शक्ती कायम या मायेच्या दृढ प्रभावाखाली असतात.  ज्यावेळी मायेचा हा प्रभाव विलक्षण वाढतो, त्यावेळी तो त्या असुरीशक्तींना विनाशाकडे नेतो. 

म्हणूनच हे विशेष लक्षात ठेवायचं आहे कि, ज्यावेळी अश्या असुरी आणि दानवी शक्तींचा अत्याचार, त्या अत्याचारांची मर्यादा, चरणसीमेवर पोहोचतो त्यावेळी अश्या शक्तींचा अंत समीप आला आहे हि खूणगाठ नेहमी बाळगावी. कारण कोणतीही शक्ती, ऊर्जा संपताना आपली पूर्ण शक्ती क्षमता वापरून अस्तित्व दाखवण्याचा वा टिकवण्याचा केविलवाणा यत्न करते.  परंतु  मर्त्यलोकातील प्रत्येक गोष्टीला आदी आणि अंत दोन्हीही आहे, हे ध्यानात धरले कि, धैर्य वाढतं .  

नारद : नारायण नारायण. मनातील शंकेची जाळी दूर झाली कि, मन पूर्ण शांत होतं . 

श्रीमहाविष्णू आणि देवी : आणि मग ते मन नवीन शंका शोधावयास भ्रमंती करतं . काय देवर्षी ?. 

नारद : नारायण नारायण. भगवतं आणि माते आपण दोघेही. 

दोघेही हसतात आणि या हास्यातच नारद अंतर्धान पावतात. 

संकल्पना आणि लेखक : प्रसन्न आठवले ३१/१०/२०२०

१२:३३

 


























Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...