Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ९० (विवाह सोहळा १८) ( विवाह सोहळा समाप्ती)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९० (विवाहसोहळा १८) (विवाह सोहळा समाप्ती) 

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
आठ दिवसांचा  विवाह सोहळा संपन्नतेकडे चालला आहे. सर्व कार्य , विधी, व्यवहार, कार्यक्रम अतिशय सुंदरपणे आणि सुव्यवस्थितपणे पार पडले. कमी वेळात श्रीपती आणि रुक्मिणीच्या विवाहाचं उत्तम आयोजन व नियोजन राजा भीमकाने करून सर्व यादवांसह वसुदेव देवकी आणि कुटुंबियांना आश्चर्यचकित करून सोडलं होतं. सोहळा उत्तमच झाला यात शंका नाही.

राजा भीमक आपली पत्नी राणी शुद्धमती हिला म्हणाला

"कार्यव्यस्ततेत असताना काही गोष्टी करतो आपण , त्याप्रमाणे आपण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आता त्यांना विडा दक्षिणा व निरोप देण्याची वेळ समीप आली आहे. त्यामुळे आपण आता भेटीच्या वस्तू घेऊन त्यांना पाठवणीच्या निरोपांचे विडे द्यायला जाऊया." 

अर्थात हे बोलताना राजाचा आवाज कंप पावत होता. कारण हा साधा निरोप नव्हता प्रत्यक्ष मुलीला सासरी जाण्यासाठी पाठवणीचा निरोप द्यायचा आहे. हे जाणून असलेले दोघे मातापिता अत्यंत संवेदनशील झालेत. दोघांनाही स्वस्थिती व एकमेकांची मनस्थिती पूर्ण माहीत असल्याने दोघेही काहीच न बोलता निघतात. 

इकडे यादवांकडे जल्लोष सुरू आहे. द्वारकेहून कृष्णाचे प्रस्थान , त्यापाठोपाठ बलभद्राचे ससैन्य गमन, रुक्मिणीचं अंबामातेच्या मंदिरातून कृष्णाकडून हरण, त्यानंतर जरासंधा सह त्यावेळच्या मातब्बर शत्रूंशी तुंबळ युद्ध आणि त्यांना पळवून लावणं, रुक्मिचा आणि कृष्णाचा सामना, रुक्मिचा त्यात पराभव, रुक्मिणी आणि कृष्णासह प्रभासक्षेत्री मुळमाधव येथे आगमन,पाठोपाठ राजा भीमक यांचं आगमन लग्नसोहळ्याचा प्रस्ताव आणि त्वरित सर्व तयारी, माणसं, वऱ्हाडीमंडळी जमा होऊन लग्नकार्य सुव्यवस्थितपणे पार पाडणं. या सर्व घटना  इतक्या वादळी झाल्या की, आज हे सर्व आपणच केलं याचं यादवांसह सर्वांना आश्चर्य वाटतंय.

निघण्यासाठी सर्व बांधाबंध करून झाली आहे आणि मंडळी जरा निवांत आहेत. त्याचवेळी राजसह राणीचं आणि सर्व सेवक सेविकांचं आगमन होतं, जे अपेक्षित होतं. राजा वासुदेवांना हात जोडून नमस्कार करतात. त्यांना उंची वस्त्र व अलंकार यांसह अनेक भेटवस्तू देतात. याचरितीने देवकीला हळदकुंकू लावून, उचित सन्मान करून राणी वस्त्र अलंकार यांनी सन्मानित करते. आतापर्यंतच्या सर्व विधीत जी रुक्मिणी सतत आई वडिलांच्या मागे असायची आज ती कृष्णा सोबत आहे. दोघे राजा व राणी हात जोडून अनुक्रमे वसुदेव व देवकी यांना सद्गतीत आवाजात म्हणतात

" चार भावंडांच्यात मोठ्या लाडाकोडात वाढलेली लेक आहे माझी. आपणच आता तिचे माता पिता आहात. ती आपल्या आज्ञेबाहेर नसेल याची मी खात्री देतो. तरीही काही चुकीचं वाटल्यास आपणच तिला समजावून व प्रसंगी दरडावून बोलू शकता. तो हक्क आपल्याला माता पिता म्हणून आहेच." 

यापुढे राजाला काहीच बोलता येईना. साश्रु नयनांनी राजा राणी फक्त हात जोडून उभे आहेत. उग्रसेन वसुदेव आणि देवकी यांनी अनुक्रमे राजा व राणी यांना आलिंगन देत आश्वस्त केलं की, त्यांच्या मुलीला ते सुभद्रा व रेवती यांसमान वागवतील. काळजी नसावी. या आश्वासनाने उपकृत होत राजा भीमकाने कृष्णाकडे वळून हात जोडून कृष्णाच्या पायावर लोटांगण घातलं. तोच कित्ता राणीने गिरवला आणि कृष्णचरणी लीन होत दोन्ही चरण अश्रूंनी धुवून काढले. दोघांनाही धरून उठवत कृष्ण, एक कृष्णास्मित करत आहे. राजा हात जोडलेल्या स्थितीत उठून उभे राहत म्हणतात. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०४/०३/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...