Skip to main content

सुभद्राहरण १

सुभद्राहरण १ 

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll 

जगन्माता जगतपिता भाव उकळोनि तव चरणा
आता वाहतो नवीन पुष्पां कथानामे सुभद्राहरणा 
स्वीकारोनी या कमलपुष्पां पुरवावे मनमनोरथा 
श्रीगणेश श्रीशारदा लागलो चरणा हे आदिनाथा

नमन एकदंता वरदविनायक शुर्पकर्णा भालचंद्रा
तुझे गाऊनी स्तोत्र दिन सुरू करतो हा तव भक्त
माझ्या इच्छिल्या संकल्पास कृपा करोनि प्रसन्न 
सुभद्राहरण कथाभाग पूर्ण करावा धरुनी हस्त

श्रीगजानन, श्रीरुक्मिणीकृष्ण आणि  सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, यांना सादर वंदन करून नवीन कथाभाग सुभद्राहरण मी सुरू करत आहे. या कथेच्या मिषाने कृष्णकोश, श्रीधरकवी यांचं पांडवप्रताप आणि मोरोपंतांचं कृष्णविजय हे वाचण्याचा योग आला. यातील मोरोपंत आणि कवी श्रीधर यांचं लेखनकार्य अतुलनीय असं आहे. 

त्यांच्या लेखनाची व्याप्ती पाहिली तर मी सागरात तिळाएवढं सुद्धा लेखन करत नाही असा प्रत्यय मला आला. तरीही मराठी सारस्वताच्या प्रांगणात काही मृत्तिका कण वेचता आले तर तीही सेवा खूप आहे असं मनाचं समाधान करून मी विषयाकडे वळतो. माझ्या कथेत मूळ महाभारतातील आदिपर्वातील अध्याय २१२ ते २२१, मोरोपंतांचं  कृष्णविजय,कवी श्रीधर आणि कृष्णाकोश यातून वेचलेल्या मोत्यांची माला करण्याचा प्रयत्न असेल. जर काही दोष असेल तर तो माझ्या लेखनातील वा आकलनातील समजावा आणि जर काही सदोष असेल तर तो या सर्व दिग्गजांच्या पुण्याईचा प्रभाव आणि प्रभा समजा. 

ही कथा मुख्यतः महाभारतातील आदीपर्वातील कथा आहे. दुर्योधनादी बंधू मामा शकुनीच्या नादी लागून पांडवांप्रति 
दुर्व्यवहार कमी करत नाहीत आणि त्यापुढे पुत्रप्रेमाने आपण काहीही करू शकत नाही , या अपराधी भावनेने अंध राजा धृतराष्ट्र पांडवांशी समेट घडवून आणतो. कृष्णाला साक्षीस ठेवून परस्पर खांडवप्रस्थ हा जंगल असलेला आणि उजाड भाग त्यांना राज्य म्हणून देतो आणि विनंती करतो की येथे राज्य स्थापन त्यांनी सुखेनैव राज्य करावे. 

धर्म अर्थात युधिष्ठिर विचारपूर्वक व कटुता टाळण्यासाठी प्रस्ताव स्वीकारून खांडवप्रस्थात राज्य निर्मितीची व्यवस्था कृष्ण व अर्जुन यांच्या हाती सोपवतो. अर्थातच दोघे मिळून खांडवप्रस्थात राज्यासाठी जागा निर्माण करून एका सुंदर नगराची रचना करतात. जी इंद्राच्या अलंकापुरीहून उत्तम असते. अर्थातच याकार्यात विश्वकर्मा कृष्णाला सहकार्य करतो. त्या नगराच्या सौन्दर्यावरूनच त्या नगराला खांडवप्रस्थ ऐवजी इंद्रप्रस्थ हे नामाभिधान प्राप्त होतं आणि इतिहासात ते अजरामर झालं. 

अर्थात कृष्ण इंद्रप्रस्थात युधिष्ठिराचा राज्याभिषेक सोहळा पार पडेपर्यंत पूर्ण वास्तव्यास होता. कारण हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला की, एका मोठ्या तापत्रयातून सुटका होईल आणि पांडवांच्या मागील एक शुक्लकाष्ठ काही काळासाठी दूर होईल हा कृष्णाचा मानस होता. कारण लहान पणापासूनच्या सर्व घटना आणि त्यामागील दुर्योधनाचा कुटील हेतू सर्वश्रुत होता. म्हणूनच हा एक शुभकाळाचा द्योतक आहे वा असावा हा त्याला विश्वास असावा.

सर्व सोहळा यशस्वीपणे पार पडला. इंद्रप्रस्थात राजा युधिष्ठिर याने उत्तम कार्यकारभार सुरू केला , हे पाहून कृष्णाने द्वारकेसाठी प्रस्थान ठेवण्याची अनुमती मागितली. पाचही बंधू, कृष्णा अर्थात कृष्णाची मानस भगिनी द्रौपदी आणि कृष्णाची आत्या अर्थात माता कुंती यांनी अत्यंत जड 
अंतःकरणाने त्याला प्रस्थानाची अनुमती दिली. 

क्रमशः 

भाग १ समाप्त 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
ll शुभम भवतू ll 
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll



Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...