भोग आणि ईश्वर ५०० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
आज या ।मालिकेला ५०० दिवस पूर्ण झाले. सलग ५०० दिवसात सलग ५०० लेख (रोज एक या प्रमाणे) लिहिणं आणि तो रोजच्या रोज पोस्ट करणं, ही किमया फक्त माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पूर्ण कृपेने साध्य झाली. त्यांच्या अलौकिक सान्निध्याची जाणीव नित्य मला माझ्या आयुष्यातील अनेक घटनांमध्ये जाणवली आहे आणि जाणवते आहे. त्यामुळे या ५०० दिवस व ५०० लेख याचं पूर्ण श्रेय मी माझ्या सद्गुरूंना देईन.
पण या मालिकेला यशस्वी करण्यात तितकाच महत्वाचा वाटा माझ्या हजारो वाचकांचा आहे. मी त्यांचासुद्धा आजन्म ऋणी राहीन. आज ही मालिका ऑडिओ माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत पोचते आहे आणि जवळजवळ ३५० भागांचं ऑडिओ पूर्ण होऊन ते व्हाट्सऍप माध्यमातून सर्वांपर्यंत पोचत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या मालिकेवर एक पूर्ण लेख लवकरच पोस्ट करीन. त्यांना पुन्हा एकदा वंदन करून आजच्या भागाला सुरवात करूया.
भोगांच्या आपत्तीला सुरवात खरंतर कर्माचं फल यास्वरूपातच होते. पण ते आपल्या आयुष्यात येण्याचा, आपल्या दृष्टीने काळ चुकलेला असतो. म्हणजे आपलं मत हे स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यातील घटनांवर आधारित असतं. प्रत्यक्षात स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यातील कोणत्याच घटनेचा दुसऱ्या घटनेशी संबंध जोडणं चुकीचं आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे संचिताची ठेव, त्यात साठवून आणलेलं माप, या जन्मात केलेली कर्म आणि त्या कर्मातील बेरजा व वजाबाक्या, यांचं कोणतंही कोष्टक किंवा तक्ता आपण मांडलेला नसतो.
मुळात आपण फारफारतर या जन्मातील, आठवतील तितक्या कर्मांचा आढावा घेऊ शकतो. पण संचितातील ठेवीत जमा किती आणि खर्च किती, हे विधाताच जाणू शकतो. वेदांच्या माध्यमातून जन्माला आलेल्या काही शास्त्रांच्या माध्यमातून आपल्या संचितात काय लिहिलं आहे, ज्यामुळे आपल्याला त्रास, दुःखं, भोग हे भोगावं लागत आहे, हे जाणता येऊ शकतं. पण तेसुद्धा, ते शास्त्र जाणणाऱ्या व्यक्तीच्या योग्यतेवर, ज्ञानावर आणि अनुभवावर अवलंबून आहे. यात त्या शास्त्राच्या अभ्यास कर्त्याला काही नियम व नीती पाळावी लागतेच.
त्या नितिनियमांचं पालन पूर्णत्वाने न केल्यास, प्राप्त ज्ञान व विद्या कधी चूक करायला लावतील, हे कळणारसुद्धा नाही. त्यामुळे त्याचं पावित्र्य राखलं गेलं तरच, त्याचा पूर्ण प्रत्यय येऊ शकतो. कारण ते शास्त्र फक्त गणिती नियमांवर पूर्णपणे अवलंबून नाही. तर त्यामध्ये अंतर्ज्ञान, अंतःप्रज्ञा अर्थात intution व telepathy या गोष्टींचा लाभ सांगणाऱ्या व्यक्तीस होतो. हे अंतर्ज्ञान, अंतःप्रज्ञा काही विशिष्ट व्यक्तींना जन्मतः आणि काही व्यक्तींना, काही विशिष्ट शास्त्र, योग, कुंडलिनी यांचा अभ्यास करताना प्राप्त होतं.
अश्या व्यक्तींचे भूत आणि भविष्य यांचं अनुमाम हे बऱ्यापैकी घडलेल्या व घडणाऱ्या घटनांच्या जवळपास येऊ शकतं. यामध्ये शास्त्र, त्याची गणितं याही पलीकडे इतर अनेक गोष्टींचा उपयोग होतो. मुळात अशी व्यक्ती, सकारात्मक विचार व शुद्ध चारित्र्याची असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण सदर व्यक्तीच्या विचारांवर, वागणुकीवर, ज्ञानावर, अभ्यासावर, त्या गोष्टींचा प्रभाव पडतो. जर या नितिनियमांचं पालन आणि शास्त्रातील व विचारांच्या मर्यादा व बंधनं या कसोशीने पाळल्या नाहीत, तर याचा विपरीत परिणाम, वर्तवल्या गेलेल्या किंवा जाणाऱ्या अंदाजावर व ठोकताळ्यांवर होतो.
हीच गोष्ट काटेकोरपणे न पाळता, त्या शास्त्रांचे अभ्यासक, प्रसारक विद्येला अविद्येचं रूप देतात आणि त्या शास्त्रातील, विद्येमागचं पावित्र्य आणि शुद्धता नष्ट होते. मुळातच, वेदातील सर्वच शास्त्र ही, काही नीतिनियम व काही बंधनं पाळूनच अभ्यासायची असतात. त्याचं कारण म्हणजे, यातील जवळ जवळ सर्वच शास्त्र ही, मनाशी, बुद्धिशी निगडित आहेत. आपण हे जाणतोच की, मनावर, त्यातील विचारांवर मनाच्या शुद्ध व अशुद्धतेचा परिणाम सकारात्मक ते नकारात्मक असा होतो.
यावर अजूनही चर्चा उद्याच्या भागात करूया आणि नामाचं बंधन व मर्यादा यांचं पालन करत.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment