भोग आणि ईश्वर ५१५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
अर्पण या शब्दाचा आज जरा सखोल विचार करूया. अर्पण या शब्दाचा मराठीत अर्थ होतो सुपूर्द वा स्वाधीन करणे किंवा इंग्लिशमध्ये to assign. म्हणजे एखाद्याला हक्क वा जबाब दारी किंवा काही कर्तव्य देऊ करणं, म्हणजे अर्पण करणे किंवा स्वाधीन करणे. स्वाधीन करणे म्हणजे स्वतःला त्याच्या आधीन करणे. आता आधीन करणे म्हणजे आपल्या जबाबदारीतून काही भाग वा हिस्सा दुसऱ्याला करायला देणे.
आता व्यवहारात आपण अनेकदा, बाहेरगावी जाताना काही चीजवस्तू किंवा कार्यालयात कामाचं वाटप करताना कामाचं नियोजन व आखणी करून, त्यातील काही भाग, हाताखालच्या किंवा आपल्याच पातळीवर नवीन खात्याकडे सुपूर्द करतो. या व्यावहारिक गोष्टीत, जबाबदारीसोबत काही प्रमाणात हक्काचं सुद्धा विभाजन होऊन, त्याचंसुद्धा वाटप केलं जातं. आता या मध्ये सुपूर्द करणे किंवा स्वाधीन करणे हा भाग व्यावहारिक अर्थाने येतो.
म्हणजेच देणारा आणि घेणारा यांना एकमेकांना कामाच्या स्थिती बाबत अहवाल वा स्थितीचा वृत्तांत पोचवणं वा मागून घेणं, हे क्रमप्राप्त असतं. तरच देणार्याने जे कार्य सुपूर्द केलं आहे, ते घेणारा नीट समजून उमजून व जबाबदारीने करत आहे, हे समजून येईल आणि घेणाऱ्याला आपण ती योग्य तर्हेने समजून करत आहोत, हे ध्यानात येईल.
म्हणजेच एखादी जबाबदारी जेंव्हा सुपूर्द केली जाते, तेंव्हा महत्वाचा मुद्दा म्हणजे, ज्याच्यावर ही जबाबदारी सोपवायची आहे, तो ती पेलण्यास सक्षम आहे, हे जाणून घेणे महत्वाचं आहे. बहुतांश प्रकरणात, वरिष्ठ आपल्या कनिष्ठाला विश्वास देतात की, काहीही झालं तर सल्ला, मत वा निर्णय घ्यायला मी आहे, तेंव्हा निर्धास्तपणे दिलेलं कार्य पूर्ण कर. हे व्यवहारातील सर्व स्वाधीन, सुपूर्द गोष्टींबाबत तत्व असतं.
विश्वाच्या या पसाऱ्यात, अनेक जन्म अनेक योनी फिरून, भोग व उपभोग यांच्या चक्रातून फिरत असणाऱ्या, सर्वसामान्य जीवाला, खरतर काय सुरू आहे, काय करतो आहोत आणि प्रत्यक्षात काय करणं गरजेचं आहे, हेच समजत नाही. जीवनाचा मार्ग, त्यातील घटना, कर्मफलाची गती, जशी नेईल त्याप्रमाणे, जात राहणं, इतकंच ज्ञात असतं. आपण यातून बाहेर पडू शकतो किंवा पडलं पाहिजे, हेच मुळात ज्ञात नसल्यामुळे, जन्म झाल्यामुळे जगणे आणि मृत्यू आल्यामुळे या देहातून निघून जाणे, इतकंच या देहापुरतं कर्तव्य व कर्म आहे अशी धारणा होते वा असते, त्यांना जन्माचा खरा उद्देश समजत नाही, किंवा ज्ञातच नसतो.
अश्या अनेक जडजीवांसाठी, ईश्वराने आपल्या स्वतःकडे खूप मोठी जबाबदारी घेतली आहे. ही जबाबदारी स्वतःहून घेऊन, तसं वचन वा ब्रीद ईश्वराने वेळोवेळी बोलून वा कृतीतून दाखवून दिलं आहे. कार्यालयीन कामातसुद्धा अनेकदा असं होतं की आपण एखादं काम आपली जबाबदारी आहे असं समजून, ते करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो.
अर्थातच हे जाणून वरिष्ठ अनेकदा सांगतात जिथे अडशील, जे समजणार नाही, जे माहीत नसेल, त्यासाठी मी आहे, मला विचार. पण त्यासाठी आपण जाण आणि ज्ञान यांचा योग्य समतोल राखला पाहिजे आणि आपल्या कक्षेबाहेर आहे ते वरिष्ठांवर सुपूर्द करणं, गरजेचं आहे. अध्यात्मिक व व्यावहारिक अश्या जीवनातील कोणत्याही पातळीवर व कोणत्याही काळात, या जगाचा मालक, कर्ता धर्ता सर्वकाही ईश्वर असल्याचे आपण लक्षात घेत नाही.
तिथेच खरी समस्या सुरू होते. त्यावर आणि अर्पण भावावर उद्याच्या भागात विचार करूया. तोपर्यंत नामाने जे साध्य होईल, त्याकरता नामाचा घोष करतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment