ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ ३
श्रीगणेशाय नमः !!
श्रीज्ञानेश्वर माऊली नमोनमः !!
श्रीसद्गुरुमाऊली नमोस्तुते !!
सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ २.१८ ॥
हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।
हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २.२८ ॥
श्रीमद्भागवद्गीतेतील, ज्या मूळ ओवीवरून माऊलींनी वरील ओवी घेतली आहे ती खालीलप्रमाणे
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥२.३॥
श्रीकृष्ण परमात्मा पुरुषोत्तम समस्त जगताचे निर्माते, प्रत्येक प्राणीमात्र हा त्यांचाच जणू पुत्र. अश्या स्थितीत त्यांनी शेवटपर्यंत हे महाभारत युद्ध होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. अगदी पाच गावं घेऊन, पांडवांना शांती प्रस्ताव आपण मान्य करायला लावू, हे वचन, त्यांनी हस्तिनापूरच्या राज्यसभेत, शेवटचा प्रयत्न म्हणून, देऊन पाहिलं. यामागे खरंतर दोन कारणं होती.
एक म्हणजे आपण जे करू त्यावर पांडवांचा पूर्ण विश्वास आहे याची श्रीकृष्णांना खात्री होती आणि आपल्यावर त्यांची प्राणापलीकडे श्रद्धा आहे हे भगवंतांना ज्ञात होतं. दुसरं पांडवांचा पराक्रम यदुनाथ जाणून होते. त्यामुळे पाच गावातून संपूर्ण साम्राज्य ते पुन्हा मिळवतीलच हा सार्थ विश्वास योगेश्वरांना होताच. म्हणून शिष्टाईचा शेवटचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला. इथे वास्तविक पणे एक प्रतिनिधी म्हणून देवकीनंदन, भर राज्यसभेत गेले होते. प्रतिनिधींचे हक्क व जबाबदारी, ते यथोचित जाणून होते. अशीच अयशस्वी शिष्टाई, युद्ध सुरू होण्याआधी, अंगदाने रावणाच्या सभेत जाऊन केली होती.
अश्या परिस्थितीत युद्धाचा अंतिम पर्याय हातात उरला. श्रीकृष्ण आतापर्यंत पांडवांवर झालेल्या प्रत्येक अन्यायाला जाणून होते. त्या प्रत्येक क्षणाची आठवण हृदयात ठेवूनच, त्यांनी शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केली. परंतु नवव्या दिवसाच्या युद्धात, ती प्रतिज्ञा सुदधा मोडण्याची तयारी ईश्वराने केली आणि सुदर्शनचक्र हाती धरून, भीष्माचार्यांवर चाल करून जाण्याची हिंमत यादवनरेश करू शकले. याचं महत्वाचं आणि एकमेव कारण, म्हणजे युद्धात फक्त आणि फक्त विजय हे एकच लक्ष असलं पाहिजे.
त्यातही जर, आपली बाजू सत्याची असेल तर, त्यासाठी कोणत्याही प्रकारे जिंकून, असत्याला मातीत मिळवणं हे एकमेव ध्येय योध्याचं असलंच पाहिजे, हे श्रीगोपालांनी सोदाहरण सांगूनही, तद्नंतर झालेल्या भारतीय अर्वाचीन प्राचीन वा गेल्या पाच हजार वर्षातील अनेक युद्धात भारतीय राजे महाराजे योद्धे यांनी या तत्वाचा विचारच कधी केला नाही.
युद्धभूमीवर साक्षात श्रीमहाविष्णू जर आपलं वचन तोडण्यासाठी क्षणमात्र विचार करत नाहीत, तर तत्वांची जपणूक किती, कशी आणि का करायची, यावर काहीही गंभीर विचार कोणत्याही राजाने वा योध्याने तर केला नाहीच, पण खेदाने म्हणावसं वाटतं की, एकाही तत्ववेत्त्याने याबद्दलचं विश्लेषण केल्याचं वाचनात आलेलं नाही.
माझ्या मते ज्याला आज professional attitude अशी संज्ञा दिली जाते, त्याच याच्या इतकं जिवंत उदाहरण, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखान वधात आणि आग्र्याहून सुटका या दोन प्रसंगात दाखवून दिलं आहे. किंबहुना महाराजांचं संपूर्ण आयुष्य हे याच व्यावसायिक वृत्तीचं जिवंत उदाहरण आहे.
अश्या व्यावसायिक वृत्तीचे भगवंत, ऐन युद्धाच्या मुखापाशीच, अर्थात सुरवात व्हायच्याही आधी, अर्जुन असा मुखभंग करून, शस्त्र खाली ठेवून, विषादवश, युद्ध सोडण्याबद्दल कथन करणं पाहून, नक्कीच क्रोधीत व्हायला हवे होते. पण त्या देहधारी जीवनातसुद्धा, जन्मापासूनच अशाश्वततेच्या तारेवर आयुष्य जगलेल्या श्रीयोगेश्वरांना, कोणतीही शक्यता अशक्य वाटत नव्हती.
म्हणूनच आपलं डोकं शांत ठेवून, उद्बोधनाच्या मार्गावर अर्जुनाला नेण्याआधी, त्याच्या विषादाची पार्श्वभूमी, कारणमीमांसा, त्याची यामागील भूमिका, पूर्ण समजावून घेतल्यानंतर, श्रीद्वारकानरेश, त्याला तितक्याच ठामपणे पण क्रोध व हताशपणा कुठेही मनातसुद्धा येऊ न देता, समजावून सांगण्यास आरंभ करतात आणि दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग विवेचित करताना जे भाष्य करतात, त्याची प्राकृत भाषेत मांडणी करताना. माऊली खूपच सोप्या शब्दात कृष्णकथन आपल्यापुढे उलगडून दाखवतात. आता त्या भावार्थाकडे वळूया, पुढील भागात.
क्रमशः
श्रीरामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी !!
श्रीज्ञानेश्वर महाराज की जय! श्रीतुकाराम महाराज की जय !!
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय !!
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२६/११/२०२१
Comments
Post a Comment