भोग आणि ईश्वर निमित्ताने आलेला कृपायोग अनुभव !
धन्यवाद, सर्वांचे आभार,
मुलीच्या लग्नाच्या भावभावनेतून बाहेर येण्याची ऊर्जा महाराज देतील, पण जे मुलीचे वडील आहेत, ते या भावना समजून घेऊ शकतील. लग्नसोहळा उत्तमरीत्या पार पडला, सर्व उपस्थित आनंदी आणि समाधानी झाले हा विशेष उपहार मिळाला. कदाचित काही जणांना अनावधानाने आमंत्रण राहिलं असेल, तर त्याबद्दल मी।क्षमा प्रार्थी आहे. मुलीला सासर उत्तम मिळालं, ही महाराजांची अद्भुत कृपा. मी गमतीने तिला महाराजांची नात म्हणतो. पण त्याप्रमाणे महाराजांनी कृपाछत्र तिच्यावर धरलं. ही प्रेरणा आणि हे चैतन्य महाराजांची कृपा आहे.
थोडं भोग आणि ईश्वरबद्दल
भोग आणि ईश्वरचं १ डिसेंबर, २०२१ रोजी सुरू केलेलं चिंतन आज सलग ३५८ दिवस लिहीत आहे. लवकरच ३० नोव्हेंबरला ही लेखमाला ३६५ दिवस पूर्ण करेल. यामध्ये सर्वात आश्चर्याची वा चमत्काराची गोष्ट म्हणजे लग्नाच्या या तयारीत आणि विशेष करून १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या ५ दिवसातसुद्धा भाग ३५१ ते ३५५ हे भाग, सर्व गडबडीतसुद्धा, लिहू शकलो, ही शक्ती महाराजांनीच दिली. हे पाचही भाग बहुतेक करून रात्री १२ नंतर लिहू शकलो. पण विशेष करून मला आठवतंय की, ग्रहमख व मेंदीच्या दिवशीचा भाग रात्री २ वाजता लिहून मगच झोपण्याची प्रेरणा महाराजांनी दिली. त्याचप्रमाणे घरात राहायला आलेल्या सर्व आप्तेष्ट व स्नेही यांचा कोणताही विरस होणार नाही याचीसुद्धा काळजी महाराजांनी घेतली. म्हणूनच या पाच दिवसातील भाग, झोपण्यापूर्वी लिहिता आले आणि कोणालाही कसलीही तसदी द्यावी लागली नाही.
मला लग्नाची तारीख निश्चित झाल्यापासून, या ५ ,६ दिवसांची चिंता होती. पण महाराजांनी दिलेली ऊर्जा आणि भोग आणि ईश्वर या चिंतनाचं अखंड लेखन व्हावं या माझ्या इच्छाशक्तीला माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सर्व शक्ती, ऊर्जा व चैतन्य विशेषकरून या ५ दिवसात दिलं आणि माझ्या इच्छेला शक्ती देऊन सांभाळून घेतलं, हा नक्कीच एक भाग्ययोग आहे.
त्यांची अशीच प्रेरणा व कृपा राहो, त्याचप्रमाणे वाचकांचं प्रेम असंच निरंतर पाठीशी आणि आशीर्वाद मस्तकी राहो हीच महाराज चरणी प्रार्थना.
जय श्रीराम 🙏🙏🕉️🕉️
©® भोग आणि ईश्वर लेखक : प्रसन्न आठवले.
Comments
Post a Comment