भोग आणि ईश्वर २७७
कर्म आणि कर्माच्या सिद्धांताची खरी प्रचिती तेंव्हाच येते, ज्यावेळी आपण न केलेल्या कर्माचं फलित फलरूपात समोर येतं, त्यावेळी आपण खरे अंतर्मुख व्हायला हवं. पण तसं होत नाही. मुळात नियंत्याला त्याच वेळी आपल्याकडून योग्य प्रतिक्रियेची अपेक्षा असते आणि त्याचवेळी अज्ञान, मोह, माया यांच्या एकत्रित प्रभावाने आपण अयोग्य प्रतिक्रिया देतो आणि चूक करून ठेवतो.
वास्तविक अश्या वेळी आपण अंतर्मुख होऊन, चिंतन सुरू केलं पाहिजे. मुळात अंतर्मुख शब्दात बराच अर्थ दडलेला आहे. अंतर्मुख होणं म्हणजे मुख हे आत घेऊन बघणं. पण हे प्रत्यक्षात अशक्य आहे. मग याचा खरा व अपेक्षित अर्थ काय असेल. तर मनाचं, बुद्धीचं मुख आत नेऊन, आत पाहणं. आत म्हणजे कुठे, तर आपल्या अंतरात्म्यात डोकावून, त्याचं उत्तर शोधण्यासाठी चिंतन करणं.
पण म्हणजे नक्की काय करणं अपेक्षित आहे. तर ज्यावेळी अशी परिस्थिती येईल की, आपण न केलेल्या कर्माचं नफा नुकसान या दोन्ही स्वरूपातील फलित समोर आल्यावर, त्याचा गहन अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावा. हे का घडलं, जर या जन्मीचं काही कर्म नसेल तर मागील जन्मातील काही कर्म असावं का, याचा विचार करावा.
कारण विधात्याची व्यवस्था अर्थात सिस्टिम सेकंदाच्या फरकाने सुद्धा चुकत नाही, हे निर्विवाद आहे. ज्यावेळी ज्या कर्माचं फलित येणं अपेक्षित आहे, त्यावेळी ते येणार प्रश्न असतो तो आपण त्याला कसं स्वीकारतो. इथे एक उदाहरण देतो. एक शास्त्रज्ञ जवळजवळ अठरा वर्ष एका गोष्टीवर संशोधन करत होता. त्या अठरा वर्षात त्याचं संसाराकडे, बायकोकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. याचा त्याच्या पत्नीच्या मनात खूप राग होता. अठरा वर्षांनी, एके दिवशी, त्याचं संशोधन पूर्ण झालं
तो रोजचा प्रयोग व निष्कर्ष रोज लिहून ठेवत असे. त्या अठरा वर्षातील संशोधनाचं हस्तलिखित, संशोधनाअंती, पूर्ण करून, तो पाय मोकळे करायला बाहेर पडला आणि विचार केला आल्यावर, हे हस्तलिखित चांगल्या अक्षरात लिहून आपला शोध जगापुढे मांडू. पण इकडे प्रारब्धात वेगळंच होतं. त्या अठरा वर्षातील रागाचा एकत्रित परिणाम होऊन, त्याच्या पत्नीने ते हस्तलिखित, तो शास्त्रज्ञ यायच्या आत जाळून टाकलं.
काही वेळात तो संशोधक परत आला. तेंव्हा घरासमोर काहीतरी जाळून राख झालेलं त्याने पाहिलं. त्याने सहज पत्नीला विचारलं की काय जाळलंस. पत्नीने रागातच उत्तर दिलं की तुमच्या संशोधनाचं हस्तलिखित जाळून टाकलं. त्या शास्त्रज्ञाने शांतपणे पत्नीकडे पाहिलं आणि आपल्या प्रयोगशाळेत जाता जाता एकच वाक्य म्हणाला की, अरे अरे म्हणजे आता माझं संशोधन अजून काही वर्षे पुढे गेलं, कदाचित अजून अठरा, चला कामाला लागूया.
इथे प्रतिक्रियेची मर्यादा, मनाचं संतुलन, विचारांची प्रगल्भता, घडलेलं स्वीकारायची मनाची तयारी,आत्म संयम, विवेक यांचं अभूतपूर्व आणि दुर्लभ दर्शन घडतं. अश्या आत्मसंयमी, विवेकी माणसांना क्रिया प्रतिक्रिया यांनी येणारी बद्धता आणि ती टाळण्यासाठी घ्यायची काळजी,याचं ज्ञान व जाणीव झालेली असते. अश्या प्रकारच्या आत्मसंयमी व विवेकी विचार आणि कृती यासाठी काय आवश्यक आहे यावर पुढील भागात विचार करूया. तोपर्यंत आपलं नित्याचं नामसाधन सुरू ठेवा, तो आत्मोन्नतीचा खरा मार्ग आहे.
भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख आहेत.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment