भोग आणि ईश्वर २८९
आपण एकग्रतेच्या मार्गावरील तीन पायऱ्या पाहिल्या. त्यांचा अभ्यास तसा, म्हटलं तर सोप्पा आणि म्हटलं तर कठीण आहे. सोप्पा किंवा कठीण या व्यक्तिपरत्वे बदलणाऱ्या संज्ञा आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ते सहजसाध्य होईल, तर एखादी व्यक्ती हे खूप कठीण आहे म्हणेल. कदाचित काहीजण हा प्रयत्न करून सोडूनसुद्धा देतील.
हे पुन्हा मनावर अवलंबून आहे. हे कसं. तर हे मनाच्या लवचिकतेवर वा कठोरतेवर किंवा काठीण्यावर अवलंबून आहे. म्हणजे काहींचं मन हे लवचिक अर्थात कोणत्याही गोष्टीला सहज स्वीकारून पुढे जात असतं. अर्थात प्रवाही मन ज्याला म्हणूया. कारण आपण पाहिलं असेल तर प्रवाही जल हे जास्त स्वच्छ असतं. याचं मुख्य कारण म्हणजे ते प्राप्त भौगोलिक परिस्थितीला स्वीकारत पुढे जातं. त्याचा मुख्य उद्देश पुढे जाणं हा असतो.
काही मनं ही कठोर किंवा कठीण असतात. बदल किंवा नवीन गोष्ट स्वीकारणं त्यांना कठीण जातं. साधारण साठलेल्या जला सारखं. प्रवाही नसल्यामुळे अश्या जलाशयाला शेवाळं आणि इतर अस्वच्छता लवकर ग्रासते. म्हणजे कठीण किंवा कठोर मनाची माणसं, कोणतेही बदल सहजासहजी स्वीकारत नाहीत. जीवनात दोन प्रकारचे बदल येत असतात किंवा सतत बदलत असतं तेच जीवन. यातील काही बदल अपरिहार्य म्हणजे नैसर्गिक आणि काळानुसार आलेले असतात. त्या बदलांना तुम्ही स्वीकारा अगर न स्वीकारा ते बदल होत जातात.
म्हणूनच एकाग्रतेच्या या अभ्यासात, लवचिक मन असलेल्या व्यक्ती सहज नाही, पण पुरेश्या अभ्यासाने नक्कीच एकाग्रतेच्या या तिसऱ्या टप्प्यापर्यंत येऊ शकतात. कारण त्यांच्या मनाची तयारी हीच खूप मोठी पायाभरणी आहे, या अभ्यासासाठी. त्यामुळे, त्यांना किती जलद जमेल हा मुद्दा महत्वाचा नाहीच. तर त्यांना जमू शकेल हा गुणविशेष, त्यांच्या मनाच्या लवचिकतेमुळे मनातील सकारात्मक शक्तिकेंद्रांना सहज व लवकर उद्दीपित करून, कार्यार्थ प्रवृत्त करेल.
म्हणजेच आपला, मनाच्या शक्तिकेंद्रांचा अभ्यास वा ज्ञान इथे नक्कीच उपयोगी पडू शकतं. विशेषतः कठीण मन असलेल्यांना या अभ्यासपूर्वी सकारात्मक शक्तिकेंद्रे आणि नकारात्मक शक्तिकेंद्रे,ही पूर्वपीठिका माहीत असेल, तर मनाचं काठिण्य कमी होण्यास मदत होईल. याचसाठी आधी शकिकेंद्रांची माहिती घेऊन, त्यानंतर आपण या अभ्यासाकडे आलो. म्हणून आपल्या मनातील सकारात्मक शक्तिकेंद्र कार्यान्वित करण्यासाठी व कार्यात असलेली सकारात्मक शक्तिकेंद्रे कार्यक्षम करण्यासाठी, आधी आपण शांत बसून, मनाची चंचलता, चलबिचल चळवळ, अनिष्ट विचार इत्यादी शांत करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर श्वासांवर मन एकाग्र करून, त्यांना नैसर्गिक वेगापर्यंत घेऊन आलो.
आता आपण एखाद्या बिंदूवर वा लक्षावर एकाग्र होण्याचा प्रयत्न करत आहोत. हे थोडं कठीण भासेल. पण मन शांत करून, श्वास अत्यंत धीम्या गतीने येऊ लागल्यावर, जर आजू बाजूला शांतता असेल, तर आपल्या श्वासांचा वा हृदयाच्या ठोक्यांचा आवाज किंवा जाणीव मनाला येईल. मागे मी सांगितल्याप्रमाणे, मनाला जाणिवांच्या इंद्रियांनी, ज्याला मनाची ज्ञानेंद्रिय म्हणूया, त्यांनी ऐकू येणं, दिसणं, बोलणं हे सर्व जमू शकतं, नव्हे जमतं.
तर श्वासांवर पूर्ण नियंत्रण आणि मन शांत करण्याच्या स्थितीत येऊन, आपण लक्षाकडे पाहण्याचा अभ्यास करू शकतो. पण हा अभ्यास करताना डोळ्यांना त्रास होणार नाही, इतक्याच काळापर्यंत हा अभ्यास करून, डोळ्यांना आराम देऊन पुन्हा हा अभ्यास सुरू करावा. असा एकाग्रतेचा अभ्यास, आपण वेळ मिळेल तसा आणि वेळ मिळेल तिथे करू शकता. यात अजून एक पायरी पुढे जाऊया.
डोळे उघडे ठेवून लक्षावर एकाग्र होण्याचा अभ्यास करणं जमायला लागलं की, आपण डोळे मिटून एखाद्या नादावर आवाजावर किंवा ओंकार वा अन्य काही जप वा धून लावून, त्यावर पूर्ण एकाग्र होण्याचा अभ्यास करावा. यासाठी विशिष्ट मिनिटांचे नाद, धून, स्वर, वाद्यतरंग उपलब्ध असतात. त्याचा लाभ घेऊ शकता. किंवा ओंकारासारखा एखादा जप किंवा नाद आपण स्वतः मनात किंवा मध्यमेत म्हणून त्यावर एकाग्र होऊ शकता. ज्यांना लक्षावर एकाग्र होणं जमणार किंवा जमत नसेल, त्यांनी हा डोळे मिटून एखाद्या नादावर एकाग्र होण्याचा अभ्यास करायला हरकत नाही.
उद्या आपण चर्चा पुढे नेऊ. पण आपल्या नामाची साथ न सोडता वरील अभ्यास आपल्याला करायचा आहे.
प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०)२५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख आहेत.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment