भोग आणि ईश्वर २३९
वास्तविक नामावर म्हणजेच नामाच्या महतीवर, गुणांवर बोलणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराबद्दल बोलण्यासारखच आहे. आता संगणकयुगात, आपल्याला, सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅम्स माहीत आहेत किंवा संगणकातील मोठ्या फाईल्स, छोट्या करून, अर्थात झिप करून, ई-मेल मधून किंवा पेनड्राईव्ह मधून पाठवणं, माहिती असेल. एखादी मोठी फाईल, फोल्डर किंवा एखादा प्रोग्रॅम वा सॉफ्टवेअर झिप करून पाठवलं जातं.
नन्तर ते ज्या संगणकात कार्यरत करायचं असेल, त्या संगणकात, तो प्रोग्रॅम अथवा ती फाईल सेव्ह करून, नन्तर ती अनझीप करून, मग त्यातील माहिती, प्रोग्रॅम वा फाईल्स, त्या संगणकात योग्य त्या ठिकाणी सेव्ह करून, सॉफ्टवेअर सुरू केलं जातं किंवा फाईलमध्ये काम सुरू केलं जातं. म्हणजेच ती झिप केलेली फाईल, त्या मुख्य विशाल प्रोग्रॅम वा फाईलचंच, सूक्ष्म रूप असतं.
म्हणजे त्या सूक्ष्म फाईलमध्ये, त्या विशाल फाईलचे सर्व गुणधर्म व कार्यक्रम आणि कार्यक्षमता असतेच असते. मात्र ती सूक्ष्म फाईल, आहे त्या सूक्ष्म स्वरूपात, आपण कार्यार्थ वापरू शकत नाही. पण ती अर्थहीन नसते, तर त्यातील गुण, कार्यक्रम व कार्यक्षमता ही सूक्ष्म करून, योग्य त्या प्रोग्रॅमने अनझीप अर्थात पूर्ण विशाल स्वरूपात उघडून, ततपश्चात ती आपलं कार्य करायला सिद्ध होते.
अगदी हेच तत्व नामामध्ये आहे. भगवंताचं विशालत्व, शक्ती, कार्य, या सूक्ष्म नामाच्या झिप फाईलमध्ये बंद असते. नामस्मरण हा त्या सूक्ष्म फाईलला विशाल फाईल मध्ये परिवर्तित अर्थात अनझीप करण्यासाठीचा तयार करण्यात आलेला, प्रोग्रॅम आहे. नामस्मरणाने त्या सूक्ष्म नामातील शक्तीचा प्रभाव उघडून, त्या नामामागील शक्तीच्या मुख्य प्रोग्रामला कार्यरत करतं.
आता एखादी सूक्ष्म फाईल वा प्रोग्रॅम उघडून देणारा अनझीप हा सुद्धा एक, खास तयार करण्यात आलेला प्रोग्रॅम आहे. म्हणजे विशाल फाईल सूक्ष्म फाईलमध्ये परिवर्तित, अर्थात झिप, करण्यासाठी एक प्रोग्रॅम आणि नन्तर योग्य त्या संगणकात तो उतरवून, पुन्हा अनझीप करण्यासाठी दुसरा प्रोग्रॅम. असे दोन प्रोग्रॅम तयार करण्यात येतात. आपण इतक्या सहजपणे हे करतो की, त्यामागील हे दोन प्रोग्रॅम्स लक्षातच येत नाहीत.
म्हणजेच भगवंताचं विशालकाय, विराट रूप, सर्व ठिकाणी घेऊन फिरणं, प्रत्यक्षात अडचणीचं आहे आणि ते सामान्य माणसाला अशक्य आहे. मग या अडचणींवर मात करण्यासाठी, स्वतः उत्तम प्रोग्रामर, डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनीअर अर्थात सर्वतज्ञ असलेल्या ईश्वराने, आपलं विशालतत्व , त्यातील, पावित्र्य, मंगलता, गुणधर्म, कार्यक्षमता, शक्तीतत्व, या सर्वांना लघु वा सूक्ष्म रुपात परिवर्तित करून, ती झिप केलेली फाईल, नामरूपात, त्याकाळातील संगणक तज्ञ ऋषीमुनी, वेदशास्त्र संपन्न, मुमुक्षु, ज्ञानी यांच्याकडे सुपूर्द केली.
ती फाईल उघडून आपल्या गुणधर्माचा लाभ कसा घ्यावा, अर्थात त्या झिप फाईलला म्हणजेच सूक्ष्म रूपातील नामरूप भगवंताला, प्राप्त करण्याचा, अनझीप करायचा प्रोग्रॅमदेखील सांगितला. तो प्रोग्रॅम योगयाग, चित्तवृत्ती निरोध, कर्मकांड, तपसाधना, यज्ञयाग इत्यादींसह तज्ञाच्या सुपूर्द करून, आपण निश्चिन्त झाले.
पण यातील अनेक गोष्टी फक्त तज्ञ मंडळींनाच येऊ शकत असल्यामुळे, या प्रोग्रॅमचा उपयोग सामान्य कसा करणार हे लक्षात येऊन वा आणून दिल्यानंतर भगवंतांनी काय केलं. तर जशी संगणक क्रांती होऊन, सर्वसामान्यांना तो सहजी वापरता येईल, असे तंत्र विकसित करण्यात आले. हे संगणकक्रांतीचं तंत्र अनेकानेक लक्ष्य वर्षांपूर्वीच भगवंतांनी विकसित करून वापरलं आहे.
त्या संगणकक्रांतीप्रमाणे, अत्यंत सूक्ष्म फाईल तयार करून, ती सुक्ष्मातील सूक्ष्म फाईल, सामान्यांच्या हाती देत, ती फाईल अनझीप करण्याचा सर्वात सोप्पा प्रोग्रॅम वा तंत्र सांगून, सर्व गुह्यच उघड केलं. ते गुह्य वा तो प्रोग्रॅम ज्यायोगे विशाळतम ईश्वराला अनझीप करून, प्राप्त करण्याचा प्रोग्रॅम म्हणजेच नामस्मरण.
सातत्यपूर्ण, अधिकाधिक तीव्रतेने, अंतरात शिरून, अंतर्मुख होऊन, बाहेरील सर्व आघात, घात, दुःख, दैन्य, भावभावना यांचे अडथळे बाजूस सारून, एकाग्रतेने, शुद्ध व सात्विक भावाने घेतलेल्या नामस्मरणाने त्या विशालरूप ईश्वराची दयारुप, माऊलीरुप फाईल उघडण्यास व त्याच्या कृपेचा प्रसादरूप प्रोग्रॅम हाती येण्यास सुरवात होते.
आता सतत, संतत, एकधारेने, एकावृत्तीने एकाग्रतेने अंतर्मुखतेने नाम का घ्यायचं, यामागचं शास्त्रीय वा वैज्ञानिक कारण व विवेचन, आपण उद्या अभ्यासू. तोपर्यंत या सूक्ष्म नाम रूपात दडलेल्या विशालरूप ईश्वराची फाईल अनझीप करण्याची अर्थात उघडण्याची प्रक्रिया म्हणजेच नामस्मरण सुरूच ठेवा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment