भोग आणि ईश्वर २३१
आज चातुर्मासाच्या पूर्वसंध्येला खरतर अनेक व्रत वैकल्य यावर लिहून मांडता येईल. पण एकतर त्याबद्दल खूप विस्ताराने अनेकांनी लिहिलंय आणि त्याबद्दल परत लिहायची गरज आहे, असं मला वाटत नाही. त्याऐवजी आपण त्याच्या तत्वाबद्दल बोलूया. आपण चार महिनेच का करायचं किंवा हे करून काय साध्य होईल किंवा होणार आहे, याचा जरा विस्ताराने विचार करूया.
मुळात मनाचा ओढा, मनाची आस, आसक्ती, बुद्धी, वैचारिक बैठक, यावर सर्वकाही अवलंबून आहे. भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही मार्गांवर मन, बुद्धी यांच्यावरच कर्म आणि त्या कर्माची गति म्हणजेच पुढचा सर्व फेरा, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू , ही सर्व साखळी अवलंबून आहे.
म्हणजे मन व बुद्धी या देहामुळे प्राप्त दोन निर्गुण गोष्टी सगुणरूप देहासाठी व त्यायोगे आत्मसिद्धीसाठी किती महत्वाच्या आहेत, याचा विचार करा.
म्हणजेच जर देहाला कार्याला लावायचं असेल तर, प्रथम मन व बुद्धी या दोन अश्वांना नियंत्रित करणं किंवा त्यांना काही सवयीत बांधणं हे गरजेचं आहे. त्यामुळे देहाच्या सवयी दुरुस्त होऊन, कर्म सुधारायला मदत होईल. मनाला नियंत्रित करण्यासाठी काही नियम निती यांच्या बांधनांची गरज असते. किंवा नीती नियम या दोन आधारांवर मनाला काही सवयी लावता येतात.
या सवयींचा उपयोग मनाला, बुद्धीला व देहाला आत्म संयममार्गे आत्मविश्वासाकडे घेऊन जाण्यासाठी होतो. स्थिर मन, स्थिर बुद्धी बऱ्याच दुर्लभ गोष्टी साध्य करू शकतात. प्रत्येकाला जन्मतः मनाची व बुद्धीची मिळतेच असं नाही. पण अनेक क्षेत्रात लागणारी स्थिर बुद्धी व मन हे वैचारिकता, विवेक या दोन गोष्टीतून योग्य मार्ग प्राप्त करून देतात.
आता मनाच्या मूळ सवयी, स्वभाव, बुद्धीची चंचलता यांना मुरड घालून, त्यांना सदप्रवृत्तिकडे व चांगल्या मार्गाकडे वळवायला काही पथ्य किंवा मार्ग उपलब्ध आहेत. ते मार्ग आता मानसशास्त्रानेसुदधा शोधून आपल्यापुढे मांडले आहेत. पण या भूमीतील शास्त्रज्ञानी अर्थात ऋषीमुनी यांनी हजारो लाखो वर्षांपूर्वी व्रत वैकल्याचं नाव देऊन, आपल्यापुढे, ते उपाय, केंव्हाच मांडून ठेवले आहेत.
आता मानसशास्त्राचा सर्वात मोठा नियम असं सांगतो की कोणतीही गोष्ट आत्मसात करता यावी, किंवा एखाद्या गोष्टीची सवय व्हावी किंवा एखादी जुनी चुकीची सवय मोडायची असेल तर त्यासाठी सलग नव्वद दिवस जर एखादी गोष्ट सातत्याने केली तर, त्यागोष्टीची बुद्धीला मनाला व देहाला सवय होते आणि ती नवीन सवय आत्मसात होते. आत्मसात होणे म्हणजे आत्म्यापर्यंत ती सवय पोचते किंवा देह मन व बुद्धी या तिन्हींची, त्या नवीन गोष्टीसाठी, एकतानता त्या नवीन रितीला, सवईला सुप्त मनापर्यंत पोचवते.
या सर्वांसाठी लागणारा कमीतकमी नव्वद दिवसांच्या काळापेक्षा एक महिनाभर जास्त म्हणजेच एकशेवीस दिवस जर एखादी गोष्ट, व्रत म्हणून वैकल्य म्हणून करत गेल्यास, त्याची सवय सुप्तमनातून आत्म्यापर्यंत नक्कीच पोचेल. आता या सर्व पार्श्वभूमीवर ठरवून, ठराविक वेळी, नित्य नामाची सवय जडवून घ्यायला आणि चार मासात ती सवय आत्मसात करायला किती सोप्प जाईल, याचा तुम्हीच विचार करा आणि त्याप्रमाणे काय व्रत करायचं ते ठरवा. पण जे ठरवाल ते नेटाने, इमानाने आणि नीतीने पाळून आत्मसात करा.
नाम घेत रहा, नेटाने घ्या, सवयीने घ्या पण घ्या, योग्य तेच होईल. उद्या बघूया काय विचार येतात, ते मांडीन.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. शनिवरपर्यंत भोग आणि ईश्वर भाग २ च्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल निश्चित माहिती पोस्ट केली जाईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment