भोग आणि ईश्वर २४३
खरतर आपण ज्या गोष्टी करतो त्या प्रत्येकात अपेक्षा ठेवून करतो. ती अपेक्षा किंवा त्या कर्मात किंवा कर्माच्या फलात गुंतलेलं मन हा त्या कर्मामागील भाव आहे. ज्या प्रमाणे भाव असेल त्याप्रमाणे त्या त्या कर्माचं फल प्रत्येकाला प्राप्त होतं. म्हणजेच कर्मफल भावात्मक आहे.
जिथे जशी जितकी भावाची गुंतवणूक तितका व तसा कर्मफलाचा हिस्सा योग्यवेळी प्रत्येकाला मिळतो. असे भावबंध कर्मात असतात, त्यानुसार फलप्राप्ती, हे व्यावहारिक पातळीवर सत्य आहे. पण अध्यात्मिक पातळीवर याचा उलट संबंध आहे. म्हणजेच भाव ठेवून साधना भक्ती वा नामस्मरण करत गेल्यास, मिळणारा लाभ हा क्षीण क्षीण होत जातो.
याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे व्यवहारात अपेक्षे प्रमाणे तरंगलहरी निर्माण होऊन, त्या कर्मफलाला तुमच्या पर्यंत पोचवायला मदत करतात. याचं एक सहज सोप्प तार्किक कारण म्हणजे भौतिक जगताचा मुख्य संबंध हा, पंचमहाभूतरुप तत्वांशी असल्यामुळे, त्यांना सर्व सर्व भौतिक नियम व गणितं लागू होतात आणि कार्य त्याप्रमाणे घडत जातं.
पण अध्यात्मिक बाबतीत मुळातच संबंध, अश्या ईश्वरी चैतन्य शक्तींशी आहे, की ज्या, पंचमहाभूतरुप तत्त्वांच्या पार आहेत, त्यामुळे भौतिक पातळीवरील जे नियम वा प्रमेय आहेत ती, इथे लागू होत नाहीत. त्यामुळे इथे भाव ठेवून भक्ती वा साधना केली की, त्याचा उलट परिणाम भक्ती वा साधनेवर होतो. साधकाची प्रगती होत नाहीच उलट अधोगतीची वेळ येते.
याचं कारण म्हणजे अपेक्षेने केलेली भक्ती ही अशुद्ध चित्ताने केलेली भक्ती समजली जाते. अश्या अशुद्ध चित्ताने भगवंत अप्राप्त आहे. तो शुद्ध सात्विक आणि त्रिगुण रहित असल्याने, शुद्ध लहरीच त्या ईश्वर शक्तीप्रत पोचू शकतात. शुद्ध चित्त, हे फक्त आणि फक्त या जगता तील सर्व भाव सोडून, एकच भक्तिभाव दृढ धरून साधना केल्यास, साध्य होतं.
असा शुद्ध भाव वा चित्ताची शुद्धता साधण्यासाठी मन व बुद्धी ही निर्मळ असणं गरजेचं आहे. म्हणूनच ईश्वरभक्ती वा साधना करणाऱ्या व्यक्तीने मायेच्या प्रभावाकडे नेणारे, विषय वासना, द्वेष, मद मत्सर, राग,लोभ हे सर्व विकार सोडून साधन केले पाहिजे. अन्यथा केलेलं सर्व साधन आपल्या इच्छित परिणामकडे जीवाला नेऊ शकत नाही.
म्हणूनच सर्व भेद, राग आदी मनाचे सर्व व्यापार सोडून, साधना करा. तेच सद्गुरूंना व ईश्वराला अपेक्षित आहे. यासाठी सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे समर्पण, गुरू चरणी स्थिर मन आणि गुरूआज्ञेचं तंतोतंत पालन. यात एक फायदा असा आहे की, आपण सद्गुरू चरणी मन स्थिर आणि सद्गुरु आज्ञा पालन केलं की, सर्व भार हा सद्गुरूंवर जातो आणि या एकाच गोष्टीने, मनाला आपोआप शांतता व संयम याची प्राप्ती होते आणि चित्तशुद्धी साध्य होते.
भावरहीत याचा दुसरा अर्थ, सर्व भाव व मनाच्या सर्व अवस्था त्यागून, एकाच चरणी स्थिर करणं. म्हणजे भावाचा अभाव किंवा निरपेक्षता साधणं. म्हटलं तर अद्भुत आणि म्हटलं तर असाध्य असं हे परम गुह्य तत्व, भावरहीत होऊन, मनाला शुद्धता, शांतता लाभून, साधना योग्य मार्गाने जायला मदत करतं. म्हणून शुद्ध भावाने नाम घ्या, ते सर्व योग साधून देईल. उद्या पुन्हा भेटूच.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment