भोग आणि ईश्वर २२७
जिथे मन व बुद्धी यांसह देह गुंतवल्यानंतर आत्म्याला बळ व संयम प्राप्त होतो आणि आत्मा निश्चिन्त होतो, त्या स्थितीला निष्ठा म्हणतात. जिथे एकवार लक्ष केंद्रित केल्यानंतर दुसरीकडे लक्ष द्यायची इच्छा आणि गरज उरत नाही, तेंव्हा आपली त्या स्थानी निष्ठा बसली असं समजावं.
याव्यतिरिक्त कोणतीही स्थिती असेल, म्हणजे अंशात्मक जरी साशंकता असेल, तरी त्या स्थितीला निष्ठा म्हणता येणार नाही. म्हणजेच निष्ठा आपल्यासोबत श्रद्धा व विश्वास घेऊनच येते. एखाद्यावर जेंव्हा आपली निष्ठा असते, तेंव्हा त्या व्यक्ती वा देवतेच्या मर्जीप्राप्तीसाठी प्रसंगी काहीही करण्याची तयारी असते.
मावळ्यांची छत्रपतींवर असलेली स्वामिनिष्ठा व देश सेवकांची स्वातंत्र्यप्राप्तीकरता असलेली राष्ट्रनिष्ठा ही त्यापैकीच निष्ठेची उदाहरणं आहेत. आपल्या साधनेवर अशीच जेंव्हा निष्ठा दृढ होते, त्यावेळी त्यात गोडी, एकाग्रता, प्रगती या सर्व गोष्टी आपोआप साध्य होतात. जसं शालेय जीवनात आपल्या आवडीच्या विषयांसाठी मुद्दाम आपण जास्त जोमाने अभ्यास करायचो, त्याप्रमाणे एकदा नामावर निष्ठा बसली की, माणूस सहजी त्यात एकचित्त होतो.
अनेक संतमहंतांनी ज्या नामाला सर्वसिद्धीफलदायी म्हणून अनुभवाने गौरवलेलं आहे, त्यावर आपण निःशंक व निर्भय होऊन निष्ठा ठेवावी. निर्भयता व निःशंकता ही दोन निष्ठेची परिमाणं आहेत. जेंव्हा निष्ठा जडते वा स्थापित होते, त्यावेळी मन शंकारहित आणि भयरहीत होतं. कारण ज्या ठिकाणी वा ज्या नामावर निष्ठा ठेवली, तेच नाम सुखात व दुःखात तारून नेईल, हा विश्वास दृढ होतो.
किंबहुना निःशंकता व विश्वास हे एकत्र जातात. म्हणजेच जिथे लक्षावर वा नाम आणि सद्गुरू यांच्यावर निष्ठा जडते, त्याक्षणी मन निःशंक होतं आणि विश्वास जडतो व दृढ होतो. त्याचप्रमाणे निर्भयता जीवाला आत्मबल प्राप्त करून देते. नियमित अभ्यासाने व प्रयासाने आत्मबल सशक्त होऊन, मनास एकाग्रता साध्य करायला मदत करते.
म्हणजेच सारांशाने, आपल्या नामावर, ते ज्यांच्याकडून प्राप्त झालं, त्या सद्गुरूंवर पूर्ण निष्ठा ठेवून निःशंक, निर्भय होऊन, आत्मबलाची प्राप्ती करून, नाममार्गावर ठामपणे वाटचाल करावी, म्हणजे आत्मबल जागृतीने, एकाग्रता होऊन, आपल्या साधनेच्या तरंगलहरी आपल्या ध्येयाप्रत, आपली साधना सशक्तपणे पोचवेल. त्याद्वारे मिळणारा आनंद साधनेचा लाभ चिरकाल प्राप्त करून देईल.
निष्ठेसाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे पूर्ण शरणागती. म्हणजेच आपल्या गुरूच्या, नामाच्या व साध्याच्या चरणी पूर्ण समर्पित होऊन , त्या चरणी अविचल राहून एकनिष्ठ राहण्यात सर्व प्राप्ती आहे. ही गोष्ट अनुभवाने जाणता येऊ शकते. पण त्यासाठी समर्पण वा शरण जाणं हे अत्यंत जरूर आहे.
म्हणूनच सर्वसमर्पण करून, एकाग्रतेने नाम घ्या, नामाशी एकनिष्ठ रहा, अमक्याला साधलं, मला का नाही जमत अश्या कोणत्याही शंकांना वाव न देता, निष्ठापूर्वक नाम घेत रहा, बाकी सर्व गोष्टी त्यायोगाने साधतील.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment