Skip to main content

भोग आणि ईश्वर २१९

भोग आणि ईश्वर  २१९

सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज,
अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।।

परित्यज्य या शब्दाचा वास्तविक अर्थ त्यागणे, सोडून देणे किंवा abandoned ज्याला आपण म्हणतो तो आहे. म्हणजेच शब्दशः याचा अर्थ, सर्व धर्मांचा त्याग करून. सनातन शब्द संकल्पनेत धर्म या शब्दाचा अर्थ, कर्तव्य वा अपेक्षित कर्म असा आहे.  त्यामुळे परित्यज्य याचा अर्थ कर्तव्याचा, अपेक्षित कर्मांचा त्याग कर. म्हणजे काहीही न करता, सर्व इतिकर्तव्यता त्याग. 

पण इतका सोपा अर्थ, तोसुद्धा सर्व कर्तव्याचा त्याग करण्याचा पळपुटा मार्ग, भगवंत सांगतील हे संभवत नाही. मग याचा गहन वा गुह्य अर्थ काय असावा. माझ्या मतानुसार याचा गुह्यार्थ हाच आहे की, तुझ्या कर्तव्यातील तुझं मन वा त्या मनातील आसक्ती , वासना यांचा त्याग करून, निरिच्छ मनाने, निरपेक्ष भावाने तू तुझं कर्तव्य वा अपेक्षित कर्म कर. 

कारण जे केशव अर्जुनाला, त्याच गीतेत शस्त्र हाती घेऊन, युद्धाचं कर्तव्य पार पाडायला विनवून सांगत आहेत, तेच गीतेच्या शेवटी, सर्व कर्तव्य अर्थात सर्व धर्म त्याग असं कसं काय सांगतील, हे असंभव आहे. इतका विरोधाभास सामान्य बुद्धीचा माणूस सुद्धा करणार नाही. मग साक्षात ईश्वर पूर्णावतारात हे सांगतील, अशी कल्पना देखील करणं गैर आहे. म्हणून या परित्यज्यचा अर्थ, त्या कर्मातील आसक्ती त्याग, त्यातील लोभ,मोह, लाभ हानीचा विचार, त्या विचारामुळे होऊ शकणारा आनंद वा विषाद यांचा त्याग कर. 

पण या त्याग केलेल्या भावना आणि त्यामुळे रिक्त मनातील भाव कुठे तरी स्थापित कराव्याच लागतील. कारण मनाला रिक्तता येणं हे खूप महत्प्रयासाने साध्य होतं. त्यामुळे योगेश्वर हे जाणून होते की, आपण सामान्य मानवासाठी जेंव्हा एखाद तत्वज्ञान सांगत आहोत तर, त्या सामान्य मानवासाठीच वा त्याला समोर योजून ते सांगणं गरजेचं आहे. मग त्या रिक्त केलेल्या निरिच्छ भावाने धर्म कर्तव्य करणाऱ्या मनातील भाव कुठे स्थिर करायचे. 

तेसुद्या गिरीधर सांगतात की, ते भाव, ती आसक्ती,ती वासना, हे सर्व कर्तव्याच्या पुर्ततेतून काढून माझ्या चरणी वाहून टाक. म्हणजेच ती आसक्ती त्यागून तुझे सर्व भाव फक्त माझ्या चरणी स्थिर कर, स्थापित कर. मला शरण जा. इथे एक लक्षात घ्या की, व्रज या शब्दाचा अर्थ जा असाच घ्यायचा. याचं कारण देहरूपातील श्रीकृष्ण , देह त्यागून आत्मतत्वातील श्रीविष्णूच्या पूर्णरूपात, आज ना उद्या विलीन होणारच, हे प्रभू जाणत होते. 

म्हणून ज्यावेळी आपल्या मूळ स्थानापासून भिन्न स्थानी आपण असतो, त्यावेळी आपण एखाद्याला घरी जा सांगतो, कारण आपण भिन्न जागी , त्यावेळी असतो, याची आपल्याला जाणीव असते. अर्थातच तोच विचार मनात योजून आणि आपलं देहरुप अस्तित्व या युगात वा या काळी उरलं नाही, तरी नामरूप अस्तित्व अखंड राहील. पण मूळ स्थान वैकुंठ असल्या मुळे आणि सर्व भक्त, वा जीव अंती वैकुंठीच येणार असल्याकारणाने, भगवंत समान्यांसह सर्वांना, मला शरण जा असा , देहरुप व आत्मरुप भिन्न भाव मनात धरून, सांगतात. 

खरतर अजूनही, या श्लोकाबद्दल लिहायचं आहे. पहिल्या ओळीतील उत्तर भागाचा अजूनही, खोलात शिरून भाव जाणून घेऊया, पण उद्या. तोपर्यंत नामात आपला भाव स्थिर ठेवून, नामात रहा. जन्मजन्मांतरीच्या बेड्या उघडण्याची शक्ती फक्त नामात आहे. नाम तारक आहे, हे ध्यानात ठेवा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...