भोग आणि ईश्वर २२८
निष्ठा काय हे समजलं आणि ती निष्ठा ईश्वर वा गुरुचरणी अर्पण केली की, साधकाने खरतर पूर्ण निश्चिन्त व निरपेक्ष झालं पाहिजे. कारण निष्ठा वाहणं वा अर्पण करणं म्हणजे सर्वस्व अर्पण करण्यासारखं आहे. एकदा का सर्वस्व अर्पण केलं की, माझं काहीच उरत नाही. फक्त माझं आराध्य, माझं साधन आणि त्या आराध्यासाठी प्रत्येक क्षणक्षण अर्पण, इतकंच शिल्लक राहतं.
पूर्वीच्या काळात खानदानी व शेठ सावकार यांच्या घरी पिढ्यानपिढ्या निष्ठा वाहिलेली नोकरमाणसं कामाला असायची. त्या नोकरमंडळींचा सर्व जिम्मा हा त्या खान दानाच्या शिरावर असायचा. अगदी पूर्ण कुटुंबच्या कुटुंब त्या घरात कार्यार्थ सिद्ध असायचं. त्या नोकरदार कुटुंबाला आपली, आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांच्या भवितव्याची आणि त्यांच्या घरातील कार्याची काहीही चिंता नसायची.
कारण ज्या घरात ते नोकरदार म्हणून पिढ्यान्पिढ्या राबत असत, त्या घराने त्यांच्या कार्याचा सुदधा भार उचलणं अपेक्षित असायचं, नव्हे तर तसा तो उचलला जात असे. अडीअडचणीला, कार्याला, औषधपाण्याला लागणारा खर्च व सर्व तरतूद त्या घरातूनच होत असे. तशी खानदानी परंपरा वा रीतिरिवाजच असायचा आणि तो दोन्ही बाजुंनी मान्य असायचा.
त्यामुळे त्या बदल्यात त्या नोकरदार कुटुंबाची संपूर्ण निष्ठा त्या खानदानाला वाहिलेली असायची, ती विनाअट, तह हयात व संपूर्ण असायची. तसा अलिखित करार दोन्ही बाजुंनी मान्य केलेला असायचा. त्यात एका अणूमात्रेचा सुदधा किंतु वा परंतु नसायचा. किंबहुना त्या दोन्ही कुटुंबांना अभिमान असायचा की, ही आमच्याकडे राबणारी चवथी, सातवी अशा प्रकारची पिढी आहे.
मला असं वाटतं परंपरागत भारतीय संस्कृतीत या एका उदाहरणाने सांगितलेली निष्ठा वाहण्याची परंपरा, जनरीत, सवय, वृत्ती, बाणा हे रक्तात आल्याप्रमाणे असायचं. पण हे असं सार्वत्रिक असण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या निष्ठेच्या पाठीशी आत्मविश्वास असायचा आणि मनात कोणताही भेद, भाव, शंका यांना जागा नसायची. किंवा तसा काही विचार दुरान्वयानेही दोन्ही पक्षांच्या वा व्यक्तींच्या मनात येण्यास वाव नसायचा.
किंवा त्या प्रकारच्या मनोवृत्तीची माणसं जन्माला यायची होती. कदाचित याच वृत्ती वा स्वभावामुळे, निष्ठा या शब्दाला अर्थ प्राप्त होत असे. त्यामुळे निष्ठा वाहिलेल्या व्यक्ती वा कुटुंबाला कोणताही मानसिक त्रास, चिंता, काळजी यापैकी काहीही नसायचं. याची दुसरी बाजू म्हणजे ज्यांच्या चरणी ही निष्ठा वाहिली असेल, त्यांना या व्यक्ती वा कुटुंबाची जबाबदारीची जाणं व त्यांच्या तरतुदींची चिंता असायची. किंबहूना त्या दोन्ही कुटुंबावर आलेल्या अडचणीत, दुःखाच्या प्रसंगात व सुखाच्या आनंदाच्या पर्वात दोन्ही कुटुंबं एकमेकांसोबत असायची.
आता या सर्वातून निष्ठा या एका संकल्पनेबाबत काही गोष्टी, आपल्या लक्षात आल्या असतील. आता या उदाहरणातील नोकर वा सेवक म्हणजे आपण, मालक वा सावकार म्हणजे ईश्वर वा सद्गुरू आणि त्या नोकर माणसाने करावयाची सेवा म्हणजे आपली साधना. त्या पिढ्या पिढ्यांची चाकरी म्हणजे जन्मोजन्मी आपण करत असलेली नामसाधना.
म्हणजे एकदा निष्ठा, ईश्वर वा सद्गुरू चरणी वाहिल्या नंतर आणि त्या निष्ठेसाठी पूर्ण शरणागत भाव ठेवून फक्त आपलं साधन करत राहिल्यानंतर, आपल्याला दुःख मिळो, भोग येवोत किंवा सुख समाधान प्राप्त होवो, ते सर्व ईश्वराच्या अर्थात मालकाच्या चरणी रुजू आहे आणि त्यातून पार नेण्याची चिंता, ही त्याची आहे, आपण फक्त सेवेस सादर असणे गरजेचे व अपेक्षित आहे. किंबहुना जे दुःख मिळेल ते आपल्या प्रारब्धापेक्षा कमी आपल्यापर्यंत पोचलं व सुख मिळालं तर आपल्या कर्मपेक्षा जास्त प्राप्त झालं. कारण दोन्ही वेळा आपला मालक हितरक्षणार्थ समर्थ होता.
अशी शरणागत निष्ठा साधल्यास, सर्व चराचराचा मालक, आपल्या योगक्षेमाची चिंता वाहण्यास,-नक्कीच सोबत असेल. म्हणून निःशंक व निर्भय होण्यासाठी निष्ठावंत व्हा आत्मविश्वासाने नाम घ्या आणि चिंता सद्गुरूचरणी सोडून द्या. जे होईल ते योग्यच होईल.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment