भोग आणि ईश्वर २४२
नाम हे मुळात एकदा सुरू केलं की, ते खरतर आपोआप आपला कार्यभार साधत जातं. एखादा कर्मदरिद्रीच असेल, जो नाम घेऊन, नंतर मायावश किंवा कुमतीने त्याचा त्याग करेल. इथे एक प्रश्न निर्माण होईल, जर नाम स्वयंसिद्ध आणि स्वप्रकाशीत आहे, तर मग अशी कुमती कशी होऊ शकते. शंका अत्यंत रास्त आहे आणि स्तुत्य आहे. कारण त्यामुळे आपल्या स्वतःच्या श्रद्धेलासुद्धा तपासता येईल.
याचं उत्तर श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत अनेक ठिकाणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दिलेलं आहे. त्याचा सारांशाने विचार करूया. सर्व प्राणीमात्रांना कर्म करणं क्रमप्राप्त आहे, हे नक्कीच. म्हणजे कर्म न करण्याचं स्वातंत्र्य कोणालाही नाही. कारण भगवंतांनी स्वतः सांगितलं आहे आणि तर्कानेसुद्धा जाणता येईल की, काही न करणं हेसुद्धा एक कर्म आहे आणि त्याचं फळ सर्वनाश वा आत्मघात हा होऊ शकतं.
हे झालं भौतिक जगतातील कर्माबद्दल. पण आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गातसुद्धा कर्मच श्रेष्ठ आहे. कारण काहीही न जमणाऱ्यालादेखील भगवंतांनी मामेकम शरणं व्रज हा एक कर्म करण्याचा सल्ला दिलाच आहे. बरं शरण आल्यानंतर काय करायचं तर, ज्या चरणांवर शरणागत आहोत, त्यावर शरणागत राहून, चित्तवृत्ती, बुद्धी, देह आणि आत्मा तिथेच स्थिर ठेवणं साधायचं.
म्हणजेच तेही एक कर्मच आहे. त्यामुळे हे नक्की म्हणता येईल की, आधी भौतिकात वा आधी आत्मिक क्षेत्रात, प्रगती वा अधोगती दोन्हींसाठी आपणच कर्मरत राहणं नैसर्गिक आहे. हा कर्ममार्गाचा मुद्दा झाला. ज्ञानी ज्यावेळी ज्ञानाच्या मार्गाने जाऊन, मुमुक्षत्व अवस्थेप्रत पोहोचतो, त्यावेळी त्याची वृत्ती वास्तविक, सर्व ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे, स्थितप्रज्ञ अवस्थेला पोचते.
स्थितप्रज्ञता म्हणजे ज्यावेळी सुख दुःख, भोग वा उपभोग याचा उलगडा होऊन, खऱ्या जाणिवा जागृत होतात आणि तदनंतर भौतिकातील काही वा मायापाश मोह बंधनं, षड्रिपु यापैकी काहीही ज्ञानी माणसाला पथभ्रष्ट वा मार्गरहीत करू शकत नाही. ही एक दिव्यावस्था असते. म्हणजेच एक ईश्वरी संदेशलहरी वा ततसंबंधी ज्ञानच फक्त, चेतना जाणिवा ग्रहण करून प्रतिसाद देतात.
परंतु ज्ञानाने प्राप्त स्थितप्रज्ञता क्रिया व प्रतिक्रिया यांना आत्मसंयमाने स्थिर करतात. एका विशिष्ट स्थितीला ज्ञान म्हणजे नक्की काय याचादेखील उलगडा झालेला असतो.
नंतर फक्त मी आणि भगवंताची जाणीव शिल्लक राहते. या स्थितीत मन बुद्धी आणि आत्मा स्थिर असतात. पण अशी स्थिरता हीदेखील एक कर्मवस्थाच आहे. म्हणजेच ज्ञानी होऊन वा ज्ञानयोग साधूनही कर्म सुटत नाही.
आता भक्तिमार्गात तर कर्मच कर्म आहे. कारण आत्मो द्धाराची व आत्मउन्नतीची भूक, हृदयस्थ आत्म्याबद्दलची जाणीव, त्यासाठी धारण केलेल्या या देहाचं मुख्य कर्म हे सर्व भक्ताला व साधकाला स्थिर बसून देणार नाही. त्यामुळे त्या उद्देशांच्या पूर्ततेसाठी सतत ध्यास घेऊन, त्याचा पाठपुरावा करणं हेच एक ध्येय होऊन जातं.
वृत्तीतील सर्व दोष, कर्मातील चुका, मोह माया हे सर्व आपले अडथळे आहेत हे जाणल्यानंतर ते एकेक करून गळून पडायला सुरुवात होते. हे सर्व नाही झालं तरी फक्त शरणागत राहून, सर्व भाव त्यागून, फक्त ईश्वर चरणी स्थिर राहण्याचं कर्म भक्तिमार्गात श्रेष्ठ आहे. म्हणजे तिन्ही मार्गात आपणच कर्मरत राहणं हे मर्म श्रेष्ठ आहे. अशी कर्मावस्था सहज येत जाते, ज्यावेळी, आत्मा हा भिन्न आहे आणि देह फक्त उध्दाराचं साधन मात्र आहे, ही जाणीव प्राप्त होते, त्यावेळीच ज्ञान कर्म वा भक्ती या मार्गाने जाण्याची जाणीव जागृत होते.
आता वरील सर्व विवेचनातून एक सार नक्कीच काढता येईल की, वृत्तीतील दोष व कर्माच्या चुका व्यक्तीच्या नामामार्गात बाध्यता आणतात आणि त्याच, व्यक्तीला या मार्गापासून परावृत्त करू शकतात. म्हणजे सरतेशेवटी हेच पुन्हा सिद्ध होतं की, कुठे जायचं हे आपण ठरवणार, आपणच ते साध्य करण्यासाठी कर्म करणार किंवा कर्म न करता, याच जन्मजन्माच्या प्रवासात फिरत राहणार.
म्हणून एकदा या मार्गाचा निश्चय केला आणि मार्गक्रमण सुरू केलं की, कर्महीनता वा कर्मदारिद्रीपणाच माणसाला या देहाचा मुख्य उद्देश साध्य करण्यापासून परावृत्त करू शकतो. म्हणून आता आपणच ठरवायचं की, नाम घेत पुढील जन्मात उद्देशांच्या मार्गावर दृढ चालायचं की, मार्गभ्रष्ट होऊन, चक्रात फिरत राहायचं. निश्चय दृढ असेल तर नाम घेत रहा आणि हेतू साध्य करत रहा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment