भोग आणि ईश्वर २१५
खरतर ईश्वराने सृष्टीसह संपूर्ण ब्रह्मांडाची रचना करताना, सजीवसृष्टीत पायऱ्या पायऱ्यांनी प्रगती दाखवत मानवाला सर्वात उच्चस्थानी बसवलं. उद्देश हा की, मानव या सर्व साखळीला धरून कर्मरत राहील आणि अंती , त्याच्याकडून अपेक्षित, मोक्षपदाला प्राप्त करेल.
वास्तविक हे तसही सहजी शक्य होतं, जेंव्हा मानव नैसर्गिक जीवन जगत होता. म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात राहून, देहाचे फार लाड न करता, संसार आणि अध्यात्म असं निरामय जीवन जगत होता, त्यावेळी अध्यात्म, ज्ञानग्रहण, ईश्वरोपासना हे सहजी साध्य होत असे. नव्हे तर ते जास्त प्राकृतिक होतं. काही भौतिक साधनसंपत्ती मिळवण्याचा हव्यास, ध्यास नसायचा.
मन अस्थिर करणाऱ्या असुविधा नसल्याने, वेदशास्त्र व त्यात मांडलेल्या जीवनपद्धतीने सर्व कार्य व इप्सित कर्म होत होती. जीवन जगण्याची प्रेरणा, इच्छा आणि आकांक्षा फार अवाजवी नव्हती. सहजीवनाच्या संकल्पना, त्यामागील प्रेरणा आणि प्राप्तीची आस ही मर्यादित स्वरूपाची होती. कुटुंबात विनाकारण कलह, मन कलुषित करणाऱ्या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या.
अर्थातच, जीवनातील नकारात्मक बाबी व त्या बाबींशी, त्या अडथळ्यांशी झुंझाण्याचा प्रश्न फार बिकट नव्हता. सर्वसामान्य माणसाचं जगणं इतकं सुलभ आणि सुसह्य होतं की, जीवनात अपेक्षांचं ओझं आणि त्या ओझ्यामुळे मनाची बऱ्यापैकी झालेली कुचंबणा वा कुतरओढ ही कदाचित अस्तित्वात नव्हती. माणसं भावनिक गुंता फार वाढवत नसत. येणाऱ्या सर्व गोष्टी सहजी स्वीकारण्याची निसर्गदत्त प्रवृत्ती बलवान आणि सशक्त होती.
येणारी संकटं, भोग इत्यादी सहसा निसर्गनिर्मित असायची. मानवनिर्मित संकटांची मालिका त्यावेळी सुरूच झाली नव्हती, असा तो काळ होता. धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी अर्थ जगण्यासाठी गरजेचा इतकाच आणि काम हे फक्त निसर्गनिर्मिती याचसाठी आणि तेवढ्याचपूरता मर्यादित होता. विकारांना आणि विषयांना सहसा वाव नसायचा किंवा असलाच तर त्याची व्याप्ती मर्यादित व्यक्तींपुरती होती.
नैसर्गिक राहणीमान, उच्च मानसिक बल व ऊर्जा देणारी अत्यंत साधी व सहज ईश्वरोपासना, ज्या पद्धतीने व जमेल त्यानुसार व्हायचं. नियम व नियमावली यांचं बंधन असलं तरीही, त्यांच्या पालनासाठी लहानपणापासून तशी जीवनपद्धती असल्यामुळे, त्यांचं पालन करण्यात फार त्रास होत नसे. छोटीशीच व नैसर्गिक साधनं वापरून शाकारलेली घरं, घरात कोणत्याही चिजवस्तूंचा फार सोस नाही, त्यामुळे त्यांच्या प्राप्तीची वाट फार खडतर आणि तापदायक नव्हती.
प्रत्येक घरातील वातावरण पूर्ण सकारात्मक आणि विपरीत परिस्थितीतसुद्धा मनाचा तोल जाऊ न देणारं असायचं. नैसर्गिक जीवनपद्धतीमुळे आजार, रोगराई फार नसायची आणि असलीच तरी सशक्त आयुर्वेदिक उपचार असल्यामुळे, मानवी जीवन सुलभ होतं. त्यामुळे घडणाऱ्या सर्वच गोष्टी निसर्गनिर्मित असायच्या. मानव निर्मित संकटांची संकल्पना कदाचित अस्तित्वात नसेल, किंवा असुर हाच त्या संकल्पनेचा एकमेव कार्यकारण भाव असायचा.
उपलब्ध साधनातून सहजी आणि सुसह्य जीवनपद्धतीने जगून ठराविक काळानंतर वास्तविक वानप्रस्थाश्रम पद्धत ही जीवनाचा अविभिन्न अंग होती. म्हणजे साधारण सर्व स्थिर झालं आणि आता लक्षात आलं की, पुढील पिढी योग्यपणे कार्यरत आहे, त्यानंतर वृद्ध मंडळी आपणहून संसारातील अंग काढून घेऊन निजधामास जाण्याच्या मार्गाची शारीरिक, मानसिक व आत्मिक तयारी करूनच वानप्रस्थाश्रममार्गी, होत असत.
ईश्वरोपासनेच्या संकल्पना पद्धती या बाह्यांगी नव्हत्या आणि मनाने, आत्म्याने व बुद्धीसह देहाने समर्पित होऊन, आराधना करण्याची पद्धत, मानसिकता व कर्म होत असल्यामुळे, सर्वसमर्पण भाव हा निसर्गतः सर्व विधींमध्ये येत असे. मुळात ईश्वराकडून प्राप्ती ही भौतिक गोष्टीं मागण्याची वृत्ती व प्रवृत्ती निर्माण झालीच नव्हती. कारण मुळात भौतिक गरजा, ध्यास, हव्यास व लक्ष फार नसायचं आणि असलंच तर त्यात कर्मावर विश्वास व ईश्वरावर श्रद्धा हा संकल्प ठाम असायचा.
या सर्वांचा भक्तियोगाशी काय संबंध हे पुढील भागात पाहूया. नामाचा मार्ग सोडू नका आणि नाम घेत रहा संमार्गी व्हा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले दहा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment