Skip to main content

भोग आणि ईश्वर २२०

भोग आणि ईश्वर  २२०

सर्वधर्मान्, परित्यज्य, माम्, एकम्, शरणम्, व्रज,
अहम्, त्वा, सर्वपापेभ्यः, मोक्षयिष्यामि, मा, शुचः।।१८:६६।।

सर्व धर्मांचा अर्थात कर्तव्याचा त्याग न करता, त्यातील आसक्ती व फलाची इच्छा, यांचा मोह त्यागून, मला एकट्याला शरण जा. इये भगवंत एक तत्व सुंदररीत्या सांगतात. ते म्हणजे माम एकम म्हणजे मला एकट्याला. यात  भगवंतांना असं सुचवायचं आहे का मी एकटाच आहे आणि बाकीचं देवरूपात प्रकटलेलं चैतन्य हे भिन्न आहे किंवा त्याच्याशी माझा संबंध नसल्यामुळे, फक्त माझा एकट्याचा विचार करा आणि मला एकट्यालाच शरण जा. 

मला असं वाटतं की, भगवंतांनी यातसुदधा एक सुंदर विचार , एका शब्दात मांडला आहे. यातील भावार्थ आणि गर्भितार्थ आता आपण समजून घेऊया. ब्रह्मांडाच्या निर्मितीत आणि विश्वाच्या रचनेतून, युगांच्या चक्रातून काळाची गती फिरताना,  अनेकानेक रूपातून, सगुण अवतारातून एकरूपी विश्वाचालक व पालक, प्रकट होत गेला.

प्रत्येक रूपाचं, आवताराचं कार्य, महत्व ज्याप्रकारे होतं, त्याप्रकारे ते स्थापित करून, त्या त्या कार्यासाठी त्या स्वरूपाचा उपयोग, जगतकल्याणासाठी, श्रीमहाविष्णूनी करून घेतला. सूर असुर प्राणी व मानव यांसह सर्व सजीव व निर्जीव सृष्टीत अनंत रुपात भरून उरलेला विश्वनियंत्याचा अंश, प्रत्येक ठिकाणी सगुणात व सगुणातीत भावात साकार झाला. 

भक्त, उपासक, स्तुती पाठक यांनी त्या त्या स्वरूपाचा प्रचार आपल्या आपल्या अनुभवानुसार केला आणि त्या त्या स्वरूपासह त्या त्या नामाचा महिमा वृद्धिंगत करत, जिवंतच ठेवला माही, तर प्रसंगी असुर, दानवी व मानवातील क्रूर शक्तीपूढे हार न मानता, आपला देह विसर्जित करून, त्या त्या स्वरूपाचा महिमा अजरामर ठेवला.

त्या त्या स्वरूपाचे साधक, विश्वात्मक स्वरूपाच्या त्या त्या अंशाला, आपली इष्टदेवता मानून, पूजा, अर्चना, प्रार्थना, प्रतिष्ठापना इत्यादींसह  नाममहिमा, नामस्मरण व नामसंकीर्तन आदी माध्यमातून साधन करत आलेत, करत राहणार. यात व्यक्तिगत श्रद्धेचा सामूहिक परिपाक आणि त्याचा सामूहिक परिणाम म्हणून ईश्वरी शक्तीने, भक्तांचा व उपासकांचा भोळा भाव पाहून, वेळोवेळी प्रसन्न होऊन, दर्शन व दृष्टांतसुद्धा त्या त्या रूपातच दिलं. 

या सर्वात एक गोष्ट कायम मानवाने ध्यानात ठेवावी, यासाठी श्रीमद्भागवद्गीतेच्या माध्यमातून एकदा हे मनात, हृदयात बिंबवून ठेवण्याची सूचना म्हणून या अठराव्या अध्यायातील या श्लोकाचा आधार घेत,  मायेच्या प्रभावात प्रसंगी अनेकातील एकत्व विसरून, आपल्या इष्ट  स्वरूपाशिवाय अन्यत्र श्रद्धा ठेवणाऱ्या किंवा त्या स्वरूपाचं अस्तित्व प्रसंगी, कमी लेखणाऱ्या सर्व सामान्य जडजीवांना एकाच शब्दात सांगितलं आहे की,

तू जरी अनेक रूप, प्रकट झालेली पहात असशील आणि त्यातील एका स्वरूपाला आधार मानून श्रद्धायुक्त अंतःकरणाने भक्ती करत असशील तर, तो सुद्धा मीच आहे आणि या अनेकांना प्रकट करून, त्यांच्याहून आपलं अस्तित्व भिन्न दाखवणारा मी सुद्धा मीच आहे. 

म्हणजेच एक तत्व श्रेष्ठ मानून त्याला पुजणाऱ्या भोळ्या भक्ता, सर्व चराचरात भिन्न भासणारा मी, वास्तविक एकच आहे. म्हणून तू तो भिन्नत्वाचा संदेह मनातून काढून, त्या सर्व स्वरूपातसुद्धा मलाच पाहून, माझ्या त्या एकाच स्वरूपाला शरण जा. एक उदाहरण देतो म्हणजे मुद्दा लक्षात येईल. अनेक कंपन्यांचे प्रमुख एखादी व्यक्ती असते वा असू शकते. 

उद्या आपण एखाद्या कंपनीच्या प्रमुखाला कामानिमित्त भेटायला गेलो आणि समोर ओळखीची व्यक्ती आली, तर आपण सांगू की, मला "य" या कंपनीच्या प्रमुखांना भेटायचे आहे. पण आपण त्या "क्ष" कंपनीचे प्रमुख आहात. त्यावर ती व्यक्ती हसून म्हणेल, अहो त्या कंपनीचा मालक व या कंपनीचा प्रमुख मीच आहे. आपण दोन्ही कंपन्यांच्या समस्येबद्दल माझ्याशी बोलू शकता. तो आणि मी एकच आहे . मला वाटतं, आता ईश्वराच्या मुखातील माम एकम याचा अर्थ ध्यानात आला असेल. आता भिन्न स्वरूपातील प्रकट ईश्वराला आणि भिन्न स्वरूपात प्रकट झालेल्या गुरुतत्वाला एकाच श्रद्धेने प्रणाम करा. तुमचे सद्गुरू आणि इतरांचे भिन्न नावातील सद्गुरू एकच आहेत, लक्षात ठेवा. 

उद्या शरण म्हणजे नक्की काय यावर विस्तृत चर्चा करूया. पण तोपर्यंत या एकत्वाचा स्वीकार करून आपलं नाम अधिक दृढतेने घ्या.

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...